Join us  

घटस्फोटाची 4 कारणं; जी लग्न मोडतात, नको जीव करतात! प्रेम असेल तर नातं सांभाळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2021 6:21 PM

घटस्फोटाचा निर्णय जाहीर करण्यामागे अनेक गोष्टी घडलेल्या असतात, घडत असतात, आपलं एकत्र राहाणं शक्य नाही असं दोघांनाही खूप काळापासून वाटत असतं. एकमेकांप्रती व्यवहार , त्यातून पक्के होत जाणारे विचार जोडप्याला घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत आणून सोडतात. घटस्फोटाला कारणीभूत ठरणार्‍या 4 कारणांकडे लक्ष द्यायला हवं.

ठळक मुद्दे एकमेकांमधला संवाद तुटला तर नवरा बायकोला एकमेकांना समजून घेण्यात अडचणी येतात.नवरा बायकोमधीली स्पर्शाची भाषा आटली की त्याचा परिणाम नात्यावर होतो. जवळ असूनही दुरावा निर्माण होतो. नवरा बायकोमधील भावनिक कोरडेपणा दोघांमधला संवाद तोडतो, शरीर संबंधाची ओढ हिरावून घेतो, नातं निरर्थक करतो.

सामंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य हे दाक्षिणात्य चित्रपटातील रील आणि रीअल लाइफमधील प्रसिध्द जोडपं. या दोघांची विभक्त होण्याची बातमी आली आणि वाचणार्‍यांना धक्का बसल्यासारखं झालं. एखाद्याच्या घटस्फोटानं धक्का बसणं हे फक्त स्टार जोडप्यांच्या बाबतीत झालं तर होतं असं नाही. आपल्या ओळखीतले, जवळ राहाणारे, नात्यातले जेव्हा अचानक घटस्फोटाचा निर्णय घेतात तेव्हा काय बोलावं, काय विचार करावा हेच कळत नाही. कारण काल परवापर्यंत सर्व सुरळीत चालू असताना अचानक घटस्फोट होतो तेव्हा धक्का बसतो. सर्व सुरळीत असणं हे बाहेरच्यांसाठी असतं प्रत्यक्ष जोडप्यात बरंच काही बिनसलेलं असतं. याबाबत विवाह समुपदेशक म्हणतात की,  घटस्फोटाचा निर्णय जाहीर करण्यामागे अनेक गोष्टी घडलेल्या असतात, घडत असतात, आपलं एकत्र राहाणं शक्य नाही असं दोघांनाही खूप काळापासून वाटत असतं. एकमेकांप्रती व्यवहार , त्यातून पक्के होत जाणारे विचार जोडप्याला घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत आणून सोडतात. आणि मग एके दिवशी निर्णय जाहीर होतं एवढंच.

Image: Google

का होतो घटस्फोट?

विवाह समुपदेशक म्हणतात की घटस्फोट होण्यामागे चार कारणं कारणीभूत ठरतात.

1. संवादात अडचण- कोणतंही नातं टिकतं , मजबूत होतं ते दोघांमधल्या चांगल्या संवादानं. घटस्फोटामागे आर्थिक प्रश्न, दोघांमधे वचनबध्दता नसणं ही कारणं चर्चिली जात असली तरी ही कारण दुय्यम ठरतात. प्राथमिकता, प्राधान्य असतं ते दोघांमधील संवादाला. हा संवाद तुटला तर नवरा बायकोला एकमेकांना समजून घेण्यात अडचणी येतात. एकमेकांमधला संवाद हरवला की एकमेकांचे प्रश्न , आयुष्याबद्दलचं नियोजन हे समजून घेण्यात अडचणी येतात. दोघांमधला संवाद सुधरला नाही, त्यांच्यात कम्युनिकेशन गॅप जर तशीच राहिली तर मात्र संवाद होतच नाही विसंवाद वाढतो आणि घटस्फोट घेण्याची वेळ येते.

