कोथिंबीर लवकर सडते - पाने पिवळी पडतात? सोपी ट्रिक, आठवडाभर फ्रीजशिवाय राहिल ताजी-हिरवीगार
Updated:August 24, 2025 12:40 IST2025-08-24T12:36:55+5:302025-08-24T12:40:35+5:30
Keep coriander fresh : Store coriander without fridge: Prevent coriander leaves from turning yellow : काही सोप्या पद्धतीने आपल्याला फ्रीजशिवाय आठवडाभर कोथिंबीर ताजी आणि हिरवीगार ठेवता येईल.

कोथिंबीरीशिवाय पदार्थाला चव येत नाही. सुकी- मसालेदार भाजी असो किंवा वरण असो. वरुन भुरभुरण्यासाठी कोथिंबीर हवीच. कोथिंबीर पदार्थाची चव वाढवते. कोथिंबीर खाल्ल्याने आरोग्याला अनेक पद्धतीचे फायदे होतात. (Keep coriander fresh)
अनेकदा बाजारातून आणलेली कोथिंबीर खराब होते- पाने पिवळी पडतात. त्यामुळे तिला जास्त दिवस साठवून ठेवणं थोडं कठीण काम होऊन बसते पण काही सोप्या पद्धतीने आपल्याला फ्रीजशिवाय आठवडाभर कोथिंबीर ताजी आणि हिरवीगार ठेवता येईल. (Store coriander without fridge)
कोथिंबीरच्या पानांमध्ये भरपूर ओलावा असतो. तो ओलावा उष्णता आणि हवेच्या संपर्कात आल्यामुळे कोथिंबीर लवकर खराब होते. जर योग्य पद्धतीने साठवले नाही तर अवघ्या २ दिवसांत पाने पिवळी किंवा काळी होऊ लागतात. बऱ्याचदा आपण कोथिंबीर पॉलिथिनमध्ये गुंडाळून ठेवतो. ज्यामुळे जास्त ओलावा निर्माण होतो. ज्यामुळे पाने देखील कोमेजतात.
सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे कोथिंबीर पाण्याने स्वच्छ धुवून सुकवा. यानंतर सुती कापडात किंवा मलमलच्या कापडात गुंडाळा. टोपली किंवा झाकण असलेल्या भांड्यात ठेवा. हवेपासून दूर ठेवल्यास आठवडाभर पाने ताजी राहतात.
गावाकड्याच्या बाजूला अनेकजण मातीच्या भांड्यांचा वापर करतात. जर आपण कोथिंबीर मातीच्या भांड्यात झाकून ठेवली तर दीर्घकाळ टिकण्यास मदत होईल. मातीची भांडी थंड असतात, ज्यामुळे कोथिंबीर फ्रेश राहिल.
जर आपण कोथिंबीर झाकण असलेल्या डब्यात ठेवली तर त्यात लिंबाची साल घाला. यामुळे ती लवकर खराब होणार नाही. लिंबाच्या सालीमुळे बॅक्टेरियाचा प्रसार रोखला जातो आणि पाने हिरवीगार राहतात.
अनेकदा कोथिंबीर आपल्याला मुळांसहित मिळते अशावेळी आपण त्याची मुळे मातीने झाकली तर पाने आठवडाभर ताजी राहतात. यासाठी मुळांना थोडे ओले करा आणि कापडाने झाकून ठेवा.
आपल्याकडे फ्रीज नसेल तर आपण वर्तमानपत्रात कोथिंबीर ठेवू शकतो. यासाठी आपल्याला कोथिंबीर व्यवस्थित स्वच्छ करुन वर्तमानपत्रात गुंडाळावी लागेल. वर्तमानपत्र जास्त ओलावा शोषून घेते आणि पाने बराच काळ ताजी ठेवते.