Join us  

गौरीसाठी साडी खरेदी करताना लक्षात ठेवा ४ गोष्टी; साडी खरेदी होईल सोपी- मस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2023 3:07 PM

Saree shopping for Gauri mahalaxmi ganpati festival special : साडीचा पोत, हलकेपणा, चोपून राहण्यासाठी कराव्या लागणाऱ्या गोष्टी साडीची खरेदी करताना लक्षात घ्याव्या लागतात.

गौरी-गणपती जवळ आले की डेकोरेशन काय करायचे, प्रसाद काय ठेवायचा, आरतीच्या वेळा अशा सगळ्या गोष्टींची तयारी सुरू होते. गणपतीसोबतच २ ते ३ दिवसांत गौरींचेही आगमन होते. घरात जागा कमी असेल तर आहे त्या जागेत या गौरी बसवायच्या, त्यांच्या पुढे ठेवायला फराळाचे पदार्थ करायचे, त्यांच्या साड्या छान चापून चोपून नेसवायच्या, त्यावर साजेसे दागिने आणायचे अशा एक ना अनेक गोष्टी असतात. माहेरवाशीण आली की तिला ज्या पद्धतीने नवीन वस्त्र, दागिने घालून तिची ओटी भरुन तिला पंचपक्वानांचे जेवण घातले जाते. त्याचप्रमाणे गणपतीनंतर येणाऱ्या गौरींचेही अतिशय प्रेमाने आणि उत्साहाने लाड केले जातात. ही माहेरवाशीण गौरी जास्तीत जास्त देखणी कशी दिसेल यादृष्टीने घरातील महिलांचा प्रयत्न असतो. गौरींना साडी परफेक्ट बसण्यासाठी त्यांचे साचे, हात, मुखवटे या गोष्टी नीट असाव्याच लागतात. पण साडीची निवडही योग्य पद्धतीने करावी लागते. साडीचा पोत, हलकेपणा, चोपून राहण्यासाठी कराव्या लागणाऱ्या गोष्टी साडीची खरेदी करताना लक्षात घ्याव्या लागतात. पाहूयात साडी खरेदी करताना लक्षात ठेवायच्या काही महत्त्वाच्या गोष्टी (Saree shopping for gauri mahalaxmi ganpati festival special)...

१. गौरींचे मुखवटे, हात हे साधारणपणे पितळ्याचे किंवा पीओपीचे असतात. या मटेरीअलवर देखण्या दिसतील अशा साड्यांची निवड आपल्याला करावी लागते. त्यासाठी साधारण गडद रंग, कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन अशा साड्या घेतल्या तर जास्त छान दिसतात. 

(Image : Google)

२. काठाच्या साड्या घेताना त्याचे काठ प्रमाणापेक्षा जास्त मोठे, जाड पोत असलेले असू नयेत याची विशेष काळजी घ्यायला हवी. कारण यामुळे साडीला पिन्स, टाचण्या लावणे अवघड जाते. यामुळे गौरीची साडी नेसायला खूप वेळ लागतो आणि नंतरही ती मनासारखी नेसली जातेच असे नाही. 

३. साडीचा पोत खूप जास्त सिल्कचा किंवा खूप सुळसुळीत न घेता साडी चापून चोपून नीट बसेल अशीच घ्यावी. अशी साडी नेसणे सोपे असल्याने ती गौरीला आणि नंतर गौरीचा प्रसाद म्हणून आपल्यालाही छान नेसता येते अशी सोडी नेसताना फार त्रास होत नाही. 

(Image : Google)

४. साडीचे माप, साडी नीट तपासून घ्यावे. या काळात बाजारात साडी खरेदीसाठी खूप गर्दी असल्याने साड्या डिफेक्टीव्ह असण्याची शक्यता असते. यामध्ये साडीला डाग, एखादे होल किंवा फाटलेले, खराब झालेले असण्याची शक्यता असते. तसेच काही वेळा साडी खूप लहान असण्याची नाहीतर प्रमाणापेक्षा जास्त मोठी असण्याची शक्यता असते. त्यामुळे साडी खरेदी करताना ती नीट तपासून घ्यायला हवी. 

 

टॅग्स :खरेदीसाडी नेसणेगणपतीगणेशोत्सव