Join us  

Makar Sankranti : संक्रातीला काळ्या साडीवर कोणते दागिने घालाल? स्मार्ट- मॉडर्न लूक हवा तर 5 पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 5:08 PM

तेच ते पारंपरिक दागिने घालून कंटाळा आला असेल तर दागिन्यांचे काही हटके पर्याय नक्की ट्राय करा

ठळक मुद्देपारंपरिक लूक करायचा कंटाळा आला असेल तर हे पर्याय नक्की ट्राय कराकौटुंबिक कार्यक्रमापासून ऑफीससाठीही मिळेल परफेक्ट लूक

सण म्हटला की साडी, मेकअप, दागदागिने आणि हेअरस्टाइल या गोष्टी ओघानेच आल्या. मकर संक्रांत म्हणजे काळ्या रंगाच्या साडीला विशेष महत्त्व. काळ्या रंगाच्या साडीवर उठून दिसेल अशी कोणती ज्वेलरी घातलीत तर तुम्ही सगळ्यांमध्ये उठून दिसाल हे प्रत्येकीला समजतेच असे नाही. नेहमी नेहमी तेच सोन्याचे आणि मोत्याचे पारंपरिक दागिने घालून कंटाळा आला असेल तर काळ्या साडीवर आपण थोडा मॉडर्न लूक नक्कीच ट्राय करु शकतो. आता यासाठी थोडी दागिन्यांची फॅशन समजून घेणे गरजेचे आहे. पाहूयात काळ्या साडीवर सूट होतील असे कोणते दागिने आपण संक्रांत सणाला घालू शकतो. हे दागिने घरातील हळदीकुंकवापासून ऑफीसमधील लूकसाठीही अतिशय चांगला पर्याय ठरु शकतात. 

१. ऑक्सिडाइज ज्वेलरी

गेल्या काही वर्षांपासून ऑक्सिडाइज ज्वेलरीची बरीच फॅशन आहे. काहीशा काळपट पॉलिशमध्ये येणारे सिल्व्हर रंगातील हे दागिने काळ्या साडीवर अतिशय उठून दिसू शकतात. यामध्ये हल्ली मोठ्या आकाराचे गळ्यातले, बांगड्या, कानातले, एखादी बिंदी अशा सगळ्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता. गळ्यात थोडा लांब असा टेंपल डिझाइन असलेला हार असेल तर तो आणखी छान दिसतो. तसेच हल्ली नोज पीन वापरण्याचीही बरीच फॅशन असल्याने ऑक्सिडाइज नोज पीनही तुम्ही घालू शकता. काळ्या रंगावर ही ज्वेलरी अतिशय उठून दिसत असल्याने या लूकमध्ये तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळे आणि हटके दिसाल.

(Image : Google)

२. हेवी कानातले

काळा रंग गडद असल्याने त्यामध्ये आपण मस्त उठून दिसतो. त्यातही या साडीचा काठ थोडा मोठा असेल आणि आपण केस वर बांधणार असून तर थोडे हेवी मोठे कानातले घातले तर तुम्हाला मॉडर्न लूक मिळू शकेल. कानातले मोठे असतील तर गळ्यात काहीही घातले नाही तरी चालते. त्यामुळे तुमची साडी आणि कानातले हायलाइट होण्यास मदत होईल. 

(Image : Google)

३. चोकर 

संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकवाला तुम्ही डिझायनर साडी नेसत असाल तर त्यावर फार हेवी ज्वेलरी चांगली दिसत नाही. अशावेळी एखादा चोकर घातला तरी तुमचा लूक खुलून येऊ शकतो. तुमच्या गळ्याभोवती असलेल्या या चोकरमध्ये कुंदन असतील तर तो आणखीनच छान खुलून दिसेल. कमीत कमी डिझाइन असलेला चोकर आणि त्यावरील कानातले याने तुम्ही संक्रांतीचा हटके लूक करु शकता. 

४. टेराकोटा ज्वेलरी 

टेराकोटा ज्वेलरीची हल्ली बरीच फॅशन आहे. अनेक कलाकार ही ज्वेलरी हाताने पेंट करत असल्याने त्यामध्ये वेगवेगळ्या बऱ्याच डिझाइन पाहायला मिळतात. यातील कोणत्याही रंगाचे गळ्यातले आणि कानातले काळ्या रंगावर सूट होऊ शकत असल्याने ही ज्वेलरी नक्कीच छान दिसेल. टेराकोटा ज्वेलरीमध्ये लहान आकारातील गळ्यातल्या आणि कानातल्यापासून ते हेवी सेटपर्यंत बरेच पर्याय पाहायला मिळतात. तसेच यामध्ये असणारे बीटस, लटकन अतिशय खुलून दिसतात. मात्र हा एक मातीचा प्रकार असल्याने हे दागिने काळजीपूर्वक वापरावे लागतात. 

(Image : Google)

५. टेंपल ज्वेलरी 

हाही काळ्या साडीवर वापरण्यासाठी एक मस्त पर्याय असू शकतो. ही ज्वेलरी थोडी हेवी प्रकारातील असून यावर देवांची चित्रे असतात. तसेच मंदिरावर ज्याप्रमाणे नक्षीकाम केलेले असते तशाप्रकाची डिझाइन या दागिन्यावर असते. गोल्डन रंगाबरोबरच काही कलरफूल ज्वेलरीही या प्रकारात पाहायला मिळते. यामध्ये पारंपरिक आणि मॉडर्न असे दोन्ही लूक तुम्ही कॅरी करु शकता. त्यामुळे टेंपल ज्वेलरी हा काळ्या साडीसाठी आणि अर्थातच संक्रांतीसाठी चांगला पर्याय ठरु शकतो.  

(Image : Google)

टॅग्स :खरेदीफॅशनमकर संक्रांती