Join us  

लहान मुलांचे केसही पांढरे होऊ लागलेत, त्याची ही 7 कारणं आणि त्यावर 5 उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 11:30 AM

लहान मुलांचे केस पांढरे होणं हा आई वडिलांचा चिंतेचा विषय असतो. मुलांचे केस लहानपणीच पांढरे झालेत म्हणून हताश होण्याची गरज नाही. यासाठीचे सोपे सहज घरगुती उपायदेखील आहेत.

ठळक मुद्देकेस पांढरे झाल्यानंतरच नाही तर अशी समस्या आपल्या मुलांच्या बाबतीत होवू नये यासाठी मुलांना रोज आवळा (कोणत्याही स्वरुपात) खायला द्यावा.भोपळ्याची भाजी जितकी पोषक तितकंच त्याचं तेलही गुणकारी असतं. ते सहज घरी तयार करता येतं. केवळ बाह्य उपायांनीच मुलांच्या पांढर्‍या केसांवर उपचार करावेत असं नाही तर मुलांच्या समतोल आहाराकडेही लक्ष द्यावं.

 वयानुसार केस पांढरे होतात हे सत्य तर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. पण केसांची नीट काळजी घेतली नाही तर ते वयाआधीच पांढरे होतात याचाही अनुभव अनेकजण आपल्या तरुणपणीच घेत आहे. पण लहान मुलांचे (मग ते मुलगी असो वा मुलगा) केस पांढरे होण्याचं प्रमाण वाढलं आहे. तरुण वयात किंवा प्रौढ वयात केस पांढरे झाले तरी ते काळे करण्याचे मेहेंदी, कलरींग, हेअर डाय असे उपाय करता येतात पण लहान मुलांच्या बाबतीत या उपायांचा उपयोग कसा करणार?लहान मुलांचे केस पांढरे होणं हा आई वडिलांचा चिंतेचा विषय असतो. पण चिंता सोडून यावर काही उपाय करायचा असल्यास आधी लहान वयात केस पांढरे का होतात याची कारणं शोधायला हवीत. मुलांचे केस लहानपणीच पांढरे झालेत म्हणून हताश होण्याची गरज नाही. यासाठीचे सोपे सहज घरगुती उपायदेखील आहेत.

लहान मुलांचे केस पांढरे होतात कारण..

1. शरीररात मेलेनिन रसायन निर्मिती थांबते2. शरीरात पोषक घटकांची कमतरता निर्माण होणं3. ब जीवनसत्त्वाची कमतरता असणं4. काही शस्रक्रिया आणि त्यामुळे घ्यावी लागणारी औषधं5. मुलांची रात्री नीट झोप न होणं6. अभ्यासाचं खूप टेन्शन घेणं7 अनुवांशिकता

या कारणांमुळे मुलांचे केस लहानपणीच पांढरे होतात. पण मुलांचे केस लहानपणीच पांढरे झाले म्हणून पालकांनी निराश न होता त्यावर उपाय करायला हवेत. मुलांचे केस लवकर पांढरे होत आहेत असं दिसल्यास घरगुती उपाय करायला सुरुवात करावी. हे उपाय स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या सामग्रीतून सहज करता येतात.

लहान मुलांच्या पांढर्‍या केसांवर उपाय काय?

1. लहान वयातच मुलांचे ( मुलांचे/मुलींचे ) केस पांढरे होत असल्याचं लक्षात येताच आधी त्यांच्या आहारात आवळ्याचा समावेश करावा. आवळा हा केस आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. केस पांढरे झाल्यानंतरच नाही तर अशी समस्या आपल्या मुलांच्या बाबतीत होवू नये यासाठी मुलांना रोज आवळा (कोणत्याही स्वरुपात) खायला द्यावा. किमान एक आवळा तरी मुलांनी खायला हवा. आवळ्याचा मुरब्बा, आवळा कॅण्डी किंवा आवळ्याची चटणी यास्वरुपात आवळा मुलांना खायला द्यावा2. खोबर्‍याच्या तेलात आवळा घालून तो गरम करावा. तेलात तो चांगला शिजायला हवा. तेल थंडं झालं की तेलात तो चांगला स्मॅश करुन घ्यावा. तेल आवळ्याचं हे मिश्रण एका बाटलीत भरुन त्याने रोज मुलांच्या केसांना मसाज करावा. रोज जमलं नाही तर किमान एक दिवसाआड हा मसाज करावा.3. थोड्या दह्यात एक टमाटा घालून तो वाटून घ्यावा. या मिश्रणात लिंबू पिळून घालावं. ही पेस्ट मुलांच्या केसांना लावावी आणि एक तासानंतर केस धुवावेत. आठवडयातून किमान दोन वेळा हा उपचार केल्यास मुलांच्या केसांना पोषण मिळतं. यामुळे केसही चांगले होतात. आणि केस पांढरे होण्याचं प्रमाण नियंत्रणात येतं.

4. रीठे, सुकलेला आवळा आणि शिकेकाई शेंगा हे रात्रभर लोखंडी कढईत पाण्यात भिजवावे. सकाळी पाणी काढून घेऊन हे जिन्नस मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावं. ही पेस्ट मुलांच्या केसांना लावावी. एक तास ठेवावी. नंतर केस धुवावेत. या उपायानं मुलांचे केस पांढरे होण्याचं थांबतं आणि केसही दाट आणि मुलायम होतात.5. भोपळ्याची भाजी आपण खातोच पण केसांच्या आरोग्यासाठीही भोपळा तितकाच महत्त्वाचा असतो. यासाठी भोपळा चिरुन त्याच्या बारीक फोडी करुन घ्याव्यात एक कप खोबर्‍याच्या तेलात या फोडी घालून त्या चांगल्या उकळून घ्याव्यात. भोपळ्याची फोडी काळ्या होईपर्यंत तेल उकळावं. त्यानंतर गॅस बंद करुन तेल थंड होवू द्यावं. थंड झालेल्या तेलातून भोपळ्याच्या फोडी काढून टाकाव्यात. हे तेल एक बाटलीत भरुन ठेवावं. या तेलानं मुलांच्या केसांना रोज मसाज करावा.

पण हे लक्षात असू द्या!

लहान मुलांचे केस अकाली पांढरे झाले तर हे उपाय नक्कीच करता येतात . पण या उपायांसोबतच आधीपासूनच मुलांच्या आहारची काळजी घेणंही आवश्यक आहे. त्यासाठी मुलांच्या आहारात रोज हिरव्या पालेभाज्या, एक फळ, डाळी आणि मोड आलेली कडधान्य असतील याकडे लक्ष द्यावं. दूध, दही आणि पनीर या पदार्थांनीही केसांचं आरोग्य चांगलं राहातं. हे पदार्थही मुलांच्या पोटात नियमित जातील याची काळजी घ्यायला हवी .