Join us   

सुंदर दिसायचं ना मग वरवरची रंगरंगोटी थांबवा; ऐश्वर्या राय सांगतेय सुंदर दिसण्याची 'तिची' व्याख्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2021 11:00 AM

1 / 11
ऐश्वर्या राय म्हणजे मूर्तिमंत सौंदर्य. 1 नोव्हेंबरला ऐश्वर्या 48 वर्षांची झाली. पण तिच्या चेहेर्‍यावर तिचं वय सांगणारी एक रेषही दिसत नाही. तिच्या चेहेर्‍यावर तिचं वय नाही तर दिसतं ते फक्त तिचं आरसपानी सौंदर्य.
2 / 11
अनेक आंतरराष्ट्रीय सौंदर्य उत्पादनांची ब्रॅण्ड अँम्बेसेडर असलेल्या ऐश्वर्याच्या सौंदर्याची उंची आपण गाठूच शकणार नाही अशी भावना तिला पाहाणार्‍या महिला आणि मुलींची होते. त्यामुळे एकाच वेळेस तिचं भरभरुन कौतुक करणार्‍या महिला आणि तरुणी तिच्या सौंदर्याचा हेवाही करतात.
3 / 11
नैसर्गिकरित्या सुंदर असलेल्या ऐश्वर्याला वाढत्या वयासोबत सुंदर दिसण्यात काय अडचण असेल? ती तर काय सर्वच इंटरनॅशनल ब्यूटी प्रोडक्टस वापरत असेल असा विचार करुन ऐश्वर्याच्या सौंदर्याचा हेवा वाटणारे मात्र ऐश्वर्या स्वत:चं सौंदर्य कसं जपते हे ऐकून नक्कीच चकित होतील.
4 / 11
देशी विदेशी सौंदर्य उत्पादनांची जाहिरात करणारी ऐश्वर्या स्वत:च्या सौंदर्यासाठी मात्र तिच्या आजी पणजीनं सांगितलेले घरगुती उपायच करते. आपण जर आपल्या सौंदर्याची काळजी घेतली, आपला फिटनेस राखला आणि आपलं आरोग्य जपलं तर सुंदर फक्त मीच दिसेल असं नाही तर आपण सर्वजणी सुंदर दिसू असा सल्ला ती सर्वसामान्य महिला आणि तरुणींना देते.
5 / 11
फक्त चेहेरा सुंदर दिसला म्हणजे आपण सुंदर दिसतो या समजावर ऐश्वर्या आधी काट मारते. आपण अंतर्बाह्य स्वत:ला जपलं, स्वत:ची काळजी घेतली तरच आपला चेहेरा नैस्र्गिक रित्या सुंदर दिसतो असं ऐश्वर्या म्हणते. आणि म्हणूनच आपल्या स्वत:चं उदाहरण देऊन ती तरुणींना आणि महिलांना आपल्या सौंदर्याची कशी काळजी घ्यावी याच्या टिप्सही देते.
6 / 11
ऐश्वर्या म्हणते त्वचा सुंदर तेव्हाच दिसेल जेव्हा ती ओलसर असेल. आद्र असेल. यासाठी मॉश्चरायझर वापरणं जितकं गरजेचं तितकंच घरगुती उटणं वापरणंही आवश्यक आहे. घरगुती उटण्याची सोपी कृती ऐश्वर्या सांगते. दोन चमचे बेसन, पाव चमचा हळद, एक चमचा दूध पावडर आणि एक चमचा ताजं दही यांचं मिश्रण चेहेर्‍याला लेपासारखं लावावं. ते सुकल्यावर हलका मसाज करत ते काढावं आणि चेहेरा कोमट पाण्यानं स्वच्छ धुवावा. हे घरगुती उटणं आपल्या त्वचेची काळजी घेण्यास पुरे आहे असं ऐश्वर्या सांगते.
