दक्षिण भारताची ओळख असणाऱ्या ५ भरजरी साड्या! लग्नसमारंभात नेसण्यासाठी यातली १ तरी आपल्याकडे असावीच...
Updated:November 8, 2025 09:16 IST2025-11-08T08:57:13+5:302025-11-08T09:16:47+5:30

लग्नसराईचे दिवस आता सुरू होत आहेत. यानिमित्ताने सिल्कच्या भरजरी साड्यांची खरेदी करायची असेल तर दक्षिण भारताची ओळख असणाऱ्या या काही सुंदर साड्या आपल्याकडे असायलाच हव्या...
तामिळनाडूची कांजीवरम साडी म्हणजे गर्भरेशमी काठ आणि अतिशय तलम पोत असणारी. कांजीवरम साडीला दक्षिण भारताच्या काही भागांमध्ये ब्राईडल सिल्क साडी म्हणूनही ओळखलं जातं, कारण तिकडे नववधूंची या साडीला पहिली पसंती असते. या साडीला ४०० वर्षांहून मोठा इतिहास आहे. या साडीचे वैशिष्ट्य म्हणजे याचा पदर आणि काठ वेगळे विणले जातात आणि शेवटी साडीचा मुख्य भाग, पदर आणि काढ एकत्र जोडले जातात. दोन्ही भागांना जोडणाऱ्या झिगझॅक पॅटर्नला पिटणी असे म्हणतात.
धर्मावरम सिल्क साडी ही आंध्रप्रदेशची ओळख. तिथल्या अनंतपूर जिल्ह्यातल्या धर्मावरम शहरात या साड्या प्रामुख्याने विणल्या जातात. या साड्या त्यांच्या विणकामाच्या विशिष्ट पद्धतीसाठी, विविध रंग आणि साडीवरील उत्कृष्ट विणकामासाठी अतिशय प्रसिद्ध आहेत. मोठे काढ आणि आकर्षक रंग हे या साड्यांचे वैशिष्ट्य आहे. प्युअर धर्मावरम सिल्क साडीचे विणकाम हे दोन रंगांमध्ये केले जाते. त्यामुळे या साडीमध्ये दोन शेड्स तयार होतात.
उप्पाडा सिल्क ही आंध्र प्रदेशची निर्मिती असणारी साडी भारतभर प्रसिद्ध आहे. जमदानी साडीचं अधुनिक रूप म्हणून उप्पाडा साडी ओळखली जाते. या साडीवर खूप जरीकाम केलेलं असतं. सिल्क किंवा कॉटन सिल्क या दोन्ही प्रकारात ही साडी मिळते. उप्पाडा साडी वजनाला अगदी हलकी आणि मऊ सूत असणारी असते. असं म्हणतात की या साडीचं जे विणकाम तंत्र आहे, ते मुळचं बांगलादेशचं आहे. पुर्वी या साड्या फक्त सुती असायच्या. पण नंतर मात्र रेशीम धाग्यांमध्ये तसेच सोन्याचांदीच्या जरीमध्येही त्या तयार होऊ लागल्या.
म्हैसूर सिल्क ही कर्नाटकची ओळख. कॉटन सिल्क या प्रकारातही म्हैसूर सिल्क साडी मिळते. या साडीचे काठ तुलनेने लहान असतात आणि त्यावर नाजूक बुट्टी असते. असं म्हणतात जर तुम्हाला अस्सल म्हैसूर सिल्क साडी ओळखायची असेल तर या साडीवर काही थेंब पाणी टाका. जर साडीने पाणी शोषले नाही, तर ती प्युअर म्हैसूर सिल्क साडी आहे असे समजावे.
गढवाल सिल्क ही भारतातील तेलंगणामधील जोगुलांबा गढवाल या ठिकाणी पारंपारिक पद्धतीने बनवली जाते. या साडीला २०० वर्षांहून अधिक मोठा इतिहास आहे. राणी आधीलक्ष्मी देवम्मा यांनी विविध भागातून आलेल्या विणकरांच्या कलेला प्रोत्साहन दिले आणि त्यांची हस्तकला वाढवली. त्यातून या साडीचा जन्म झाला. सुरुवातीला ‘मठियामपेटा’ असं म्हणून गढवाल साडी ओळखली जायची. नंतर तिला गढवाल नावाने प्रसिद्धी मिळाली.