ना गर्भनिरोधक गोळ्या ना कॉपर टी, नको असलेली प्रेग्नन्सी टाळण्याची एक नवीन पद्धत, ३ वर्ष चिंता नाही
Updated:January 30, 2026 13:24 IST2026-01-30T11:32:42+5:302026-01-30T13:24:48+5:30
Subdermal Implant : गर्भधारणा टाळण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्यांचा अनेक महिलांना त्रास होतो. पण जसजसं विज्ञान पुढे जात आहे, गर्भधारणा काही काळ रोखण्यासाठी नवनवीन गोष्टी समोर येत आहेत.

Subdermal Implant : हल्लीचे कपल्स लग्नानंतर फॅमिली प्लॅनिंगबाबत बरेच जागरूक असल्याचं बघायला मिळतं. सामान्यपणे वेळेआधीच प्रेग्नेन्सी नको असेल तर डोळ्यांसमोर कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या, इंजेक्शन किंवा आययूडी म्हणजे इंट्रायूटेराइन डिव्हाइससारख्या गोष्टींचा आधार घेतला जातो. गर्भनिरोधक गोळ्यांचा तर अनेक महिलांना खूप त्रास होतो तर आययूडीमुळे असुविधा जाणवते. पण जसजसं विज्ञान पुढे जात आहे, गर्भधारणा काही काळ रोखण्यासाठी नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. असाच नवा प्रकार म्हणजे'सबडर्मल इम्प्लांट'. गर्भधारणा टाळण्यासाठी याचा वापर कसा केला जातो, हे आज आपण समजून घेणार आहोत.
काय आहे गर्भधारणा टाळणारी ही प्रक्रिया?
मेडिकल सायन्समध्ये या प्रक्रियेला 'सबडर्मल इम्प्लांट' म्हटलं जातं. हे एक छोटसं इम्प्लांट म्हणजे माचिसच्या काडीच्या आकाराचं इम्प्लांट असतं. हे इम्प्लांट हाताच्या कोपराजवळ त्वचेच्या आत लावलं जातं. हाताच्या त्वचेत लावलं जाणारं हे छोटसं इम्प्लांट तीन वर्षापर्यंत प्रेग्नेन्सी रोखू शकतं. म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या आणि आययूडी यापासून सुटका मिळू शकते. गर्भधारणा रोखणारी ही नवीन पद्धती महाराष्ट्रासहीत देशाच्या काही भागांमध्ये वापरण्यात आली आहे.
कसं काम करतं हे इम्प्लांट?
त्वचेच्या खाली लावल्यानंतर इम्प्लांट हळूहळू शरीरात प्रोजेस्टिन नावाचं हार्मोनचा स्त्राव करतं. हे हार्मोन दोन प्रकारे काम करतं. पहिलं म्हणजे स्त्रीबीजाची निर्मिती रोखतं, दुसरं म्हणजे शुक्राणू स्त्रीबीजापर्यंत पोहोचण्यापासून रोखतं. इम्प्लांट केल्यानंतर तीन वर्षे कोणत्या इतर गर्भनिरोधक प्रक्रियेची गरज पडत नाही.
इम्प्लांट काढल्यावर प्रजनन करू शकता
जर आपल्याला गर्भधारणा करायची असेल तर डॉक्टरांच्या मदतीने हे इम्प्लांट काढलं जाऊ शकतं. इम्प्लांट काढल्यानंतर काही दिवसांमध्येच प्रजनन क्षमता नॅचरली परत येते. आययूडीच्या उलट यात कोणताही चिरा मारला जात नाही. गर्भाशयात इम्प्लांट लावलं जात नाही. तसेच यात इन्फेक्शन आणि असुविधेचा धोकाही कमी असतो.
महाराष्ट्रात कुठे ही सुविधा कुठे मिळते?
ही सेवा राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत सुरू करण्यात आली आहे. सध्या राज्यातील सहा माध्यमिक आणि इतरही काही आरोग्य केंद्रावर ही सुविधा उपलब्ध आहे. ज्यात जिल्हा रूग्णालय आणि मेडिकल कॉलेजचा समावेश आहे. भविष्यात मुंबई आणि पुणे सारख्या शहरांमधील आरोग्य केंद्रावर सुद्धा ही सुविधा मिळण्याची आशा आहे.
कसं लावलं जातं इम्प्लांट?
इम्प्लांट एका छोट्या सर्जरीच्या माध्यमातून लावलं जातं. ज्यासाठी केवळ काही मिनिटांचा वेळ लागतो. ही प्रक्रिया नेहमी योग्य डॉक्टरांच्या मार्गदर्शनातच केली जावी.
सबडर्मल इम्प्लांटकडे कुटुंब नियोजन क्षेत्रात एक क्रांतिकारी पाऊल म्हणून पाहिलं जात आहे. हा महिलांसाठी गर्भधारणा टाळण्यासाठी एक सुरक्षित, दीर्घकालिन आणि कमी त्रास देणारा पर्याय ठरतो.