Join us  

आइस्क्रिम इडली! इडली आइस्क्रिमच्या काडीवर, मग उपमा कोनात देणार का?- आता इडलीही बिघडली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2021 6:26 PM

‘इडली ऑन स्टिक’ या नवीन रुपातल्या इडलीचा फोटो व्हायरल झाला आणि समाजमाध्यमांवर कौतुकाच्या, टीकेच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडायला लागला. इडलीच्या या नवीन रुपाबद्दल लोकं काय म्हणताय?

ठळक मुद्देक्रिएटिव्हिटीच्या नावाखाली डोशांवर एवढे प्रयोग झाले आहे की डोसा म्हटलं की गोंधळायला होतं. पण किमान या इडलीला आहे तसंच राहू द्या!आइस्क्रिमच्या प्रेमात असणार्‍यांना ही आइस्क्रिम इडली आयडिया नक्की आवडणार!इनोव्हेशनच्या नावाखाली आइस्क्रिम स्टिक इडली करुन झाडांपासून तयार झालेल्या या काड्या नाहक वाया घालवल्या आहेत. 

इडली कशी गोल,गरगरीत आणि फुगलेली हवी.पण सध्या इंटरनेटवर, समाजमाध्यमांवर इडलीच वेगळंच रुप पाहायला मिळतंय. तो फोटो पाहून आधी आइस्क्रिम कॅण्डीजवळ सांबार आणि चटणी का बरं असेल असा प्रश्न मनात पडतो ना पडतो की लगेच त्या फोटोखालची ओळ वाचून अवाक व्हायला झालं. हेच ते इडलीचं नवीन रुपडं आइस्क्रिमच्या वेषातलं. बंगळूरुमधील एका रेस्टॉरण्टनं इडली इनोव्हेशनच्या नावानं ही आइस्क्रिमसारखी दिसणारी ‘इडली ऑन स्टिक’ तयार केली आहे.

ही नवीन स्वरुपातली इडली इंटरनेटवरुन समाज माध्यमांच्याद्वारे देशभर पसरली असून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. काहींनी या नव्या स्वरुपातल्या इडलीबद्दल कुतुहल व्यक्त केलंय तर कोणी आनंद तर कोणी यावर भरपूर टीका देखील केली आहे.

पोळी, भात या भारतातल्या मुख्य पदार्थांचं रुप बदलू शकतं, नवीन रुपातली पोळी,भाताचे वेगवेगळे प्रकार खायला मजा येते तर मग इडलीचं रुप बदललं तर काय बिघडलं असा सवाल करत काडीवरील इडलीला काहींनी जोरदार सर्मथन दिलं आहे.

Image: Google

महिन्द्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिन्द्रा यांनी आइस्क्रिम इडलीचा फोटो शेअर करत हे काय बरं असावं? असं विचारत इडलीचं हे रुपडं आपल्याला आवडलं असल्याचं ट्वीट केलंय. आनंद महिन्द्रा म्हणतात की बंगळुरु ही प्रयोगाची राजधानी आहे. नवनवीन गोष्टी शोधण्यास तिला कोणीच रोखू शकत नाही. बंगळुरुनं अनपेक्षित अशा फूड क्षेत्रातही नवीन प्रयोग करुन दाखवला आहे असं म्हणत काडीवरील इडली आणि सोबत सांबार आणि चटणी हे डिपसारखे ठेवलेला फोटो शेअर करत याच्या बाजूने कोण? आणि कोण याच्याविरुध्द? असा प्रश्न विचारला आहे.आनंद महिन्द्रा यांनी अशा प्रकारे इडलीच्या या नवीन रुपावर लोकांना अभिव्यक्त होण्यास प्रोत्साहन दिलं आणि लोकांनीही आपल्या प्रतिक्रिया मोकळेपणानं ट्ट्विटरवर व्यक्त केल्या. कॉंग्रेस नेते यांनी देखील आइस्क्रिम इडलीचा फोटो पोस्ट करुन हे हास्यास्पद आहे पण फारच प्रॅक्टिकल असल्याचं म्हटलं आहे.

आइस्क्रिम इडलीवर लोकं काय म्हणताय?

1. बंगळुरु आणि नाविन्यपूर्ण अन्न हे समीकरणच आहे असं म्हणत या आइस्क्रिम इडलीच्या रुपातल्या इडलीचं एकानं स्वागत केलं आहे.

2. एक जण काकुळतीला येऊन म्हणतोय की, ‘ अरे यार या इडलीला तरी इनोव्हेशनच्या खेळातून सोडा. क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली डोशांवर एवढे प्रयोग झाले आहे की डोसा म्हटलं की गोंधळायला होतं. पण किमान या इडलीला आहे तसंच राहू द्या, इनोव्हेशनच्या नावाखाली तिचं गोल गरगरीत रुपडं खराब करु नका’.

3. काडीवरील आइस्क्रिम रुपातली इडली पाहून एकाचा जीव झाडांसाठी तुटला. ‘इनोव्हेशनच्या नावाखाली आइस्क्रिम स्टिक इडली करुन झाडांपासून तयार झालेल्या या काड्या नाहक वाया घालवल्या आहेत.’ झाडं वाचवून लाकडाला काही तरी पर्याय शोधण्याची वेळ असताना इनोव्हेशनच्या नावाखाली झाडांपासून तयार झालेल्या गोष्टींचा दुरुपयोग काहींना अजिबात पटला नाही.

4. ‘idliforlife’ असा हॅशटॅग देत बंगळुरुने अगदी स्मार्ट चाल खेळल्याचं म्हटलंय. आइस्क्रिमच्या प्रेमात असणार्‍यांना ही आइस्क्रिम इडली आयडिया नक्की आवडणार असं म्हणत ती कशी केली आणि आता या रेस्टॉरण्टची पुढची आयडिया काय असे उत्सुकता निर्माण करणारे प्रश्न विचारले आहेत.

Image: Google

5. एकानं तर आइस्क्रिम रुपातली ही इडली म्हणजे गहजब आहे असं म्हणत ही अशी इडली दक्षिण भारतात दंगल घडवून आणेल असं गंमतीनं म्हटलं आहे. पण कल्पना एकदम चांगली आहे. ही इडली खाण्याआधी मुलांना किमान हात तरी धुवावे लागणार नाहीत असं म्हटलं आहे.

6. काडीवरची ही इडली पाहून एकानं अशी इडली कधी पाहायला मिळेल असा विचारच केला नव्हता असं म्हटलंय. ही इडली कमी पण नारळाचं आइस्क्रिम जास्त वाटतं अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

7. एका महिलेने ट्विटरवरील आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे की, ‘मला कुणी जुन्या विचारांची म्हणू देत , पण मला इडली ही गोल आणि टम्म फुगलेलीच आणि हातानेच खायला आवडेल. काडीवर मला एकच गोष्ट आवडेल ती म्हणजे आइस्क्रिम.’8. इडली जर आइस्क्रिमच्या काडीवर तर उपमा, पोहे काय आइस्क्रिमच्या कोनात देणार का? असा प्रश्न विचारत या कल्पनेची कोणी खिल्लीही उडवली आहे.