Join us  

आलिया भटचा इमोशनल सवाल, कन्यादान का म्हणता, दान करायला मुली वस्तू आहेत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 2:04 PM

कन्यादान हा शब्द ऐकला तरी अनेक महिलांना गहिवरून येते. हा शब्द महिलांवर अन्याय करणारा वाटू लागतो. म्हणूनच तर आलियाने उठवला आहे सवाल...

ठळक मुद्देअनेक ठिकाणी मुली आणि मुले कन्यादान करून घ्यायला आणि करू द्यायला विरोध करत आहेत. त्यामुळे अशा पुढारलेल्या, नव्या विचारांच्या मुलींना आलियाचा हा विचार निश्चितच प्रेरणादायी ठरणारा आहे. 

बॉलीवूडची बार्बी गर्ल आलिया भट नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी तिच्या फिटनेसच्या चर्चा रंगतात तर कधी तिने केलेले बोल्ड स्टेटमेंट्स चर्चेचा विषय ठरतात. तिचे चित्रपट आणि तिचे अफेअर याबाबत सध्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सूकता असते. सध्या आलिया अशाच एका जाहिरातीवरून गाजते आहे. यावेळी आलियाने जो प्रश्न उपस्थित केला आहे, तो मात्र प्रत्येक महिलेच्या जिव्हाळ्याचा आहे. अगदी तरूणींपासून ते वयोवृद्ध आजींपर्यंत अनेक जणींच्या जीवाची घालमेल करणारा हा विषय आहे. अशाच एका विषयावर आलियाने बोट ठेवले असून सवाल उठविला आहे.

 

आलिया भट सध्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या व्यस्ततेतून वेळ काढत आलियाने एका नावाजलेल्या कपड्याच्या ब्रॅण्डसाठी एका जाहिरातीचे शुटिंग केले आहे. ही जाहिरात अतिशय सुंदर आणि भावपुर्ण असून आलियाने या आधीही या ब्रॅण्डच्या जाहिराती केल्या आहेत. या जाहिरातीमध्ये आलिया नवरीच्या वेशभुषेत असून ती अतिशय सुंदर दिसत आहे. लाल रंगांचा घागरा घातलेल्या आलियाचे नवरीचे रूप अतिशय लक्षवेधी ठरले आहे. या जाहिरातीची सध्या सोशल मिडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे. त्याचे कारणही तसेच आहे.

 

या जाहिरातीत असे दाखविण्यात आले आहे की, नवरी असलेली आलिया अत्यंत सजून- धजून लग्न मंडपात येते आणि तिच्या होणाऱ्या पतीच्या बाजूला जाऊन बसते. लग्न मंडपात विविध विधी चालू असतात. आलियाच्या समाेर तिचा सगळा गोतावळा बसलेला असताे. जसेजसे लग्नाचे विधी होत असतात, तसेतसे आलियाला लग्न या विषयावर एक मुलगी म्हणून आतापर्यंत कोण- कोण काय- काय बोलले आहे, ते सगळे आठवत जाते. बालपणापासून अनेकदा तिने ऐकलेले असते की, मुलगी हे परक्याचे धन आहे.. पण मुलींना असं का म्हणतात, याबाबत ती दु:खी होते. 

 

लहानपणी कुणीतरी तिला म्हंटलेलं असतं की मुली तु जेव्हा तुझ्या घरी जाशील तेव्हा... पण माझं घर कोणतं? माझ्या आई- वडिलांचं घर हे माझं घर नाही का? असे अनेक प्रश्न तिच्या मनात रूंजी घालत असतात आणि ती ते सगळं आठवून हळवी होत असते. अशातच कन्यादानाचा विधी सुरू होतो. हा विधी करताना वधुपिता आपल्या लेकीचा हात नवरदेवाच्या हातात देत असतो.. हा विधी सुरू होताना अचानक नवरदेवाची आई थांबते आणि मुलाला एकट्याला हात पुढे करू देण्याऐवजी ते सगळे कुटूंबच हातात हात घेतात. पारंपरिक विधींना फाटा समोर आलेला हा नवा विचार आलियाला सुखावून टाकतो आणि ती मोठ्या आनंदाने आणि तेवढ्याच अभिमानाने म्हणते की, कन्यादान का म्हणता?, कन्यामान म्हणा. आमचे दान करायला किंवा आम्हाला असे कुणाला तरी देऊन टाकायला आम्ही काही एखादी वस्तू आहोत का? या जाहिरातीद्वारे आलियाने उठविलेला हा सवाल आणि रूजवलेला नवा विचार प्रत्येक महिलेलाच सुखावणारा आहे.

 

कन्यादान हा शब्द प्रत्येक मुलीसाठी अतिशय बोचरा आहे. हा शब्द ऐकताच प्रत्येक मुलीला एकदा तरी मनातून नक्कीच वाटून जाते की आपले दान का करायचे? असं कुणाला तरी आता कायमसाठी देऊन टाकायला आपण काय एखादी निर्जिव वस्तू आहोत का? माझ्या लग्नात मी अशा गोष्टी अजिबात होऊ देणार नाही, असे अनेक जणी लग्नापुर्वी मोठ्या निश्चयाने ठरवतात. पण जसे लग्न ठरते, तसे प्रत्येकाचे मन सांभाळण्याची प्रक्रिया सुरू होते. मग आपले विचार एकदोनदा घरच्या मोठ्या मंडळींपुढे मांडलेही जातात. पण जुन्या विचारांचा आणि रूढींचा पगडा अनेकांच्या मनावर असल्याने त्यांना मुलींचे हे नवे विचार पटत नाहीत आणि मग शेवटी मुलींनाच माघार घ्यावी लागते. 

 

पण हल्ली बऱ्याच मोठ्या शहरांमधून हा विचार पुढे येत आहे. अनेक ठिकाणी मुली आणि मुले कन्यादान करून घ्यायला आणि करू द्यायला विरोध करत आहेत. त्यामुळे अशा पुढारलेल्या, नव्या विचारांच्या मुलींना आलियाचा हा विचार निश्चितच प्रेरणादायी ठरणारा आहे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलआलिया भटसेलिब्रिटी