Join us  

Makar Sankranti : वाण म्हणून टिपिकल वस्तू देताय? कल्पक वाणाचे 8 पर्याय, चर्चा तर होणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 10:52 AM

बायकांना आवडेल आणि मुख्य म्हणजे उपयोगी पडेल अशीच वस्तू देऊया...

ठळक मुद्देवाण देताना ते बजेटमध्ये असेल असे पाहाच पण ते उपयोगी पडेल असेही बघा(छायाचित्रे - निंबळे फाऊंडेशन, होम डेकोरेशन एनटीपी)

मकर संक्रात अवघ्या २ दिवसांवर आली असताना एकीकडे तिळाचे लाडू आणि वड्यांची गडबड असेल तर दुसरीकडे वाण म्हणून काय द्यायचं असा प्रश्न बऱ्याच महिलांना पडला असेल. हळदी कुंकवाचे वाण देताना  ते उपयोगी असावे आणि काहीतरी इनोव्हेटीव्ह असावे असे वाटत असेल तर आम्ही काही पर्याय सुचवत आहोत. महिलांना आवश्यक आणि जी गोष्ट पाहून त्या खूश होतील असे वाण असेल तर तुम्हालाही ते वाण दिल्याचा आनंद मिळेल. पाहूयात असेच वाणाचे काही पर्याय....

1. नोटपॅड - महिलांना बऱ्याचदा वेगवेगळ्या कामांची, सामानाची अशा याद्या करायला किंवा कोणत्याही गोष्टींची नोंद करण्यासाठी नोटपॅड आवश्यक असते. त्यामुळे वाण म्हणून तुम्ही लहानसे एखादे नोटपॅड आणि पेन देऊ शकता. 

2. कॅलेंडर - कॅलेंडर ही महिलांसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. वेगवेगळ्या तारखांना काही नोंदी करण्यासाठी किंवा चतुर्थी, एकादशी, सणवार पाहण्यासाठी महिलांना सतत हाताशी कॅलेंडर लागते. नुकतेच नवीन वर्ष सुरू झाल्याने संक्रांतीचे वाण म्हणून कॅलेंडर देणे हा उत्तम उपाय आहे. यामध्ये आपण पॉकेट कॅलेंडर किंवा टेबल कॅलेंडरही देऊ शकतो. ऑफीसमध्ये किंवा घरीही टेबलवर ठेवण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. 

3. रोपांच्या बिया - वाण म्हणून रोप देणे हा पर्याय आहेच. पण ते नेण्यासाठी अवघड असल्याने वेगवेगळ्या रोपांच्या बिया देण्याचाही पर्याय चांगला आहे. या बिया नर्सरीमध्ये सहज मिळतात. यामध्ये एकाच रोपाच्या बिया किंवा वेगवेगळ्या दोन ते तीन रोपांच्या बिया आपण देऊ शकतो. त्यासोबत त्या लावण्याचे माहितीपत्रक दिल्यास त्याचा महिलांना नक्कीच रोप लावण्यास उपयोग होईल. 

4. पालेभाजी - आहारात पालेभाजीचा समावेश असणे अत्यावश्यक असते असे आपण नेहमी म्हणतो. सध्या बाजारात पालेभाज्या अतिशय स्वस्त असून आपण त्या खरेदी करुन वाण म्हणून महिलांना देऊ शकतो. त्यामुळे त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य चांगले राहण्यास निश्चितच मदत होईल. 

5. मसाले - मागील काही वर्षांपासून बऱ्याच महिला वाण म्हणून वेगवेगळ्या ब्रँडची मसाल्याची पाकीटे एकमेकींना लुटतात. यामध्ये अगदी सांबार मसाल्यापासून पावभाजी, पनीर भाजी, बिर्याणी मसाला असे बरेच पर्याय असतात. पण तुम्ही घरी मसाला करत असाल तर एक किलोचा वेगळा वाण देण्यासाठीचा मसाला करा. तो तुम्हाला लहान पाकीटांमध्ये घालून देण्यासाठी उत्तम उपाय होईल. घरी स्वत: केलेला असल्याने तुमचा स्पेशल टच या वाणाला असेल.

6. आरसा - महिलांना आरसा हा कायम लागणारी गोष्ट असते. पर्समध्ये किंवा घरातही एखादा जास्तीचा आरसा लागतो. बाजारात सध्या बरेच वेगवेगळ्या प्रकारचे डिझायनर आरसे मिळतात. असाच एखादा आरसा दिल्यास हळदी-कुंकवाला आलेल्या महिला नक्कीच खूश होतील.

7. खणाचे पाऊच - हल्ली खणाची बरीच फॅशन आहे. बऱ्याच महिलांकडे खणाची साडी किंवा खणाचा ड्रेस असतोच असतो. त्यावर घेण्यासाठी किंवा अगदी पारंपरिक कपड्यांवर वापरण्यासाठी खणाचे पाऊच किंवा छोटी पर्स दिल्यास महिलांना ती विशेष आवडू शकते. आपल्या जवळपास अशाप्रकारे कोणी शिवणारे असल्यास कापड आणून त्यांच्याकडून शिवून घेतल्यास या पर्स आणखी स्वस्त पडू शकतात.   

8. एक हटके पर्याय - आपल्याकडे बऱ्याच नवीन वस्तू आलेल्या असतात. त्या सगळ्या आपण वापरत नाही. किंवा वेगवेगळ्या निमित्ताने आपण काही घेतलेले असते. यामध्ये आपण नव्यानेही काही वस्तूंची भर घालू शकतो. या वस्तूंची नावे सगळ्या चिठ्ठ्यांवर लिहून त्या महिलांना निवडायला लावाव्यात आणि जी चिठ्ठी त्या निवडतील ती वस्तू त्यांना वाण म्हणून द्यावी. 

टॅग्स :खरेदीमकर संक्रांतीमहिलागिफ्ट आयडिया