Join us  

11 वर्षांच्या काश्मिरी अदीबाने 11 दिवसात लिहिलं पुस्तक, सर्वात लहान वयाची लेखिका, झील ऑफ पेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 3:21 PM

शाळेतल्या निंबंध स्पर्धेत बक्षिसं जिंकून आत्मविश्वास कमावलेल्या 11 वर्षांच्या अदीबा रियाझनं लिहिलेलं ‘झील ऑफ पेन’ हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. एवढी लहान मुलगी पुस्तक कसं लिहू शकते? विश्वास बसत नाही ना?

ठळक मुद्दे शाळेतून मिळणार्‍या प्रोत्साहनामुळे अदीबा हरखून तर जायची पण तिला आणखी लिहिण्याची प्रेरणाही मिळायची.अदीबा ही इंग्रजी आणि उर्दू या दोन्ही भाषांमधे लिहिते. झील ऑफ पेन या पुस्तकात तिने गद्य, पद्य, निबंधं, विचार असं वैविध्यपूर्ण लेखन केलं आहे.

 वयाच्या अकराव्या वर्षी मुलं मुली काय करतात? शाळेत जातात, अभ्यास करतात, खेळतात , नवीन काही शिकतात. हट्ट करतात, मस्ती करतात, दंगा करतात. पण पुस्तक बिस्तक लिहितात का? असं विचारलं तर तुम्ही काय म्हणाल? एवढ्या लहान वयात कोणी पुस्तक लिहितं का? मनात असा विचार येणं साहजिकच आहे. पण हा विचार खोडून काढला आहे तो दक्षिण काश्मिरमधील अनंतनाग जिल्ह्यातल्या अदीबा रियाझ या 11 वर्षाच्या मुलीनं. अदीबानं लिहिलेलं ‘ झील ऑफ पेन’ हे पुस्तक प्रसिध्द झालं आहे. तिच्या या पुस्तकाची बातमी माध्यमांमधून प्रसिध्द झाली आणि अदीबा रियाझ ही चर्चेचा विषय ठरली.

अनंतनाग जिल्ह्यातील बाटेंगू नावाचं एक छोटं गाव. गावात सर्वत्र फळांच्या बागाच बागा. अप्रतिम निसर्ग सौंदर्याच्या कुशीतच अदीबाचा जन्म झाला. सध्या अदीबा ही एका खाजगी शाळेत इयत्ता सातवीत शिकते. अदीबाला जसं वाचता लिहिता येऊ लागलं तशी तिला पुस्तकं वाचण्याची, मनात जे येतं ते लिहून काढण्याची सवय लागली. तिच्या या सवयीचं प्रतिबिंब अभ्यासातही पडू लागलं. शाळेतल्या निंबंध स्पर्धांमधे अदीबानं भाग घेतला की तिचा पहिला नंबर पक्काच असायचा. अशा शालेय स्पर्धेतून तिला डझनावारी बक्षिसं मिळाली. शाळेतून मिळणार्‍या प्रोत्साहनामुळे अदीबा हरखून तर जायची पण तिला आणखी लिहिण्याची प्रेरणाही मिळायची. अदीबा ही इंग्रजी आणि उर्दू या दोन्ही भाषांमधे लिहिते.

(Image: Google)

कोरोनामुळे मागचं पूर्ण वर्ष घरात बसून काढावं लागलं. त्यात अदीबाही होतीच. घरी बसून अभ्यास करताना तिच्याकडे भरपूर वेळ शिल्लक राहू लागला. या वेळेचं काय करायचं असा प्रश्न तिला पडला नाही. तिने या वेळेत भरपूर पुस्तकं वाचली. पहिल्यापेक्षा लिहिण्याचं प्रमाण वाढलं. 2020 च्या ऑगस्टमधे अनंतनाग जिल्ह्याचे कमिशनर के.के. सिध्द यांनी शालेय मुलांसाठी एक निबंध स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत अदीबा जिंकली. तिला अनंतनाग जिल्हा प्रशासनाकडून सॅमसंग कंपनीचा टॅब मिळाला. या पुरस्कारानं तर अदीबाला एक लेखिका बनण्याचं स्वप्न दाखवलं. अदीबानं हे स्वप्न उघड्या डोळ्यानं पाहिलं असल्या कारणानं तिने ते लगेच प्रत्यक्षातही उतरवलं. आपली लिहिण्याची कल्पना तिने घरात सांगितली असता वडील आणि तिच्या भावाला ती खूप आवडली. कम्प्युटरचं दुकान चालवणार्‍या वडीलांनी अदीबाला लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिलं. शाळेचा अभ्यास, घरातली आईनं सांगितलेली कामं सांभाळून तिने वाचण्याचा आणि लिहिण्याचा वेळ निश्चित केला. त्या वेळेत ती वाचतही होती आणि स्वत:च लिहितही होती.

