Join us  

येतं सगळं पण कॉन्फिडन्सच मार खातो? आत्मविश्वास वाढविण्यासाठी ५ सोप्या टिप्स, घ्या बिंधास्त भरारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2022 1:01 PM

How To Increase Confidence: बऱ्याच जणांच्या बाबतीत हा प्रॉब्लेम असतो. आपल्याला येतं तर सगळं, पण ते चारचौघांत आत्मविश्वासाने सांगण्याची वेळ आली की नेमका घोळ होतो.. म्हणूनच आत्मविश्वास वाढविण्यासाठी स्वत:मध्ये करा काही बदल.. 

ठळक मुद्देआत्मविश्वासाअभावी करिअरच्या, व्यक्तिगत आयुष्यातल्या अनेक संधी आपल्या हातातून निसटून जातात आणि मग नंतर त्या गोष्टींचा पश्चाताप होऊ लागतो.

''सगळं माहिती होतं मला... सगळं येत होतं.. त्यावेळी मी बोलले असते ना, तर आज...'', अशी वाक्ये आपण अनेक जणांच्या तोंडून ऐकलेली असतात. किंवा बऱ्याचदा आपण स्वत:ही तसं म्हटलेलं असतं.. आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचं ज्ञान असणं, सगळं माहिती असणं हे तर गरजेचं आहेच, पण त्यासोबतच आपल्याला जे येतं, ते इतरांसमोर प्रेझेंट करण्यासाठी आत्मविश्वासही तेवढाच गरजेचा आहे. आत्मविश्वासाअभावी करिअरच्या, व्यक्तिगत आयुष्यातल्या अनेक संधी आपल्या हातातून निसटून जातात आणि मग नंतर त्या गोष्टींचा पश्चाताप होऊ लागतो. म्हणूनच तर बघा हे काही सोपे उपाय आणि वाढवा तुमचा आत्मविश्वास.(5 tips to increase confidence level)

 

आत्मविश्वास वाढविण्यासाठी...१. स्वत:चा अभ्यास करा (observe yourself)बऱ्याच लोकांमध्ये आत्मविश्वास कमी असतो, कारण त्यांना स्वत:च्या दिसण्याविषयी, असण्याविषयी एकप्रकारचा कमीपणा किंवा न्यूनगंड वाटत असतो. आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे, असं सतत त्यांना वाटतं. त्यामुळे मग ते चारचौघांत बोलू शकत नाहीत. त्यामुळे एकदा थोडा वेळ काढा आणि स्वत:चं थोडं निरिक्षण करा. स्वत:विषयी अभ्यास करा आणि त्यातूनच हे शोधण्याचा प्रयत्न करा की नेमकं असं काय आहे, ज्यामुळे आपल्यातला कॉन्फिडन्स कमी होत आहे.

 

२. कमीपणा दूर करण्याचा प्रयत्न करा (work on your negative points)स्वत:चं निरिक्षण केल्यावर नक्कीच लक्षात येतं की नेमकं आपण कशाला घाबरतोय.. आपल्याला कशाचा कमीपणा वाटतोय.. ते कारण एकदा समजलं की मग आपल्यातला तो कमीपणा कसा दूर करता येईल हे तपासा आणि त्यावर काम करा.

 

३. व्यक्तिमत्त्व बदला (change in personality)एखाद्या दिवशी कॉलेजला किंवा ऑफिसला जाताना थोडे वेगळे कपडे घातले किंवा हेअरस्टाईल बदलली की आपण नेहमीपेक्षा जास्त छान दिसतो, असं फिलिंग आपल्याला येतं. असं स्वत:चं स्वत:ला जरी वाटलं तरी आपल्या चालण्या- बोलण्यात मग एक वेगळाच डौल येतो.. हा अनुभव प्रत्येकानेच कधी ना कधी घेतलेला असतो. आपल्यालाही नेमकं हेच करायचं आहे, पण दररोज. ड्रेसिंग स्टाईल, हेअरस्टाईल बदला, थोडं अप टू डेट आणि स्टायलिश रहा. केसांपासून ते चपल- बुटांपर्यंत आपलं सगळं परफेक्ट कसं होईल, याकडे थोडं लक्ष द्या. पार्लरमध्ये नियमित जा. या सगळ्या गोष्टी निरर्थक वाटत असल्या तरी त्यामुळे हळूहळू स्वत:बद्दल विश्वास वाटू लागतो आणि आत्मविश्वास जबरदस्त बुस्ट होतो. 

 

४. इंग्लिश मस्ट (focus on english)अनेक लोकांचा कॉन्फिडन्स जाण्याचं हेच एक मुख्य कारण असतं. त्यामुळे इंग्रजीवर अधिकाधिक फोकस करा. इंग्रजीचं वाचन वाढवा. जास्तीतजास्त इंग्रजी ऐका. त्यातुन आपोआपच शब्दसंग्रह वाढतो. शब्दसंग्रह वाढत गेला की इंग्रजी बोलणंही सोपं होतं. चार- दोन वाक्यही इंग्रजीतून बोलता आली की आपोआपच आत्मविश्वास वाढत जातो. 

 

५. स्वत:ला अपडेट करा (update yourself)आपण ज्या क्षेत्रात काम करतो किंवा जो कोणता आपला विषय आहे, त्याविषयी नेहमीच जास्तीतजास्त माहिती घेण्याचा आणि स्वत:ला अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करा. आत्मविश्वास वाढविण्यासाठी हे खूप गरजेचं आहे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलव्यक्तिमत्वइंग्रजी