Join us  

दिवाळीत नवीन फ्रिज खरेदी करताना तपासायलाच हव्यात ४ गोष्टी, खरेदी होईल जास्त चांगली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2023 2:16 PM

4 Things to Keep in Mind while buying Refrigerator : तांत्रिक बाबी तपासून घेणे अतिशय गरजेचे असल्याने फ्रिज खरेदी करताना आपल्याला काही गोष्टींची माहिती असायलाच हवी

दिवाळी हा वर्षातला मोठा सण असल्याने आपण काही ना काही आवर्जून खरेदी करतो. दिवाळीच्या निमित्ताने सोनं, चांदी, नवीन गाडी किंवा घरातील वस्तू खरेदी करण्याची पद्धत आहे. या काळात कंपन्याही मोठा डिस्काऊंट देत असल्याने दिवाळीच्या मुहूर्तावर आपण आवश्यक असलेली गोष्ट घेतो. घरातल्या जुन्या झालेल्या वस्तू बाद करुन नवीन घेण्याचा हा काळ असतो. यामध्ये टिव्ही, वॉशिंग मशिन, सोफासेट, बेड, फ्रिज अशा विविध गोष्टींचा समावेश असतो. यावर्षी दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही नवीन फ्रिज खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याबाबत काही गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे. एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करताना सामान्य ग्राहक म्हणून आपल्याला त्यातील तांत्रिक गोष्टींबाबत माहिती असतेच असे नाही. मात्र या तांत्रिक बाबी तपासून घेणे अतिशय गरजेचे असल्याने फ्रिज खरेदी करताना आपल्याला काही गोष्टींची माहिती असायलाच हवी, पाहूयात या गोष्टी कोणत्या (4 Things to Keep in Mind while buying Refrigerator)...

१. गरज लक्षात घ्या.

आपण घरात किती लोक आहोत आणि आपण किती पदार्थ खरंच फ्रिजमध्ये साठवतो हे लक्षात घेऊन त्यानुसार किती लिटरचा फ्रिज घ्यायचा हे लक्षात घ्यायला हवे. गरज नसताना सगळ्यांकडे खूप मोठा फ्रिज असतो म्हणून मोठ्या आकाराचा फ्रिज घेण्यात काहीच तथ्य नाही. 

(Image : Google )

२. वॅट (पॉवर) तपासा

फ्रिज खरेदी करताना त्यावर तो किती वॅटचा आहे हे लिहीलेले असते. जितके वॅट जास्त तितकी त्या फ्रिजची पॉवर किंवा क्षमता जास्त. त्यामुळे ही गोष्ट फ्रिज खरेदी करताना अवश्य तपासून घ्यावी. 

३. बीईई रेटींग - किती इलेक्ट्रीसिटी खर्च होते याची माहिती घ्या

हे रेटींग फ्रिजवर दिलेले असते. फ्रिजच्या दरवाजाला एक स्टार असलेले लेबल असते. त्यावर स्टार्स असतात आणि जितके स्टार जास्त तितकी कमी इलेक्ट्रीसिटी खर्च होते. फ्रिजसाठी दिवसरात्र प्लग जोडलेला असल्याने इलेक्ट्रीसिटी जास्त प्रमाणात जाण्याची शक्यता असते. मात्र या रेटींगचा विचार करुन फ्रिज खरेदी केल्यास आपल्याला ते फायद्याचे ठरते.

(Image : Google )

४. वॉरंटीबाबत माहिती घ्या 

वॉरंटी म्हणजे आपण खरेदी करत असलेल्या वस्तूमध्ये काही बिघाड झाल्यास ती संबंधित कंपनीकडून दुरुस्त करुन मिळण्याचा कालावधी. साधारणपणे फ्रिजसारख्या मोठ्या वस्तूंना ३ ते ५ वर्षांची वॉरंटी असते. यामध्ये काही ठराविक गोष्टी कव्हर केलेल्या असल्याने त्यांचा काही बिघाड झाल्यास कंपनीला आपल्याला त्या बदलून देणे बंधनकारक असते. त्यामुळे नामांकित कंपनीचा फ्रिज हवा आणि त्यावर किमान काही वर्षांची वॉरंटी हवी. 

 

टॅग्स :दिवाळी 2023खरेदीहोम अप्लायंस