Join us  

आवडत्या साड्या जुन्या झाल्या, आता साडी जुनी, आयडीया नवी! करा जुन्या साड्यांचे ७ भन्नाट वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 1:04 PM

साड्या म्हणजे महिला वर्गाचा वीक पाॅईंट.. प्रत्येक साडीसोबत इतक्या आठवणी जोडलेल्या असतात, की जुनी झाली तरी साडीवरचं प्रेम काही कमी होत नाही. म्हणूनच तर जुन्या साड्यांचा असा झकासपैकी एकदम हटके उपयोग करा....

ठळक मुद्देयापैकी जो उपाय आवडेल आणि जो तुमच्या साडीला शोभून दिसेल, असं वाटतं, तसं करा आणि साडीचा लूक बदला.

प्रत्येक साडीची वेगळी कहानी... मग ती साडी खास आपल्या लग्नातली असो किंवा मग अगदीच विंडो शॉपिंग करताना घेतलेली असतो. प्रत्येक साडीत बाईचा जीव गुंतलेला असतो. त्यातही ज्या साड्या हलक्या- फुलक्या, रेग्युलर वापराच्या असतात, त्या आपण झटपट वापरून टाकतो. अशा साड्या एकवेळ टाकून द्यायला किंवा कुणाला तरी देऊन टाकायला काही वाटत नाही. पण ज्या साड्या काठपदराच्या, डिझायनर किंवा खूपच भारीच्या असतात, त्या साड्या मात्र देऊन टाकायला अजिबातच मन होत नाही. म्हणूनच तर लग्नाला २०- २५ वर्षे उलटून गेली तरी बहुतांश महिलांनी त्यांचा लग्नातला शालू किंवा इतर साड्या अगदी मनापासून जपून ठेवलेल्या असतात.

आता कितीही आवडत असली तरी एकच साडी किती कार्यक्रमांना घालणार.. त्यामुळेच मग फारफार तर १०- १२ वेळा साडी नेसणं होते आणि त्यानंतर मात्र ती नुसतंच कपाटाचं धन बनून राहते. अशा झालेल्या तुमच्या सगळ्या साड्यांना आता जरा कपाटाच्या बाहेर काढा.. त्या साड्या आपल्याला अजिबातच टाकून द्यायच्या नाहीत. उलट त्यांना आणखी नटवायचंय, सजवायचंय आणि त्यांचा लूक पुर्णपणे बदलून टाकायचा आहे. तुमच्या जुन्या साडीचं नवं रूपडं आणि नवा वापर पाहून तुम्हीही जाम खुश होऊन जाणार हे नक्की. जुन्या साडीचा कसा वापर करता येऊ शकताे, याच्या या काही टिप्स.. यापैकी जो उपाय आवडेल आणि जो तुमच्या साडीला शोभून दिसेल, असं वाटतं, तसं करा आणि साडीचा लूक बदला.

१. साड्यांचा बनवा लेहेंगा....बहुतांश घरामध्ये एखादी हेवी वर्क असणारी बनारसी साडी किंवा बनारसी शालू असताेच. बनारसी साडी नसली तरी तिच्या तोडीची दुसरी साडीही चालू शकेल फक्त तिचे काठ मोठे हवे. तर तुम्ही अशा मोठमोठाले काठ असणाऱ्या साड्यांपासून एक मस्त स्कर्ट बनवू शकता. मस्त घेरदार आणि पायापर्यंत लांब असा स्कर्ट बनवून घ्या आणि पदराचा वापर करून जरा वेगळ्या पद्धतीने ब्लाऊजही शिवून घ्या. या स्कर्ट, ब्लाऊजला शोभेल अशी ओढणी घेतली की छान लेहेंगा तयार होईल. बऱ्याच दाक्षिणात्य नट्यांची अशी वेशभुषा असते...

