थंडीत पेट्रोलियम जेली फक्त ओठांना लावता ? पाहा १० भन्नाट उपयोग, केसांपासून नखापर्यंतच्या कामाची जादू की डिब्बी
Updated:December 15, 2022 14:38 IST2022-12-15T13:57:06+5:302022-12-15T14:38:35+5:30
Benefits of Petroleum Jelly : पेट्रोलियम जेली हा पांढरट, पारदर्शक रंगाचा एक चिकट पदार्थ असतो आणि पेट्रोलियम जेलीत अनेक औषधी गुणधर्म दडलेले असतात.

थंडीच्या दिवसात किंवा एरव्ही सुद्धा आपल्या सगळ्यांच्या बॅगेत पेट्रोलियम जेलीची एक छोटी डबी असतेच. ही पेट्रोलियम जेली हिवाळ्यात फार उपयुक्त ठरते. ओठ फुटले असता, स्किन कोरडी झाल्यावर, किंवा कधी मेकअप रिमूव्हर म्हणून अश्या छोट्या - छोटया गोष्टींसाठी आपण तिचा वापर करतो. पेट्रोलियम जेली हा पांढरट, पारदर्शक रंगाचा एक चिकट पदार्थ असतो आणि पेट्रोलियम जेलीत अनेक औषधी गुणधर्म दडलेले असतात. कोरड्या हवामानाच्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांकडे पेट्रोलियम जेली कायम असतेच. कारण या जेलीमुळे तुम्ही तुमच्या केसांपासून पायांच्या नखांपर्यंत स्वतःचं संरक्षण करू शकता.(Benefits of Petroleum Jelly).
केसांतील स्प्लिट एंड्स कमी करते
जर तुमच्या केसांच्या टोकाला फाटे फुटले असतील. तसेच तुम्ही स्प्लिट एंड्सने त्रस्त असाल तर नक्की या पेट्रोलियम जेलीचा वापर करा. स्प्लिट एंड्सना या पेट्रोलियम जेलीने मालिश करून थोडा वेळ तसेच ठेवा. त्यानंतर शॅम्पूने केस स्वच्छ धुवून घ्या. स्प्लिट एंड्स लवकर कमी होतील.
परफ्युम जास्त काळ टिकण्यासाठी
जर दिवसभर परफ्युम लावून तुम्हाला कायम रिफ्रेश राहायचं असेल तर परफ्युम लावण्याआधी त्या जागेवर पेट्रोलियम जेली लावा. याने तुमचा परफ्युम जास्त काळ टिकण्यास मदत होईल. तसेच दर दोन तासांनी परत परफ्युम लावायची गरज नाही भासणार.
भुवयांवर लावा
जर तुमच्या भुवयांच्या केसांची संख्या कमी असेल आणि तिथली स्किन कोरडी पडत असेल तर पेट्रोलियम जेलीचा वापर करा. रोज रात्री झोपताना भुवयांवर पेट्रोलियम जेलीने मालिश करा. काही दिवसांतच भुवयांचे केस दाट होतील.
कपड्यांवरील लिप्स्टिकचे डाग काढण्यासाठी
कधी कधी मेकअप करताना चुकून लिप्स्टिक कपड्यांवर लागली तर हा लिपस्टिकचा डाग काढण्यासाठी जेलीचा वापर करा. पेट्रोलियम जेलीमध्ये बेकिंग सोडा मिक्स करून ते डागांवर लावा याने लिपस्टिकचा डाग निघून जाईल.
होममेड शूज शायनर
फक्त कापडापासून बनवलेल्या चपला सोडल्यास पॉलीश चालणाऱ्या चपला, सँडल्स आणि बूट चमकविण्यासाठी पेट्रोलियम जेली हा उत्तम पर्याय आहे. थोडीशी पेट्रोलियम जेली घ्या आणि तुमच्या बूटांवर लावा, मग एखाद्या कपड्याने ती चांगली घासा. यामुळे तुमचे शूज चमकून निघतील.
काचेवरील स्क्रॅच दूर करण्यासाठी
घरातील खिडक्यांच्या काचेवर जर स्क्रॅच आले असतील तर ते घालविण्यासाठी पेट्रोलियम जेली घ्या. काचेच्या ज्या भागावर स्क्रॅच आले आहेत तिथे लावून मग कागदाच्या मदतीने पुसून घ्या. आठवड्यातून २ - ३ वेळा केल्यास काचेवरील स्क्रॅच मार्क्स दूर होतील.
दारे-खिडक्यांचा आवाज कमी करण्यासाठी
जर तुमच्या घरातील दरवाज्यांचा उघडझाप करताना आवाज होत असेल तर दरवाज्याच्या कडांवर पेट्रोलियम जेली लावा. असं केल्यास दरवाज्याचा आवाज येणार नाही. पेट्रोलियम जेली उत्तम वंगण म्हणून काम करते.
मेकअप रिमूव्हर
खूप हेव्ही मेकअप केला असेल तर तो काढण्यासाठी मेकअप रिमूव्हर म्हणून पेट्रोलियम जेलीचा वापर करा. यामुळे चेहेऱ्याला कोणत्याही प्रकारची इजा न होता मेकअप सहज रिमूव्ह करता येतो.
काळेपणा दूर करण्यासाठी
आपण प्रत्येक अवयवांची काळजी घेतो परंतु हाताच्या कोपऱ्याकडे नेहमी दुर्लक्ष होते. यामुळे हे कोपरे काळे पडू लागतात. रोज रात्री झोपण्याआधी कोपरांना पेट्रोलियम जेलीने चांगला मसाज करा. असं केल्यास आठवडाभरातच तुम्हाला कोपरांचा रंग उजळलेला दिसेल.
नेलपेंट नीट लावण्यासाठी
नेलपेंट लावताना कधी कधी ते आपल्या नखांच्या कडांना लागते. असे नेलपेंट दिसताना व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे नेलपेंट लावायच्या आधी नखांना पेट्रोलियम जेली लावल्यास त्यातील चिकटपणामुळे ते नखांच्या कडांना लागत नाही. अश्यारीतीने नेलपेंट नीट लावण्यासाठी पेट्रोलियम जेलीचा वापर करा.
नखांचे सौंदर्य वाढवण्यासाठी
नखांवर सातत्याने नेलपेंट लावल्यामुळे नखांचा चमकदारपणा कमी होतो. नखं निस्तेज आणि कोरडी दिसू लागतात. यासाठी नेलपेंट काढल्यावर नखांवर पेट्रोलियम जेली लावा ज्यामुळे त्यांना पुन्हा नैसर्गिक चमक मिळेल. नियमित हा उपाय केला तर तुमच्या नखांमधील नैसर्गिक चमकदारपणा टिकून राहील.