Join us  

स्पर्श हरवतो आपल्या आयुष्यातून तेव्हा काय घडतं? स्पर्शाशिवायच्या आयुष्याची गोष्ट..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 5:12 PM

‘लोक काय म्हणतील’ ही भावना आपल्या मनात एवढी पक्की घर करून बसली आहे की आपण कितीतरी वेळा चांगल्या स्पर्शापासून लांब राहतो हे आपल्याला कळत नाही.पण हा ‘स्पर्श’च एखाद्याला कुशीत घेवून स्थिर करणारा असतो आणि तो व्यवसाय असू शकतो हे जर कोणी सांगितलं तर आपण त्याला वेड्यात काढू.

ठळक मुद्देआपल्याकडे ‘स्पर्श’ कडे नेहमीच चुकीच्या नजरेनं पाहिलं गेलं आहे.जवळ जवळ निषिद्धच समजलं गेलं आहे.जसजसं वय वाढत जातं तशी स्पर्शावर बंधनं येतात. ‘स्पर्शा’ला घाबरणाऱ्या,त्याबाबत गैरसमज असणाऱ्या आपण सर्वांनीच ‘कॉल हिम एडी’ हा लघुपट बघायला हवा.‘स्पर्श’ आपल्या आयुष्यात किती महत्वाचा आहे,तो नसल्यामुळे माणसं मानसिक अस्वस्थतेत अडकून राहतात.

- अश्विनी बर्वे

‘सारखं काय आहे अंगाशी,चल हो बाजूला’ असं म्हणत आपल्याला येवून चिकटणाऱ्या लहान मुलांना मोठी माणसं बाजूला ढकलत असतात.मुलं लहान असतात आणि त्यांना कळत नसतं तोपर्यंत त्यांना पाप्या घेवून गुदमरून टाकणारी मोठी माणसंही असतात.पण असे प्रसंग फार कमी वेळा मुलांच्या आयुष्यात येतात. आपल्या भारतीय मनाला ‘स्पर्श’ ही कल्पनाच फारशी आवडत नाही. शक्य तेवढं तिला आपण लांब ठेवतो.त्याविषयी कधी मोकळेपणे बोलतही नाही.सहज रस्त्याने हातात हात घालून चालणारी जोडपी सुद्धा दिसत नाही. हनिमूनला गेल्यावर जेवढा मोकळेपणा परक्या रस्त्यावर दाखवला असेल तेवढाच.अर्थात काहींना तेवढाही आवडत नाही. इतर वेळी मुलांसमोर सुद्धा आईवडील शेजारी शेजारी बसत नाही की, सहज हात हातात घेत नाही. ‘नकोच ते’ हिच भावना आपल्या मनात असते. कारण ‘लोक काय म्हणतील’ ही भावना आपल्या मनात एवढी पक्की घर करून बसली आहे की आपण कितीतरी वेळा चांगल्या स्पर्शापासून लांब राहतो हे आपल्याला कळत नाही.पण हा ‘स्पर्श’च एखाद्याला कुशीत घेवून स्थिर करणारा असतो आणि तो व्यवसाय असू शकतो हे जर कोणी सांगितलं तर आपण त्याला वेड्यात काढू.  ‘स्पर्शा’ला घाबरणाऱ्या,त्याबाबत गैरसमज असणाऱ्या आपण सर्वांनीच ‘कॉल हिम एडी’ हा लघुपट बघायला हवा. माणसाच्या आयुष्यात स्पर्श किती आवश्यक असतो आणि त्याचा माणसाच्या जीवनावर कसा सकारात्मक परिणाम होतो हे या लघुपटामुळे आपल्या लक्षात येतं.अर्थात आपल्या मनातल्या ‘स्पर्शा’ बद्दलच्या कल्पना हे आजच्या काळात आजूबाजूला जे दिसतं त्यावरून सुद्धा तयार झालेल्या असतात.पण माणसाला या लघुपटात दाखवला तसा स्पर्श हवा असतो हे आपल्या लक्षात येईल आणि ‘स्पर्शा’बद्दलच्या आपल्या कल्पनांकडे आपण नव्यानं बघायला शिकू एवढं मात्र नक्की.