7 / 11
ऋतुप्रमाणे हवा बदलते. बदलत्या हवेचा परिणाम चेहेर्‍यावर दिसतो. त्यामुळे ऋतुप्रमाणे आपल्या त्वचेची गरज ओळखून आपण आपली सौंदर्य उत्पादनं वापरायला हवीत असा सल्ला ऐश्वर्या देते. तसेच ऋतू कोणताही असला तरी त्वचेची काळजी घेण्यासाठी कोरफड जेल, ऍव्होकॅडोचं पॅक हे नियमित वापरणं, पुरेसं पाणी पिणं , संतुलित आहार घेणं , नियमित व्यायाम करणं हे ‘ब्यूटी थम्ब रुल’असून ते पाळायलाच पाहिजे असं ऐश्वर्या आवर्जून सांगते.
8 / 11
त्वचा निरोगी आणि स्वच्छ तेव्हाच राहील जेव्हा शरीर आतून स्वच्छ असेल. शरीरातल्या रासायनिक क्रियांमुळे शरीरात तयार होणारे विषारी घटक रोजच्या रोज बाहेर पडले तरच त्वचा डीटॉक्स होऊन त्वचेची निर्मळता जपली जाईल. शरीर डिटॉक्स झालं तर त्वचेसंबंधीच्या समस्या निर्माण होत नाही. शरीर डीटॉक्स होण्यासाठी अन्नाचं नीट पचन होणंही गरजेचं असतं. बॉडी आणि स्किन डीटॉक्ससाठी दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी पिणं, भरपूर व्यायाम करुन शरीरातून घाम काढणं हे दोन सोपे उपाय ऐश्वर्या सांगते.
9 / 11
ऐश्वर्याच्या सौंदर्यावर जगाची नजर असते. ही बाब ऐश्वर्यासाठी जितकी अभिमानाची आहे तितकीच तिची जबाबदारी वाढवणारीही आहे. म्हणूनच स्वत:कडे ऐश्वर्या काटेकोर नजर ठेवते. केलेले नियम पाळण्याच्या बाबतीत ऐश्वर्या खूपच शिस्तशीर आहे. ऐश्वर्या म्हणते शिस्त आणि नियम पाळायला आपल्याकडे आपलं लक्ष हवं. बाहेरुन कोणी आपल्याला हे सांगू शकत नाही. आपल्यालाच स्वत:ला हे सांगावं लागतं, बाई नियम पाळ तरच तुझं ठिक चालेल.
10 / 11
आपण काय खातो, काय पितो, किती व्यायाम करतो, वेळेवर झोपतो -उठतो की नाही यासर्व गोष्टी बारकाईनं बघून त्याबाबतचे नियम पाळण्याचा आग्रह ऐश्वर्या स्वत:बाबत तर धरतेच पण हे नियम इतर सर्वसामान्य महिलांनी पाळावेत असाही आग्रह धरते.
11 / 11
दिवसातून तीन वेळा भरपेट न खाता दर दोन दोन तासांनी थोडं पण पौष्टिक खाणं , दोन्ही वेळेसच्या जेवणात आरोग्यास आवश्यक अशा घटकांनी युक्त असलेला संतुलित आहार घेणं, हिरव्या भाज्या, सॅलेड आणि मोड आलेली कडधान्यं खाणं, उकडलेल्या भाज्या खाणं तसेच तळलेले आणि मैद्याचे पदार्थ आहारातून वजा करणं हे नियम ऐश्वर्या काटेकोर पाळते. हे वाचल्यावर ऐश्वर्या जे करते ते आपणही सहज करु शकतो हे लक्षात येतं. कोणासारखं सुंदर दिसण्यासाठी म्हणून नाही तर स्वत:ला छान वाटावं, आपला प्रेझेंस आपल्याला आणि इतरांना सुखावणारा असावा यासाठी सुंदर दिसावं असं ऐश्वर्या जे म्हणते ते फार महत्त्वाचं आहे.