Join us  

वय फक्त ९५ वर्षे, काय आहे इंग्लंडच्या राणीच्या दीर्घायुष्याचं रहस्य? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2021 1:00 AM

ब्रिटिश राजघराण्याचे दीर्घकाळ अभ्यासक असलेले ब्रायन कोझ्लोवस्की यांनी ‘लाँग लिव्ह द क्वीन..’ नावाचं एक पुस्तक नुकतंच लिहिलं आहे. त्यात त्यांनी राणीच्या दीर्घायुष्याची काही रहस्य उघड केली आहेत...

ठळक मुद्देणीपदाचा प्रत्यक्ष मुकुट त्यांना २ जून १९५३ रोजी चढवण्यात आला. तेव्हापासून अखंडितपणे त्या राजगादी सांभाळत आहेत.

ब्रिटिश राजघराण्यात अनेक रहस्यं दडलेली आहेत. त्यांतील कित्येक रहस्यं आजवर बाहेर आलेली नाहीत; पण त्या रहस्यांविषयी अख्ख्या जगभरात कुतूहल आहे. त्यांतील एक ‘उघड’ रहस्य आहे, ते म्हणजे ब्रिटिश राजघराण्यातील लोकांचं दीर्घायुष्य! त्याचं सध्याचं जितंजागतं उदाहरण म्हणजे ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ दुसरी. राणी एलिझाबेथचं वय आत्ताच ९५ वर्षे आहे आणि त्या वयाची शंभरी सहज ओलांडतील याविषयी अनेकांना शंका नाही. कारण या वयात अजूनही त्या फिट आहेत. गेली ६९ वर्षे झाली, त्या ब्रिटनच्या राजघराण्याची गादी सांभाळताहेत. राजघराण्यातील कोणत्याही व्यक्तीनं आजवर इतका काळ राज्य केलेलं नाही. त्यांच्याआधी त्यांच्या खापरपणजीनं ६३ वर्षे राजगादी सांभाळण्याचा विक्रम केला होता. राणी एलिझाबेथ दुसरी यांचा जन्म २१ एप्रिल १९२६ रोजी झाला. त्यांचे वडील किंग जॉर्ज सहावे यांचा मृत्यू झाल्यानंतर ६ फेब्रुवारी १९५२ रोजी त्या राणी झाल्या; पण राणीपदाचा प्रत्यक्ष मुकुट त्यांना २ जून १९५३ रोजी चढवण्यात आला. तेव्हापासून अखंडितपणे त्या राजगादी सांभाळत आहेत.त्यांच्या दीर्घायुष्याचं आणि ‘तारुण्या’चं रहस्य काय आहे, याबाबत ब्रिटिश राजघराण्याचे दीर्घकाळ अभ्यासक असलेले ब्रायन कोझ्लोवस्की यांनी ‘लाँग लिव्ह द क्वीन..’ नावाचं एक पुस्तक नुकतंच लिहिलं आहे. त्यात त्यांनी राणीच्या दीर्घायुष्याची काही रहस्य उघड केली आहेत... काय आहेत ही रहस्यं?

१. नियमित व्यायाम

राणी एलिझाबेथ शंभरीच्या उंबरठ्यावर असल्या तरी अजूनही त्या मोजका, पण नियमित व्यायाम करतात. त्यांच्या कपाळावर आठ्यांचं जाळं दिसत नाही, हातपाय सुरकुतलेले नाहीत, याचं महत्त्वाचं कारण हेच. चालायला जाणं, बग्गीतून सकाळी रपेट मारणं हे त्यांनी अजूनही सोडलेलं नाही. संशोधकांचं म्हणणं आहे, अशा प्रकारच्या व्यायामामुळे तुमच्या वयालाच केवळ अटकाव बसत नाही, तर तुम्ही आनंदीही राहता.

२- आहारावर विलक्षण नियंत्रण

राणी एलिझाबेथ यांचा आहार अत्यंत मोजका आणि पौष्टिक आहे. दुसरं महायुद्ध झालं, त्यावेळी त्या टिनेजर होत्या. लोकांना बसलेले भुकेचे चटके त्यांनी अनुभवलेेले आहेत. एवढंच नाही, अन्नाचं ‘रेशनिंग’ त्यांनाही करावं लागलेलं आहे. अतिशय साधं, सात्त्विक अन्न त्या खातात. दार्जिलिंगचा चहा त्यांना विशेष आवडतो. दुपारी या चहाबरोबर सँडविच आणि सातूच्या पिठापासून तयार केलेला ‘केक’ त्यांना पसंत आहे. मद्याचा पेला उंचावणारे राजघराण्यातले लोक... ही गोष्टही अनेकांना नवी नाही. त्यानुसार राणी एलिझाबेथ यांनाही मद्याचे मोजके घुटके घ्यायला आवडतं. सकाळच्या वेळी थोडं जीन कॉकटेल, दुपारी जेवणाच्या वेळी थोडी वाईन किंवा शॅम्पेन आणि संध्याकाळी ‘ड्राय मार्टिनी’चे काही घुटके अशी त्यांची दिनचर्या आहे. जेवण मात्र त्या अगदी जपूनच करतात.

३. सौंदर्याची पथ्यं

राजघराण्यानं आजवर कधीही मोठ्या ब्रँडच्या सौंदर्यप्रसाधनांवर आपल्या पसंतीची ‘शाही मोहोर’ उमटवलेली नाही. राणीही त्याला अपवाद नाही. मुळात जास्त मेकअप त्यांना आवडतच नाही. गुलाबाच्या दुधाचं मॉइश्चरायझर मात्र त्या आवर्जून वापरतात. कडक उन्हापासूनही त्यांनी स्वत:ला नेहमीच जपलं आहे.

४. तरतरीत मेंदू

राणी एलिझाबेथ यांनी आपल्या मेंदूला कधीच आळसावू दिलं नाही. आज या वयातही त्या प्रचंड वाचन करतात. त्यात संसदेच्या अहवालांपासून ते विविध प्रकारच्या गुप्तचर दस्तऐवजांपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश असतो. सकाळी नाश्त्याच्या वेळी त्यांचं पेपरवाचन कधीही चुकलेलं नाही. त्यामुळे राजकीय आणि सामाजिक घडामोडींबाबत त्या कायमच अपडेट असतात.

५. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड

कितीही अडचणी आल्या, कठीण परिस्थितीला तोंड द्यावं लागलं तरी ‘पेला अर्धा भरलेला आहे’, ही सकारात्मक दृष्टी त्यांनी कधीच सोडली नाही. बदलांना प्रतिकार करण्यापेक्षा त्यांनी नेहमीच त्याच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ताणापासून त्यांनी स्वत:ला कायमच मुक्त ठेवलं आहे.

टॅग्स :इंग्लंड