2. स्पर्शाचा अभाव- सर्व नात्यात स्पर्शाला खूप महत्त्व आहे. आई आणि मुलांमधील स्पर्शाच्या भाषेनं दोघांमधे मायेची ओढ असते, बहिण भाऊ, बहिणी बहिणी, भाऊ भाऊ या प्रत्येक नात्यात स्पर्श खूप मोठी भूमिका निभावतो. या सर्व नात्यांप्रमाणेच नवरा बायकोच्या नात्यातही स्पर्शाला अतीव महत्त्व आहे. शारीरिक संबंधाचा अभाव हे घटस्फोटाचं मोठं कारण ठरत असल्याचं अभ्यासक सांगतात. नवरा बायकोमधील साधा स्पर्श, एकमेकांचा हात हातात घेणं, मीठी मारणं, चुंबन घेणं, एकमेकांना प्रेमानं कुरवाळाणं ही स्पर्शाची भाषा दोघांचं नातं दृढ करते. हीच भाषा दोघांमधे शरीर संबंधाची ओढ निर्माण करते. पण दोघांमधली ही स्पर्शाची भाषा आटली की त्याचा परिणाम शरीर संबंधावर होतो. जवळ असूनही दुरावा निर्माण होतो. शरीर संबंधां अभावी नवरा बायकोच्या नात्यात निरसता निर्माण होते आणि एक दिवस उगवतो जो त्यांना घटस्फोटाचा निर्णय पक्का करण्यास भाग पाडतो.

Image: Google

3. नात्यातली भागीदारी संपणे- नवरा बायको जेव्हा एकमेकांसोबत असतात तेव्हा ते जेवढे एकमेकांचे असतात तेवढेच ते स्वत:चे देखील. दोघांचंही स्वत:च वैयक्तिक आयुष्य असतं. ते जगण्याचा दोघांनाही अधिकार असतो. पण नवरा बायकोच्या नात्यात एकमेकांसाठी असणं आणि स्वत:साठी जगणं या दोन गोष्टीत समतोल साधणं खूप महत्त्वाचं असतं.हा समतोल बिघडला की आपण एकटे आहोत, आपल्याला समजून घेणारे कोणी नाही अशी भावना दोघांमधे किंवा दोघांपैकी एकामधे निर्माण होण्याची शक्यता असते. दोघांचं वैयक्तिक स्तरावरील आयुष्य कितीही यशस्वी असलं तरी नवरा बायकोच्या नात्यात काही चार्म उरलेला त्यांना वाटत नाही. उलट एकमेकांसाठी असणं आणि स्वत:साठी जगणं यातला तोल बिघडल्यामुळे नातं वैयक्तिक ध्येयपूर्तीच्या मार्गात अडथळाच वाटायला लागतं. या नात्यात कोणतीही देवाण घेवाण होत नसल्यानं निजिर्व नातं संपलेलंच बरं या निर्णयाप्रत दोघेही येतात.

Image: Google

4. भावनिक आधाराचा अभाव- एकमेकांना समजून घेणे, एकमेकांच्या अडचणीत एकमेकांच्या पाठीशी उभं राहाणं, धीर देणं, मी आहे सोबत याची जाणीव करुन देणं हे नवरा बायकोत असलं तर नातं कधीही कोरडं पडत नाही. उलट नात्यात भावनिक ओलावा निर्माण होतो. पण दोघांमधे जर नीट संवाद नसला, शारीरिक संबंधामधली ओढ नसली तर भावनिक पातळीवरही दोघांमधे अंतर पडतं. विवाह समुपदेशक म्हणतात की नवरा बायकोचं नातं पैशांवर टिकत नाही. पैशांवर घर चालतं , नातं नाही. हे नातं टिकवण्यासाठी, ते दृढ आणि अर्थपूर्ण करण्यासाठी दोघांमधे भावनिक जवळीक असणं, एकमेकांबद्दल सहानुभूती असणं, कळकळ असणं आवश्यक असते. ती नसेल तर जोडीदार किती का अडचणीत असू देत दुसर्‍याला त्याबद्दल काहीच वाटत नाही. दोघांमधला भावनिक कोरडेपणा दोघांमधला संवाद तोडतो, शरीर संबंधाची ओढ हिरावून घेतो, नातं निरर्थक करतो.

ही चार कारणं नवरा बायकोला घटस्फोटाचा निर्णय घेण्यास भाग पाडतात. आपलं नातं जपायचं तर ही कारणं वजा करत जाणं आवश्यक असल्याचं विवाह समुपदेशक म्हणतात.