Join us  

आईवडील गमावले तरी लहान लेकरू वाटतंय आनंद; ते पाहून आनंद महिंद्राही म्हणाले..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2022 6:03 PM

आईवडील गेल्यानंतरही ६ वर्षांचा मुलगा दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरवण्यासाठी करतो हे काम...

ठळक मुद्देलहान मुले आपल्या वागण्यातून अनेकदा आपल्याला खूप मोठ्या गोष्टी शिकवून जातात सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरांना प्रेरणा देण्याचे काम आनंद महिंद्रा अतिशय चांगल्या पद्धतीने करत असतात

लहान मुलांची निरागसता अनेकदा शब्दांत मांडता येत नाही. आपल्या निरागसपणाने ते कायम आपल्या आजुबाजूला आनंद पेरत असतात. महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियावर बरेच अॅक्टीव्ह असल्याचे आपल्याला माहित आहे. ते आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सतत काही ना काही प्रेरणादायी गोष्टी शेअर करत असतात. त्यांनी शेअर केलेल्या या पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही होतात. नुकताच आनंद महिंद्रांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक अतिशय भावूक करणारा व्हिडिओ शेअर केला असून सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. आता हा व्हिडिओ इतका व्हायरल होत आहे तर त्यामागची नेमकी स्टोरी काय आहे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. 

तर जॅक हाईस नावाच्या ६ वर्षाच्या मुलाची स्टोरी या व्हिडिओमध्ये सांगण्यात आली आहे. या मुलाचे पालक अचानक जग सोडून जातात मात्र त्याची जगण्याची जिद्द आणि धाडस खरंच कौतुकास्पद आहे. कारण आपले आईवडिल गेल्यानंतरही जॅक म्हणतो मृत्यू कोणालाही येऊ शकतो. आईवडिल गेल्यानंतर त्याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. आपल्या आजुबाजूच्या सगळ्यांना दु:खात पाहून जॅक आजारीही पडला. मात्र त्यानंतर त्याने स्वत:च आपल्या या परिस्थितीवर मात करायची ठरवली. तो आपण राहत असलेल्या ठिकाणी रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना खेळणी वाटायचा. तू हे काय करतोयस असे जेव्हा त्याला त्याच्या समुपदेशकाने विचारले तेव्हा लोकांना हसवण्याचा प्रयत्न करत असल्याचे उत्तर जॅकने दिले. 

लहान मुले आनंदी कसे राहायचे हे शिकवणारे उत्तम शिक्षक असतात. जग कसे असायला हवे याची आठवण ते आपल्याला करुन देतात असे आनंद महिंद्रा यांनी आपल्या पोस्टला कॅप्शन देताना म्हटले आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास ६० हजार जणांनी पाहिला असून आनंद महिंद्रांनी तो ट्विट केल्यावर त्यावर प्रतिक्रियांचा अक्षरश: पाऊस पडला आहे. या मुलाच्या धैऱ्याचे आणि त्याच्या आनंद पसरवण्याच्या गोष्टीचे नेटीझन्सकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. २.१९ मिनीटांचा हा व्हिडिओ निराशेमध्ये असलेल्या अनेकांसाठी खऱ्या अर्थाने प्रेरणा देणारा असून लहान मुले आपल्या वागण्यातून अनेकदा आपल्याला खूप मोठ्या गोष्टी शिकवून जातात हेच यातून दिसून येते.