(Image: Google)

अदीबाला आपल्या या पुस्तकात जगण्या संदर्भात प्रत्येक गोष्ट यायला हवी असं वाटत होतं. त्यामुळे कोणत्याही एका मुद्यावर किंवा मर्यादित विषयावर न लिहिता तिने तिला भावणार्‍या अनेक विषयांवर लिहिलं. नुसतंच गद्यात्मक नाही तर कविता देखील लिहिल्या. प्रेरणादायी विचार लिहिले. 96 पानी पुस्तक लिहून पूर्ण झाल्यानंतर तिने ते प्रकाशित करायचं ठरवलं. हे पुस्तक प्रकाशित झालं असून ते अमेझॉनवर मिळेल असं अदीबा सांगते.

अदीबा म्हणते की, 'प्रत्येक व्यक्तीत काही ना काही गुण, कौशल्य असतात. त्याकडे आपण स्वत: लक्ष देऊन हे गुण जोपासायचे असतात. आपल्याला काय मिळवायचं आहे ते ठरवून ते मिळवण्याचा निश्चय आणि प्रयत्न करायला हवा. लोक काय म्हणतील याचा विचार मी कधीच करत नाही. आपण जे ठरवतो ते मिळवताना तर अजिबातच नाही. लोकं कदाचित तुम्हाला मागे खेचतील, पण आपण खचून जाऊ नये. आपल्या ध्येयावरचं लक्ष अजिबात विचलित होवू देवू नये.' अदीबा म्हणते की, ‘ मला लहानपणापसूनच वेगळं काहीतरी करायचं होतं. मला लिहिण्याचं तर खूपच वेड आहे. त्यामुळे मी पुस्तक लिहायचं ठरवलं.’ पुस्तक लिहून ते प्रकाशित करणारी अदीबा ही काश्मिरमधील सर्वात लहान वयाची लेखिका ठरली. अदीबा या नावाचा अर्थ म्हणजे साहित्य लिहिणारी. अदीबानं ‘झील ऑफ पेन’ हे पुस्तक लिहून आपल्या नावाचा अर्थ खरा करुन दाखवला असं कौतुक केवळ तिच्या गावात आणि काश्मिरातच होतंय असं नाही. आज संपूर्ण देशाला अदीबाच्या या कृतीचं खूप कौतुक वाटलं आहे.

(Image: Google)

कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना आपला वेळ जात नाही, काय करावं हे सूचत नाही असा गोंधळ असताना, आजूबाजूच्या वातावरणात नैराश्य आणि भीती प पसरलेली असताना अदीबा मात्र शांतपणे आपलं दैनंदिन जीवन जगत होती, ते जगताना अतिशय नेटानं आपलं पुस्तकही लिहित होती. तिला कळायला लागल्यापासून तिने अनुभवलेलं जगणं, जगण्याचे पैलू हे जसं तिच्या पुस्तकात भेटतात. तसंच कविता, कोटस , निबंधवजा लेखनही या पुस्तकात करुन अदीबानं आपलं पुस्तक वैविध्यपूर्ण केलं आहे. अदीबाचा विचार आता पक्का झाला आहे. तिला लिहायला आवडतं म्हणून तिने भविष्यात लेखिकाच होण्याच ठरवलं आहे.

अकरा वर्षांची असली तरी अदीबाला खूप समज आहे. आज तिचं हे पुस्तक प्रसिध्द झाल्यानं तिच्यावर चारही बाजुंनी कौतुकाचा वर्षाव होतो आहे. पण अदीबा म्हणते की, ‘कोणी आपल्या टॅलेंटबद्दल कौतुक केलं तर हरखून जावू नये. आपल्यालाच हे जमतं म्हणून फुशारक्याच मारु नये. उध्दट होवू नये.आपल्याचबद्दल खूप बडबड करत राहाण्यापेक्षा आपल्या टॅलेण्टवर लक्ष केंद्रित केलं तर आपण जीवनात काहीतरी बनतोच!’ अदीबा आपल्या वयाच्या मुलांनाही हेच सांगते