Join us  

उपवासाला फळं आणि सुकामेवा खाताय? 11 गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर हेल्दी खाऊनही पोट बिघडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 6:29 PM

उपवासाला फळं आणि सुका मेवा खाणंही फायदेशीर ठरतं. पण ते खाण्याचे काही नियम आहेत. ते पाळून फळं आणि सुकामेवा खाल्ल्यास त्याचा आरोग्य आणि वजन कमी करण्यासाठीही चांगला फायदा होतो.

ठळक मुद्दे ताजी फळे खाल्ल्याने रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकले जातात कारण फळांमध्ये अँटी ऑक्सिडंट घटक असतात.आपल्या हवेत,मातीत पिकणारी फळं, भाज्या या आपल्यासाठी अधिक उपयुक्त असतात हे नेहमी लक्षात ठेवून स्वदेशी बाणा ठेवावा.सुका मेवा या अंतर्गत येणारी सगळी ड्राय फ्रूट्स भरपूर स्निग्ध पदार्थ युक्त असल्याने पचायला खूप जड असतात.  चांगली भूक लागलेली असताना आणि कमी प्रमाणात खावेत.

- वैद्य राजश्री कुलकर्णीM.D.(आयुर्वेद)

बऱ्याच स्त्रिया उपवास हा आरोग्य सुधारण्यासाठी किंवा शरीर शुद्धीसाठी ,वेटलॉससाठी म्हणून करतात. विशेषतः तरुण पिढीतील अनेक मुली याचा चांगली संधी म्हणून वापर करून घेतात.अशा वेळी त्या टिपिकल पद्धतीचे म्हणजे साबुदाणा, शेंगदाणे किंवा तळलेले चिप्स,साबुदाणा, बटाटा पापड वगैरे न खाता केवळ रॉ म्हणजे कच्चे पदार्थ खाऊन उपवास करतात.यात मग जास्त करून फळांचा समावेश होतो.सॅलड्स किंवा भाज्या ज्या एरवी डाएट म्हटलं की आधी आठवतात ,त्यांचा फार उपयोग होत नाही कारण कच्च्या भाज्यांपैकी फक्त काकडी उपवासाला चालते.तिचा वापर करता येतोच.  पण उपवासाला फळं आणि सुका मेवा खाणंही फायदेशीर ठरतं. पण ते खाण्याचे काही नियम आहेत. ते पाळून फळं आणि सुकामेवा खाल्ल्यास त्याचा आरोग्य आणि वजन कमी करण्यासाठीही चांगला फायदा होतो.

Image: Google

उपवासाला फळं -सुकामेवा खाताना..1. फळांचा रस म्हणजे ज्यूस वगैरे काढून पिण्यापेक्षा अख्खं फळ खाणं जास्त फायदेशीर आहे कारण फळातील गर त्यामुळे वाया जात नाही तसेच रस हा पूर्ण फळापेक्षा पचायला जड असतो.शिवाय फळातील तंतुमय पदार्थ ,रेषा या पोट साफ राहण्यासाठी मदत करतात.शिवाय पूर्ण फळ खाल्ल्याने पोट भरते.

2. ताजी फळे खाल्ल्याने रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकले जातात कारण फळांमध्ये अँटी ऑक्सिडंट घटक असतात. विशेषतः वर्षभर आपण घरी ,बाहेर जे असंख्य तळकट पदार्थ खात असतो त्यामुळे अधूनमधून फळं, कच्चा भाजीपाला, सॅलड्स खाणं आवश्यकच आहे.

3.  काही घरांमध्ये उपवासाला मीठ खात नाहीत, अशावेळी मिठाया किंवा गोड पदार्थ खाऊन अतिरिक्त कॅलरीज गोळा करण्यापेक्षा फळं खाणं हा खूप आरोग्यदायी पर्याय आहे.

4. फळं खाताना एकच पथ्य पाळलं पाहिजे ते म्हणजे जी फळं ज्या ऋतूत मिळतात ती तेव्हाच खावीत. देशी विदेशी फळं जी बिगर हंगामी आहे ती , जी वर्षभर मिळतात ती खाऊ नयेत.

