Join us  

BTS Boys ना भेटण्यासाठी १४ हजार रुपये घेऊन घरातून पळाल्या ३ मुली, शेवटी के पॉपच्या वेडापायी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2024 12:35 PM

13 years Tamilnadu girls left home for south Korea to meet BTS Boyes : एखाद्या गोष्टीचे वेड असेल तर टिन एजर्स काय करु शकतात याचे उदाहरण...

BTS हा टीन एजर मधील अतिशय प्रसिद्ध के पॉप बँड आहे. या बँडला बंगटन बॉईज म्हणूनही ओळखले जाते. साऊथ कोरियन तरुणांचा हा बँड कोरियातच नाही तर जगातही प्रसिद्ध आहे. अनेक जण तर या बँड मधील गाण्यांची अक्षरशः पारायणे करतात.विविध संगीत प्रकारांचा संगम असलेला हा बँड त्यांचे संगीत आणि शैलीसाठी विशेष प्रसिद्ध आहे. यातील तरुणही देखणे असल्याने त्यांच्या फॅन फोलोईंगमध्ये मुलींची संख्या जास्त आहे. सध्या बहुतांश टीन एजर्समध्ये या बँडची क्रेझ असून त्यांची गाणी खूप जास्त प्रमाणात ऐकली जातात. अशा या कोरियन बँडमधील गायकांना भेटण्याची  इच्छा असणारे अनेक जण असतात. त्यासाठी काही जण प्रत्यक्षात कोरियाला जाण्याचाही प्लॅन करतात (13 years tamilnadu girls left home for south Korea to meet BTS Boyes) . 

अशीच इच्छा असलेल्या तामिळनाडू मधील ३ मुलींना हा बँड खूप आवडत असल्याने त्यांनीही साऊथ कोरियाची राजधानी असलेल्या सेऊलला जाण्याचा प्लॅन केला. इयत्ता आठवीमध्ये शिकत असणाऱ्या अवघ्या १३ वर्षाच्या या मुली एका सरकारी शाळेत शिकतात. या बँडमधील तरुणांना भेटायला जाण्यासाठी त्यांनी विमानाने न जाता जहाजाने जाण्याचे ठरवले. त्यासाठी ४ जानेवारी रोजी शाळेत जातो सांगून या मुली घरातून पळूनही आल्या. विशाखापट्टणम येथील बंदरावरुन आपण जाऊ असे त्यांनी ठरवले आणि मग त्या रेल्वेने चेन्नईला गेल्या. 

(Image : Google)

रात्री उशीरापर्यंत मुली घरी न परतल्याने कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी राज्यभरातील अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली आणि शोध मोहिम सुरू करण्यात आली. या मुलींकडे एकूण मिळून १४ हजार रुपये होते आणि या पैशांत आपण सेऊलला नक्की जाऊ शकू असा त्यांना विश्वास होता. जहाजाने जाण्यासाठी पासपोर्टची आवश्यकता नसते असे वाटल्याने त्यांनी जहाजाने जाण्याचे ठरवले होते. मात्र असे करणे शक्य नसल्याचे समजल्यावर त्या पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाल्या आणि रेल्वे स्टेशनवर ट्रेन सुटल्याने त्यांना बाल कल्याण विभागातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. सखोल चौकशी केल्यानंतर या मुली साऊथ कोरीयाला जाण्याचा प्लॅन करत असल्याचे समजले आणि मग त्यांच्या पालकांना याठिकाणी बोलवून सर्वांचे समुपदेशन करण्यात आले.

टॅग्स :सोशल व्हायरलदक्षिण कोरियातामिळनाडूसंगीत