Join us  

ऑफिस सहकारी कायमच विश्वासघात करतात, दोस्तीत दगा देतात असा तुमचाही अनुभव आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2022 7:00 PM

आपल्या करिअर ग्रोथसाठी सहकाऱ्यांशी जमवून घेत उत्तम काम करणं फार महत्त्वाचं असतं, कधी खूप प्रेम कधी खूप अबोला असं होत असेल तर चुकतंय काहीतरी..

ठळक मुद्देआपण आपल्या बाजूनं बदल केला नाही तर सॉफ्ट स्किल्स अभावी आपलं करिअर धोक्यात येऊ शकतं.

माझं व्हॉट्स ॲप स्टेट्स पाहिलं नाही?मला इग्नोर करतोय का?माझ्यापेक्षा बाकीचे जास्त इंटरेस्टिंग वाटतात का?माझ्याविरोधात आता तू पण कुचाळक्या करणार का?माझ्या डीपीकडे लक्षच नाही, असं का?बॉस काय बोलला मला सांगितलं नाहीस?बॉसचा फेवरिट व्हायचा प्रयत्न सुरु आहे का?ही वाक्य कोण कोणाला म्हणालं असं वाटतं? प्रियकर-प्रेयसीला? ऑफिस कलीग एकमेकांना असं म्हणत असतील, सोबत काम करताना असा हक्क दाखवत असतील असं डोक्यात तरी येतं का? पण आता हे ऑफिस पॉलिटिक्सचं नवं पर्सनल रुप आहे. समवयस्क तरुण मुलंमुली एकमेकांसोबत काम करतात. दोस्त असतात पण आपण सहकारी आहोत आपल्यात स्पर्धा आहेत हे विसरत नाहीत. सोबत पार्ट्या करतात, पण शेअरिंग करताना विश्वास डगमगतो. एकमेकांवर हक्क सांगणं आणि टाळणं मग सुरु होतं. ऑफिसमेट्स की लव्हबर्ड्स कळू नये इतकी आयुष्यात लूडबूड सुरु होते. परिणाम भांडणं, स्ट्रेस, गैरसमज आणि शेवटी वाईटपणा.

(Image : Google)

आधी सुरळीत असलेलं नातं कुरतडायला लागतात. सगळं नीट सुरु होतं. हे -हे आणि हे अमुक ढमुक घडलं म्हणून सगळं हातातून जात चाललं आहे, अशी फिलिंग मनात येते. माझी किंमत तुला दाखवूनच देईन, असे खेळ मनात सुरु होतात. प्रत्येक कम्युनिकेशनमध्ये मला कसं वागवलं, नीट भाव दिला की नाही, नीट वेळ दिला की नाही, यावर मतं ठरवून वेगळं वागणं सुरु होतं. मनात जे सुरु असतं, ते समोर दाखवायचं नाही, पण नीट मनमोकळं बोलायचं नाही.त्यामुळे मनातला कडवटपणा वेगाने वाढत जातो. त्यात आणखीन आपल्याच मनात ठाण मांडून बसलेल्या शंका-कुशंका- दुसऱ्याकडूनच्या अपेक्षा आणि स्वतःचं ते सर्व बरोबरच आहे, असं ठामपणे वाटणं ...फारच केमिकल लोचा होऊन जातो हा! कोणी आपलं स्टेट्स पाहिलं/ न पाहिलं, मला काय खायला आवडतं आणि समोरच्याला काय आवडत नाही, ह्यासारख्या साध्या-क्षुल्लक गोष्टींवरून आपण सहकाऱ्यांनाही जोखत राहणार का?

(Image : Google)

त्याऐवजी नीट प्रोफेशनल दोस्ती ठेवली. बोलून वाद मिटवले. मनात एक पोटात एक न वागता, पॉलिटिक्स न करता जर सहकाऱ्यांशी दोस्ती करत निकोप स्पर्धाही केली तर गोष्टी सोप्या होतात. अनावश्यक स्ट्रेस कमी व्हायला नक्कीच मदत होईल. जरा लार्जर, बिगर आणि बेटर आयुष्य आपण जगायला लागू. आपलं प्रोफेशलन लाइफ सोपं करण्याची हीच रीत असू शकते. नाहीतर सहकाऱ्यांशी कधी गळ्यात गळे कधी भांडणं यातून आपण कधीच बाहेर येणार नाही. मग कंपन्या बदला नाहीतर सहकारी, आपण आपल्या बाजूनं बदल केला नाही तर सॉफ्ट स्किल्स अभावी आपलं करिअर धोक्यात येऊ शकतं.

टॅग्स :करिअर मार्गदर्शन