२. लांब जॅकेट...ज्या साड्या खूपच जास्त भरजरी असतात आणि ज्यांचं टेक्स्चर जरा जाडसर असतं, अशा साड्यांचा उपयोग जॅकेट तयार करण्यासाठी करा. या जॅकेटला अस्तर लावा. स्टॅण्डकॉलर ठेवा आणि मस्तपैकी समोरून ओपनिंग असणारं गुडघ्यापर्यंत लांब भरजरी जॅकेट करा. जॅकेटच्या बाह्या तुम्हाला आवडतील त्याप्रमाणे कमी- जास्त असू द्या. या जॅकेटच्या आत त्याला सुट होणारा कोणताही प्लेन रंगाचा स्लिव्हलेस कुर्ता घाला. कुर्त्याऐवजी तुम्ही एखादा पायघोळ वनपीस आणि त्यावर हे जॅकेट असा लूकही करू शकता. हा ड्रेस तर एखाद्या लग्नसमारंभातही हमखास भाव खाऊन जाईल.

३. डौलदार वनपीस शिवा...जुन्या साडीचा हा सगळ्यात भारी आणि सोपा उपाय आहे. जुन्या साडीपासून तुम्ही मस्त, आकर्षक वनपीस तयार करू शकता. साडीच्या पदराचा वापर वरच्या भागासाठी करा आणि बाकीच्या साडीचा खाली भरपूर मोठा घेर बनवा. यावर ओढणी घेतली नाही तरी चालते.

४. साड्यांपासून बनवा उशीचे अभ्रे...तुमच्या दिवाणखान्यात छान शोभून दिसतील, असे उशांचे अभ्रे किंवा कव्हर तुम्ही सिल्कच्या साड्यांपासून तयार करू शकता. घरात एखादा कार्यक्रम असेल, सण- समारंभ असेल तर हे उशीचे कव्हर वापरा. सिल्का साडीच्या वापरामुळे घराला आकर्षक फेस्टिव्ह लूक देता येतो. काही खास कार्यक्रमांसाठीच हे उशीचे कव्हर जपून ठेवा. कॉटनची साडी असेल तर तुम्ही रेग्युलर वापरासाठी उशीचे अभ्रे तयार करू शकता.

५. कुर्ता आणि स्कर्टसध्या गुडघ्यापर्यंत लांब कुर्ता आणि त्याखाली स्कर्ट अशी फॅशन खूप ट्रेण्डमधे आहे. तुमच्याकडे दोन साड्या असतील आणि त्याचे रंग जर कॉन्ट्रास्ट असतील तर तुम्ही त्या दोन साड्यांचा असा वापर नक्कीच करू शकता. एका साडीपासून कुर्ता बनवा आणि दुसऱ्या साडीपासून स्कर्ट तयार करा.

६. साडी खराब पण काठ चांगले..अनेकदा असं होतं की साडीचे काठ खूपच चांगले दिसतात, अगदी नव्यासारखे वाटतात. पण साडी मात्र पार विरून गेलेली किंवा खराब झालेली असते. त्या उलट काही साड्या अशाही असतात की ज्यांचे काठ खराब होतात पण साडी चांगली असते. या दोन साड्या एकत्रित वापरात आणा. चांगल्या साडीचे खराब काठ काढा आणि त्याऐवजी तिथे खराब झालेल्या साडीचे चांगले काठ लावा. अशी मस्त भन्नाट नवी साडी तयार होईल.

७. काठांचा असा करा उपयोगज्या साड्या खराब झाल्या पण काठ चांगले आहेत, अशा साड्यांचे काठ काढून घ्या. या काठांना शोभणारी एखादी काळी, डार्क ग्रीन, बॉटल ग्रीन किंवा काळपट शेडमधल्या एखाद्या रंगाची प्लेन शिफॉन साडी घ्या. या साडीला चांगले असणारे काठ लावून टाका. साडीला असा डिझायनर लूक मिळेल, की बघणारे सगळेच अवाक होतील.

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सखरेदीफॅशन