Join us  

महागड्या, रेशमी साड्या नुसत्या कपाटात पडून आहेत, खराब झाल्या तर? ११ गोष्टी साड्या जपतील..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 6:28 PM

साड्या नेसायला आवडतात पण त्या बरेच दिवस पडून राहिल्या तर खराबही होतात, पाहूया कशी घ्यायची साड्यांची काळजी

ठळक मुद्देपाहूयात साड्या, धुताना, ठेवताना, इस्त्री करताना त्यांची कशापद्धतीने काळजी घ्यायला हवीहजारो रुपयांच्या साड्या खराब झाल्या तर, असे होऊ नये म्हणून काय करावे याविषयी...

साडी हा महिलांचा वीक पॉईंट. अगदी समजायला लागल्यापासून नेसायला लागलेली साडी ते वयाची कितीही वर्षे गाठली तरी त्यांचे साडीप्रेम काही कमी होत नाही. साडीच्या दुकानात गेले की किती साड्या घेऊ नी किती नको असे होऊन जाते. मग महिला सणवार, लग्नकार्य इतर काही समारंभ अशी कारणेच शोधत असतात. काठापदराच्या, कॉटनच्या, भरजरी, डिझायनर, रोज वापरायच्या अशा एक ना अनेक प्रकारच्या साड्या या महिला घेतात खऱ्या. पण या साड्या काही कारणांनी खराब झाल्या तर मात्र त्यांच्या मनाला हुरहूर लागून राहते. कधी वापर कमी असला तर किंवा कधी खूप जास्त साड्या असतील तर साड्या कपाटात किंवा बॅगेत पडून राहतात. मग त्या खराब होण्याची शक्यता असते. आता या साड्या खराब होऊ नयेत म्हणून त्यांची योग्य पद्धतीने काळजी तर घ्यायला हवीच ना. पाहूयात साड्या, धुताना, ठेवताना, इस्त्री करताना त्यांची कशापद्धतीने काळजी घ्यायला हवी...

(Image : Google)

१. अनेकदा साड्यांना वास येतो म्हणून आपण त्यात डांबरगोळ्या ठेवतो पण डांबराच्या गोळ्या थेट न ठेवता कापडात बांधून ठेवाव्यात म्हणजे  साडीला डांबरगोळीचा वास येत नाही.  

२. साड्या जास्त नेसत नसाल तर मधेआधे त्या कपाटातून काढून त्याच्या घड्या मोडून ठेवाव्यात. सतत एकच घडी राहीली तर साडी त्या घडीवर विरण्याची शक्यता असते. 

३. साड्यांमध्ये कडूनिंबाची पाने ठेवल्यास साडीला ठेवणीतला वास लागत नाही. तसेच काही वेळा दमट हवामानामुळे साड्यांना भुरा येण्याचीही शक्यता असते पण कडुनिंबामुळे साड्यांचा या सगळ्यापासून बचाव होतो. 

४. भरजरी साड्यांना घरी इस्त्री करत असाल तर थेट साडीवर इस्त्री न ठेवता साडीवर एखादा सुती कपडा घालावा आणि त्यावरुन इस्त्री फिरवावी. त्यामुळे साडी जळण्याची शक्यता राहत नाही. 

५. डिझायनर साडी असेल तर डिझाईन आतल्या बाजुला येईल अशापद्धतीने साडीची घडी घालावी. जेणेकरुन ते डिझाईन एकमेकांत अडकणार नाही आणि साडी खराब होणार नाही 

६. सिल्कच्या किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या साड्या सुती कापडात किंवा चांगल्या प्रतीच्या साडी बॉक्समध्ये व्यव्स्थित ठेवाव्यात. जेणेकरुन त्या जास्त काळ चांगल्या राहण्यास मदत होईल.  

(Image : Google)

७. साड्या कपाटात किंवा साडी बॉक्समध्ये असल्याने त्यांना मधेआधे हवा लागेल अशी सोय करावी. अन्यथा हा साडी बॉक्स चक्क काढून साड्या काही वेळ वेगवेगळ्या पसरवून फॅनखाली ठेवाव्यात. त्यामुळे साड्यांमध्ये आर्द्रता निर्माण झाली असेल तर ती जाऊन त्या कोरड्या होण्यास मदत होते. पावसाळ्याच्या आधी हे आवर्जून करावे, त्यामुळे साड्यांना हवा लागते आणि त्या दमट होऊन खराब होत नाहीत. 

८. साड्या शक्यतो मशीनमध्ये धुवायला टाकू नयेत. तसेच साडीला ब्रश लावणे टाळावे. साडी धुताना हलक्या हाताने ङासून साडीचे डाग काढावेत. शक्यतो पहिल्या वेळेस साडी ड्रायक्लीनलाच टाकलेली केव्हाही चांगली. 

९. साडी वाळत घालायची असल्यास ती कडक ऊन्हात न घालता सावलीत वाळत घालावी. त्यामुळे साडीची चमक टिकून राहण्यास मदत होते.

१०. सिल्कच्या साड्या टिश्यू पेपर किंवा बटर पेपरमध्ये ठेवाव्यात त्यामुळे कपड्यात चुकून ओलसरपणा असेल तर तो शोषला जाण्यास मदत होते. 

११. कपाटातील साड्यांना वास येऊ नये म्हणून चंदनाचे लाकूड किंवा सोनचाफ्याच्या फुलांची पाने एका कापडात बांधून साड्यांमध्ये ठेवावीत. त्यामुळे साड्यांना ठेवणीतला वास येत नाही. तसेच हल्ली बाजारात काही पाऊचही मिळतात, जे कपड्यांत ठेवल्याने कपड्याला वास लागत नाही. 

 

टॅग्स :फॅशनमेकअप टिप्स