Image: Google

5.  पावसाळा संपत येतो आणि ऑक्टोबर महिना सुरु होतो त्या दरम्यान चांगले पेरु, सीताफळं विकायला येतात .  वर्षभर मिळणारी केळी,डाळिंब, चिकू,सफरचंद ,अननस ही फळं असतातच ,याशिवाय संत्री,मोसंबी, पपई,  नाशपती अशी फळं मिळतात.अदलून बदलून या फळांचा आस्वाद घेण्यास हरकत नाही.

6. हल्ली किवी,ड्रॅगन फ्रूट ,विदेशी द्राक्षे, चेरीज संत्री अशी कितीतरी फळं मिळतात पण एकतर त्यांचा उगीचच खूप गवगवा केला गेलाय ,दुसरं ही फळं आपल्या फळांपेक्षा कितीतरी महाग असतात. आपल्या हवेत,मातीत पिकणारी फळं, भाज्या या आपल्यासाठी अधिक उपयुक्त असतात हे नेहमी लक्षात ठेवून स्वदेशी बाणा ठेवावा. कधीतरी चवीत बदल म्हणून खायला हरकत नाही पण अगदी आवर्जून आणावीत इतकी काही ती महत्त्वाची नाहीत. 

7.  उपवास म्हणजे दूध पोटात जायला हवं असा विचार करून दूध आणि फळं मिक्स करून फ्रूट सॅलड करुन खाणारे पण पुष्कळ असतात पण आता बहुसंख्य लोकांना हे माहीत झालंय की हे विरुद्ध अन्न आहे आणि ते खाऊ नये .  दही,दूध,फळं, कस्टर्ड ,साखर, क्रीम घालून फ्रूट सॅलड कितीही  चवदार पदार्थ  होत असलं तरी खाऊ नये.

Image: Google

8. सुका मेवा या अंतर्गत येणारी सगळी ड्राय फ्रूट्स भरपूर स्निग्ध पदार्थ युक्त असल्याने पचायला खूप जड असतात ,चांगली भूक लागलेली असताना आणि कमी प्रमाणात खावेत. काजू,अंजीर, बदाम,पिस्ते,जर्दाळू ,मनुके याबरोबरच खारीक,खोबरं हे सगळंच दोन दोन तुकडे या प्रमाणात खावेत,ड्राय फ्रूट्स खाल्ले तर त्या बरोबर इतर काहीच खाऊ नये आणि त्या नंतरही किमान तीन तास काही खाऊ नये म्हणजे त्यांचं  व्यवस्थित पचन होऊन त्याचे फायदे मिळतात.

9.  दूध प्यायचं असेल तर जास्त सुका मेवा न खाता तो एकत्र करून त्याची भरड पूड करावी आणि ती एक चमचा दुधात मिसळून दूध प्यावे.

10. दही खाण्याने बऱ्याच जणांना पित्त होते त्यांनी दही टाळावेच, काही जणांना सर्दी,खोकल्याचा त्रास असतो त्यांनीही दही खाऊ नये तर रुम टेम्प्रेचरचे दही भरपूर पाणी घालून पातळ ताक बनवून ते प्यावे म्हणजे बाधत नाही, रात्री ताकही नकोच!

11.  भुकेची संवेदना होऊ नये किंवा भूक मरावी (?)या उद्देशाने काही जणी थोड्या थोड्या वेळाने चहा किंवा कॉफी पितात ,हे तर अतिशय चुकीचे आहे.यामुळे जठराच्या अंत:त्वचेवर विपरीत परिणाम होतो व अल्सर सारखे त्रास उद्भवू शकतात.छातीत, पोटात जळजळ होणे,मळमळ होणे ही तर यामुळे आढळणारी सर्वसामान्य  लक्षणं आहेत.

(लेखिका प्रसिध्द आयुर्वेद तज्ज्ञ आहेत.)

rajashree.abhay@gmail.comrajashree.abhay@gmail.com