     

बंगलोर मध्ये ‘कडलर’चा म्हणजे ‘कुशीत घेण्याचा’ व्यवसाय एडी करत असतो.भारतात हा व्यवसाय बेकायदेशीर आहे,पण जगात काही ठिकाणी याला भावनात्मक उपचार समजले जाते आणि त्याला मान्यता आहे.असा व्यवसाय करणाऱ्या एडीची मुलाखत घेण्यासाठी रिया ही पत्रकार येते.मुलाखत झाल्यावर तिला हा उपचार करून बघावासा वाटतो.अर्थात तिच्या मनात खूप शंका असतात.कारण कोणत्याही स्त्रीला एखादा पुरुष स्पर्श करतो तेव्हा तो निव्वळ लैंगिकच असणार असं वाटतं.कारण ती आजूबाजूला कोणत्या ना कोणत्या कारणाने स्पर्श करून त्रास देणारी मंडळी बघत असते.म्हणूनच रिया तिच्या मनात आलेला प्रश्न एडीला विचारते.पण एडीकडे तिच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं.तो माणसाच्या ‘स्पर्श’या मुलभूत गरजेचं तत्वज्ञान तिला सांगतो. तो रियावर उपचार करत असतांनाच आपल्याला त्याच्या आयुष्यातील व्यवसायाची प्रेरणा कळत जाते.

   

आपल्याकडे ‘स्पर्श’ कडे नेहमीच चुकीच्या नजरेनं पाहिलं गेलं आहे.जवळ जवळ निषिद्धच समजलं गेलं आहे.लहानपणी मुलं-मुली एकत्र खेळतात, तेव्हा जी सहजता असते ती पुढं मोठं झाल्यावर नसते.त्याला वासनेचा वास यायला लागतो आणि तसा शिक्का बसतोही. जसजसं वय वाढत जातं तसतसं त्यावर बंधनं येतात. काहीवेळा आपणहून घातली जातात तर काहीवेळा समाजाच्या भीतीनं.पण ‘स्पर्श’नको ही भावना त्यामुळे पक्की होत जाते. पण हा लघुपट आपल्या भावनांना काही प्रश्न विचारतो.मानवी स्पर्शाचं महत्व आपल्याला उलगडून दाखवतो. प्रत्येकाला पुढे जायची घाई आहे,टार्गेट पूर्ण करायची आहेत.अशावेळी हा लघुपट आपल्याला काही सांगू पाहतो. ‘स्पर्श’ आपल्या आयुष्यात किती महत्वाचा आहे,तो नसल्यामुळे माणसं मानसिक अस्वस्थतेत अडकून राहतात.हे ही यातून आपल्याला कळत. म्हणूनच लघुपटातला,  'मागच्या वेळी कधी तुम्ही कोणाला प्रेमानं जवळ घेतलं होतं?'हा प्रश्न बघणाऱ्यांना विचार करायला लावतो.

 

 मुख्य म्हणजे नवीन विषयाचा परिचय करून देतांना हा लघुपट कुठेही भडक होत नाही. तो भारतीय प्रेक्षकांची पूर्ण काळजी घेतो. संजय सुरी आणि इशा चोप्रा या प्रयोगशील कलाकारांचा अभिनय, त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांच्या छटा प्रत्यक्ष बघण्याजोग्या आहेत. कुठेही ओंगळपणा त्यात येत नाही. सहजतेनं लघुपटाचा दिग्दर्शक संजीव विग आपल्याला माहीत असणाऱ्या पण त्याचा आपण गंभीरपणे विचार करत नाही अशा वेगळ्या  विषयाकडे लक्ष वेधून घेतो.

ashwinibarve2001@gmail.com