Join us   

गुढी पाडवा स्पेशल : यंदा ठसक्यात नेसा नऊवारी, पाहा नऊवारीचे ९ प्रकार! बघा, तुम्हाला कोणती आवडतेय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2023 5:03 PM

1 / 10
गुढीपाडव्याला नऊवारी साडी नेसायचं ठरवताय? नेसायलाच हवी. शिवलेली नऊवारी काही तशी ठसकेबाज दिसत नाही. ती एक सोय आहे. त्याला ना नाही मात्र नऊवारीचा ठसका हवा आणि नजाकतीचा नखराही तर नऊवारीचे प्रकारही माहिती हवेत आणि नऊवारी झोकात नेसताही यायला हवी. नऊवारी म्हंटलं की एकच एक साडी डोळ्यासमोर येत असली तरी नऊवारी नेसण्याचे प्रकारही अनेक आहेत. आणि आता त्यात काही नवे बदलही आहेत कापडाचे आणि पोताचे. आपल्याला नक्की कोणती शोभेल हे माहिती करुन घेऊ(Styling tips for Gudi Padwa, Know Types of Nauvari Saree).
2 / 10
पूर्वीच्या काळात ब्राह्मणी नऊवारी साड्या मुख्य प्रसंगी नेसल्या जायच्या. ही नऊवारी साडी नेसायची एक विशिष्ट पद्धत आहे. या नऊवारी साडीचा काठाकडचा भाग, वर कमरेला खोचायचा असतो. ज्याला ओचा असे म्हटले जाते. यामध्ये निऱ्यांचा घोळ सुद्धा जास्त असतो. या साडीमध्ये निऱ्या कमरेला न खोचता त्या एकत्र घेऊन त्याचे ‘केळं’ काढले जाते. ही साडी साधारणतः पायापर्यंत झाकलेली असली तरी, पोटऱ्यांचा काही भाग उघडा राहतो.
3 / 10
सध्या सिल्कच्या नऊवारी साड्यांची खूप मागणी आहे. या सिल्क साड्यांमध्ये पैठणी सिल्क नऊवारी साडी जास्त प्रमाणात वापरली जाते. या नऊवारी सिल्क साडीचा पदर खांद्यावरून वर खाली अशा प्रकारे काढला जातो. त्याशिवाय मागचा काष्टा काढताना साडीचे दोन्ही काठ मधेमध येतील या तऱ्हेने काढला जातो. फार पूर्वी लावण्यवती या साड्यांचा वापर करीत असत.
4 / 10
नववधूसाठी किंवा इतर कार्यक्रमात, पैठणी ही प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती असते. बाजारात पैठणी नऊवारी शिऊनही मिळते. पैठणी नऊवारी साडी आपण पेशवाई किंवा ब्राह्मणी पद्धतीने सुद्धा नेसू शकता.
5 / 10
बऱ्याच स्त्रियांना शरीराला चिकटून राहणाऱ्या साड्या आवडतात. यासाठी आपण कॉटन ब्लेंडच्या नऊवारी साड्यांचा वापर करू शकता. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, घाम आल्यास ही साडी शोषून घेते. ही साडी आपण ब्राह्मणी किंवा पेशवाई पद्धतीने नेसू शकता. यामध्ये जास्त ब्राईट रंग नसतात. पण नेसल्यावर ही नऊवारी साडी खूप छान दिसते.
6 / 10
पेशवाई नऊवारी साडी नेसण्याची पद्धत थोडीफार ब्राह्मणी पद्धती प्रमाणेच आहे. यात फरक फक्त एवढाच की पेशवाई नऊवारी साडीचा ओचा हा ब्राह्मणी नऊवारी साडी पेक्षा कमी असतो. आपल्याला जर भरजरी साड्या आवडत असतील तर, आपण पेशवाई नऊवारी नक्की वापरू शकता.
7 / 10
कोल्हापुरी नऊवारी साडीमध्ये दोन काष्टा असतात. या साडीला डबल काष्टा असेही म्हटले जाते. अष्ट प्रकारच्या नऊवारी साड्या कोल्हापूर मधील बऱ्याच भागांमध्ये शेतकरी महिला नेसताना दिसतात. ही साडी शक्यतो गुडघ्यापर्यंत नेसली जाते.
8 / 10
नावा प्रमाणेच ही नऊवारी साडी कोळी समाजातील स्रिया नेसतात. समुद्रामध्ये काम करत असताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी कोळी स्रिया ही नऊवारी साडी गुडघ्यापर्यंत नेसतात. ही साडी शक्यतो कोल्हापूरी पद्धतीनेही नेसतात. शिवाय या साडीला जास्त घोळ नसतो. साडी अगदी घट्ट अशी नेसली जाते.
9 / 10
काष्टा साडी हे नऊवारी साडीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. बऱ्याच नऊवारी साडी नेसणाऱ्या शेतकरी महिला साडी गुडघ्यापर्यंत नेसतात. अगदी जुन्या मराठी चित्रपटांमध्ये आपण अभिनेत्रींना काष्टा नऊवारी साडी नेसलेली पाहिले असेल.
10 / 10
ज्याप्रकारे सहावारी साड्यांमध्ये डिझाईनर साड्या आहेत, त्याच प्रकारे डिझाईनर नऊवारी साड्या सुद्धा मिळतात. ज्यांना पारंपरिक किंवा पैठणी नऊवारी आवडत नाहीत. त्यांच्यासाठी खास डिझाईनर साड्या बाजारात उपलब्ध आहे. ही साडी शरीराला अतिशय चापून चोपून बसते. या साडीचा पायाकडील घोळ कमी असतो. ही साडी दिसायला खूप सुंदर दिसते.
टॅग्स : गुढीपाडवा २०१८साडी नेसणेफॅशनब्यूटी टिप्समहिला