Join us  

उन्हाळ्यात पोटाचे,उष्णतेचे विकार होतात,अन्न पचत नाही ? आंबटगोड पन्हं प्या, त्याचे फायदे वाचा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 7:58 PM

कैरीच्या पन्ह्याला जसा चैत्रातील हळदी कुंकवाचा सांस्कृतिक संदर्भ आहे तसाच आरोग्याचाही आहे. कैरीच्या पन्ह्यात अनेक आरोग्यदायी गुणधर्म असल्यामुळे ते पोटाच्या विकारांपासून ते मानसिक समस्यांपर्यंत अनेक बाबींवर लाभदायी ठरतं. त्यामुळे उन्हाळ्यात सोडायुक्त थंड पेयं पिण्यापेक्षा नैसर्गिक तत्त्वांनीयुक्त असं कैरीचं पन्हं पिण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञ आणि आहार तज्ज्ञ देतात.

ठळक मुद्देपोटाच्या अनेक समस्येवर एक उपाय म्हणूनही कैरीचं पन्हं उपयुक्त आहे.कैरीमधील लोह या घटकामुळे कैरीचं पन्हं हे नवीन रक्त पेशी निर्मितीस चालना देतं.एक फुलपात्रभर कैरीचं पन्हं घामामुळे निर्माण होणाऱ्या बुरशीजन्य आजारांचा प्रतिबंध करुन उन्हाळ्यात त्वचेचं संरक्षण करतं.

चैत्र महिना. वसंत ॠतू आणि कैरीचं पन्हं यांच्यात खूप जवळचा संबंध आहे. चैत्र महिना उजाडला की आधी वेध लागतात ते चैत्रातील हळदी कुंकवाचे आणि त्यानिमित्तानं आवर्जून केल्या जाणाऱ्या कैरीच्या पन्ह्याचे. फुलपात्रभर दिलं जाणारं कैरीचं पन्हं हे एक सूचक असतं. उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या उष्म्यानं होणारा त्रास शमवण्यासाठी कैरीचं पन्हं उत्तम पेय असतं हेच यातून सांगितलं जातं. कैरीच्या पन्ह्याला जसा चैत्रातील हळदी कुंकवाचा सांस्कृतिक संदर्भ आहे तसाच आरोग्याचाही आहे. कैरीच्या पन्ह्यात अनेक आरोग्यदायी गुणधर्म असल्यामुळे ते पोटाच्या विकारांपासून ते मानसिक समस्यांपर्यंत अनेक बाबींवर लाभदायी ठरतं. त्यामुळे उन्हाळ्यात सोडायुक्त थंड पेयं पिण्यापेक्षा नैसर्गिक तत्त्वांनी युक्त अस कैरीचं पन्हं पिण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञ आणि आहार तज्ज्ञ देतात.

कैरीच पन्हं प्यावं कारण

- पोटाच्या अनेक समस्येवर एक उपाय म्हणूनही कैरीचं पन्हं उपयुक्त आहे. उन्हाळ्यात पचनासंबंधीचे विकार होतात . कैरीत असलेल्या पेक्टिनमुळे पोट बिघडणे, तसेच बध्दकोष्ठता या अडचणी दूर होण्यासाठी कैरीचं पन्हं उपयूक्त ठरतं. कैरीचं पन्हं हे अ‍ॅण्टिसेप्टिक म्हणूनही काम करतं. कैरीच्या पन्ह्यामुळे बाइल नावाचं अ‍ॅसिड स्त्रवण्यास उद्दिपन मिळतं. यामुळे पोटाच्या आतड्यात जर काही जीवाणूंमुळे संसर्ग झाला असल्यास तो बरा होण्यास मदत होते. तसेच काविळ आणि यकृताशी संबंधित अनेक आजारांवर कैरीचं पन्हं पिणं हे फायदेशीर ठरतं.

- उन्हाळ्यात सतत घाम येण्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइटस झपाट्यानं कमी होतात. हे इलेक्ट्रोलाइटस झपाट्यानं भरुन येण्याचं काम कैरीच्या पन्ह्यामुळे साध्य होतं. त्यामुळे उन्हाळ्यात दूपारच्या वेळेत एक फुलपात्रभर पन्हं प्यायल्यानं जीवाची काहिली थांबते आणि झटकन ऊर्जा मिळते.

- क, अ आणि ब जीवनसत्त्वांमुळे आंबट गोड चवीचं कैरीचं पन्हं गुणांनी पौष्टिकही होतं. कैरीच्या पन्ह्यातील क जीवनसत्त्वामुळे कोलॅजन निर्मितीला उत्तेजन मिळते. त्यामुळे त्वचा आणि केस चांगले होतात. त्यासोबतच शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. यात असलेल्या भरपूर अ‍ॅण्टिऑक्सिडण्टसमुळे कर्करोग विरोधी म्हणूनही कैरीचं पन्हं उत्तम काम करतं. कैरीत असलेल्या बी६ या जीवनसत्त्वामुळे गामा- अमिनो- ब्युट्रीक अ‍ॅसिड निर्मितीस चालना मिळते. ज्याचा उपयोग मन शांत होण्यास , ताण निवळण्यास होतो. त्यामुळे खूप थकवा आल्यास, उदास वाटत असल्यास कैरीचं पन्हं पिल्यानं शरीराला आणि मनाला तरतरी येते.

- कैरीमधील लोह या घटकामुळे कैरीचं पन्हं हे नवीन रक्त पेशी निर्मितीस चालना देतं. यातील क जीवनसत्त्वामुळे रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढते. . त्यामुळे हदयाचं कार्य सुरळित पार पडतं. कैरीचं पन्हं हे सरबत स्वरुपात असलं तरी त्यात भरपूर तंतूमय घटक असतात जे पोटाच्या आरोग्यासोबतच रक्तवाहिन्यांमधे कोलेस्ट्रॉल साचण्यास प्रतिबंध करतं.

- उन्हाळ्यात त्वचा आणि केसांमधे रुक्षता येते.पण कैरीत असलेल्या क आणि अ जीवनसत्त्वामुळे त्वचेतील आणि केसातील आर्द्रता टिकून राहाते. एक फुलपात्रभर कैरीचं पन्हं घामामुळे निर्माण होणाऱ्या बुरशीजन्य आजारांचा प्रतिबंध करुन उन्हाळ्यात त्वचेचं संरक्षण करतं.