Join us  

पुरुषांनी भांडी घासण्यात काय कमीपणा आहे? मिलिंद सोमणच्या जाहिरातीच्या निमित्ताने नवा वाद, मतांचा खडखडाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2022 3:32 PM

Milind Soman Advertisement भांडी घासणं हे बायकांचंच काम असं मानण्याची वृत्ती कधी बदलणार हा खरा प्रश्न आहे.

वयाच्या पन्नाशीतही हॉट दिसणारा मिलिंद सोमण हा कायमच चर्चेत असतो. आजही तो तरुणींना आवडतो, पुरुषांना कॉम्प्लेक्स देतो. मॅराथॉन पळतो, बायकोसाठी प्रेमळ रोमॅण्टिक पोस्ट लिहितो आणि त्याचा फिटनेस आणि लूक्स असा की क्षणात कुणालाही इम्प्रेस करतो. पण मिलिंद सोमण भांडी घासतो का? म्हणजे खरंतर काहीच हरकत नाही. ग्रॅण्डस्लॅम जिंकून घरी गेलेला जोकोविचही दुसऱ्या दिवशी शांतपणे भांडी घासत असल्याचा फोटो त्याची बायको पोस्ट करते. त्यामुळे सोमण भांडी घासत असेल तर त्यात चूक काही नाही. पण हा विषय वेगळाच आहे, सोमणने केलेली भांड्याची साबणाची ॲड चर्चेत आहे. कुणी म्हणतं सोमणसारखा कुणी आयुष्यात असेल तर कोण त्याला भांडी घासायला लावेल तर कुणी म्हणतोय आता हा सोमण पुरुषांना भांडीच घासायला लावणार!निमित्त आहे सध्या चर्चेत असलेली एक जाहिरात. विम लिक्विड आणि बारची म्हणजे भांडी घासण्याच्या लिक्विडची ही जाहिरात.पुरुषांनीही भांडी घासावी, भांडी घासणं हे काही फक्त बायकांचंच काम नाही असं ही जाहिरात सांगते. अर्थात तरी कुणीकुणी आक्षेप घेतलेच की ही जाहिरात लिंगभेद करतेय.

पुरुषांसाठी कशाला हवा वेगळा भांडी घासण्याचा साबण?

अर्थात विमने आपलं स्पष्टीकरणही दिलं आहे की, बाटली वेगळी आहे साबण तोच आहे. अत्यंत चुरचुरीत भाषेत विमने सोशल मीडियात पोस्ट केली की भांडी पुरुषांनीही जरुर घासावीत. यानिमित्ताने भांडी घासणं हा जीवंत प्रश्न सोशल मीडियात चर्चेत आला हे काय कमी आहे? मात्र यासाऱ्यात युजर्सच्या प्रतिक्रिया भन्नाट आहे.

कुणाकुणाला चकचकीत सोमण भांडी घासतो हे काही झेपलं नाही. कुणी कुणी बायका तर म्हणतातही की, असा देखणा नवरा असेल आणि तो भांडीही घासणार असेल तर अजून काय हवं? काही पुरुषांना मात्र काळजीच वाटली की आता बायको आपल्या मागे लागेल की एवढा सोमण भांडी घासतो तर तुला काय प्रॉब्लम आहे?

गंमत बाजूला ठेवू पण खरंच हा प्रश्न महत्त्वाचा आहे की जेवायला जर स्त्री पुुरुष दोघांना लागतं तर भांडी बायकांनीच घासावी असं अलिखित नियम असल्यासारखं कितीकाळ घरोघरी चालेल? पुरुषांनीही भांडी घासली तरी काय हरकत आहे. घर दोघांचं, घरकाम दोघांचं हे आपण कधी मान्य करणार? आपल्याच घरातली भांडी घासण्यात कसला आलाय कमीपणा? निदान जाहिरातीच्या निमित्ताने हा जुनाच विषय पुन्हा चर्चेत आला आणि त्यातून जर कामाकडे जेंडरलेस म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन मिळाला तर काय हरकत आहे.

टॅग्स :मिलिंद सोमण सोशल व्हायरलमाध्यमे