Join us  

सुश्मिता सेनने केली दुर्मिळ आजारावर मात, बरं होण्यासाठी केलं नूनचाकू मेडिटेशन! ते काय असतं नक्की?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 5:37 PM

2014 च्या सप्टेंबरमधे सुश्मिताला ‘अँडिसन’ नावाचा दुर्मिळ समजल्या जाणार्‍या आजाराचं निदान झालं. या दुर्मिळ आणि जीवघेण्या आजाराशी लढण्यासाठी सुश्मिताला तिच्या खंबीर मनानं आणि नूनचाकूनं साथ दिली.

ठळक मुद्देसुश्मिता म्हणते या आजाराबद्दल बोलण्याची ताकद शरीरात यायला पाच सहा वर्ष लागली.अँडिसन हा अंत:स्त्रावी ग्रंथीशी निगडित असलेला दुर्मिळ आजार आहे.आज अवघड आजारपणातून बाहेर आलेली सुश्मिता सेन पहिल्यापेक्षाही जास्त कणखर झाली आहे.

आजारपण हा माणसाच्या आयुष्यातला असा टप्पा असतो जो शरीरासोबतच मनावरही परिणाम करत असतो. हेच आजारपण जर जीवघेणं असेल तर मग शरीर आणि मनाची ताकद पुन्हा येतेच असं नाही, जगण्यावर प्रेम करावं, आनंदानं जगावंसं वाटावं या जाणिवा शिल्लक राहतातच असं नाही. अनेक आजारापणात तुमच्याकडे कितीही पैसे असले तरी आजार बरा होण्याची शक्यता नसते. अशा वेळेस हातपाय गाळलेल्या शरीराला उठून उभं करण्याची ताकद असते ती फक्त आपल्या मनाकडेच. मनानं जर ठरवलं तर औषधांच्या बळावर शरीर आजारातून बाहेर पडू शकतं. शरीराला मनानं ताकद पुरवावी इतकं सार्मथ्य तेव्हा मनाला दाखवावं लागतं. मिस युनिव्हर्स आणि प्रसिध्द अभिनेत्री सुश्मिता सेननं हेच मनाचं सार्मथ्य दाखवलं आणि एका दुर्मिळ आजारातून सुश्मिता बाहेर पडू शकली.

Image: Google

काय झालं होतं सुश्मिता सेनला?

2014 च्या सप्टेंबरमधे सुश्मिताला ‘अँडिसन’ नावाचा दुर्मिळ समजल्या जाणार्‍या आजाराचं निदान झालं. किडनीशी संबंधित असलेल्या या आजारानं सुश्मिता पार कोसळली. सुश्मिता आपल्या आजारपणाबद्दल माहिती देतांना सांगते की,  ‘ या आजाराशी लढण्याची ताकद माझ्या शरीरात शिल्लक राहिली नव्हती. माझं शरीर खूप थकलं होतं. या थकलेल्या शरीरात केवळ निराशा आणि आक्रमकता शिल्लक होती. मन संवेदनशील झालं होतं आणि या आजारामुळे होणार्‍या त्रासानं खूप संतापही होता मनात. चेहेरा काळवंडला, डोळ्यांखाली काळी वर्तुळं आली. या आजारपणाबद्दल तेव्हा बोलण्याची देखील हिंमत नव्हती माझ्यात. ती कमावण्यासाठी पाच ते सहा वर्ष लागली मला! स्टिरिऑइडसमुळे साइड इफेक्टस व्हायला लागले. याच्यापेक्षा कोणता थकवणारा आजार नसूच शकतो असं वाटायला लागलं!’

या अवघड आजारानं सुश्मिताच्या शरीरातील ताकद काढून घेतली असली तरी तिच्या मनातली लढण्याची, तगून राहाण्याची जिद्द संपली नव्हती. तिने कितीही त्रास होत असला तरी आपण आपल्या मनातली आशा मरु द्यायची नाही असा निश्चय केला. तिच्या या निश्चयाला ‘नूनचाकू’ या ध्यानधारणेनं बळ दिलं. मनाचा निर्धार, औषधं, व्यायाम आणि नूनचाकू यांच्या बळावर सुश्मिता या जीवघेण्या आणि दुर्मिळ आजारातून बाहेर पडली. सुश्मिता म्हणते, ‘नूनचाकूनं मला वेदनांशी लढायला शिकवलं, माझ्या शरीरातल्या वेदनांचं रुपांतर कलेत झालं. माझी निद्रिस्त झालेली अँड्रेनल ग्रंथी जागी झाली. मला स्टिरिऑइडची गरज राहिली नाही. या आजारपणाची एकही खूण मागे राहिली नाही!’

आज अवघड आजारपणातून बाहेर आलेली सुश्मिता सेन पहिल्यापेक्षाही जास्त कणखर झाली आहे. सुश्मिताच्या मते आपलं मन आपल्या ताकदीचा मुख्य स्त्रोत असतो. म्हणून मनातली आशा कधीच सोडायची नाही.आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीराचं ऐकायला शिकावं. ते ऐकण्यास उशीर झाला तर मग परिस्थिती गंभीर होते.

Image: Google

सुश्मिताला झालेला हा ‘अँडिसन’ आजार आहे काय ?अँडिसन हा अंत:स्त्रावी ग्रंथीशी निगडित असलेला दुर्मिळ आजार आहे. यात उजव्या किडनीच्या अँड्रेनल ग्रंथीतून अँड्रेनलाइन आणि कॉर्टिसॉल हे हार्मोन स्त्रवायचं थांबतं. अँडिसन आजार हा ‘अँड्रेनल इन्सफिशयन्सि’ या नावानंही ओळखला जातो. हा आजार कोणत्याही वयोगटातील स्त्री पुरुषाला होवू शकतो.

अँडिसन ची लक्षणं काय?

1. अत्यंत थकवा जाणवणं.2. भूक कमी लागणं.3. वजन कमी होणं.4. मीठ आणि खारट पदार्थ खाण्याची इच्छा होणं.5. रक्तदाब कमी होणं.6. रक्तातील साखर कमी होणं.7. मळमळ उलट्या होणं.8. डोळ्यांखाली काळी वर्तुळं येणं.9. डिप्रेशन येणं.10. पोटदुखी होणं.11. स्नायू आणि सांध्यामधे वेदना होणं.12. भोवळ येणं.13. स्त्रियांमधील लैंगिक इच्छा कमी होणं.

जादू करणारा ‘नूनचाकू’ आहे काय?

नूनचाकू हा एक जपानी मार्शल आर्ट प्रकार आहे. तो ओकिनवान या नावानेही ओळखला जातो. यात हातात धरायच्या दोन काठ्या असतात ज्या एका चेनने जोडलेल्या असतात.नूनचाकू हा मूव्हिंग मेडिटेशनचा प्रकार मानला जातो. फिटनेस वाढवण्यासाठी नूनचाकूचा सराव केला जातो.

Image: Google

नूनचाकूमुळे होतं काय?

1. शरीराच्या हालचाली विशेषत: हाताच्या हालचाली वेगानं होतात. 2. शरीराची ठेवण सुधारते.3. नूनचाकू हे कौशल्यावर आधारित मेडिटेशन प्रकार असल्यामुळे आपल्यातील सर्जनशीलता वाढते.4. शरीर आणि मनावरचा ताण निघून जातो.5. मनातील भीती आणि आक्रमकता कमी होते.