Join us  

फार उदास आहात , स्वत:ला आनंदी करण्याचे हे 5 उपाय ट्राय करा.. बी हॅपी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2021 2:48 PM

भौतिक सुखं आजूबाजूला असतानाही आपण उदास, निराश दुखी का? तज्ज्ञ विचारतात तुम्ही तुमच्याजवळ आहात की स्वत:पासूनच लांब गेलात? स्वत:ला शोधून आनंदी होण्याचे मार्ग कोणते?

ठळक मुद्देएखाद्याच्या प्रती आभार आणि कृतज्ञता व्यक्त केल्यानं माणसाचं मन आनंदी होवू शकतो. हा कृतज्ञता भाव मात्र मनात सतत असायला हवा.स्वत:ला स्वत:सोबत जोडून खरा मानसिक आनंद मिळवण्यासाठी शरीराला व्यायाम देणं आवश्यक आहे.कोणतीही गोष्ट सजगतेनं केल्यास त्यात लक्ष आपोआपच एकाग्र होतं. काम करताना मनात विचार येऊन लक्ष विचलित होत नाही. सजगता हा कामातलाआनंद मिळवण्याचा उत्तम मार्ग आहे.

जगातली सर्वात अमूल्य आणि दुर्मिळ गोष्ट कोणती? अशी कोणती गोष्ट आहे जी पैसा ओतूनही मिळू शकत नाही. याचं उत्तर म्हणजे सुख. मानसिक सुख. निर्मळ आनंद. सध्या आपण सर्वजण सुखाच्याच मागे धावत आहोत. पण हे सुख गवसतं ते आपल्याला हव्या असलेल्या वस्तूत, वास्तूत , कपड्यालत्त्यात किंवा दागदागिन्यात. पण हे भौतिक सुख आहे. त्यामुळेच ते कमी वेळ टिकतं आणि त्यानंतर पुन्हा वस्तूतून सुख मिळवण्याची इच्छा निर्माण होते. आपण आपल्याला हव्या असलेल्या कितीही वस्तू मिळवत गेलो तरी ते भौतिक सुख असतं. त्याचा परिणाम म्हणून आंतरिक सुख, आनंद मनात निर्माण होत नाही.

Image: Google

तज्ज्ञ म्हणतात आजच्या भौतिक आणि सुखलोलुप जगात हे सुख मिळवण्यासाठी माणसं सतत धावत आहेत. पळत आहेत, धाप लागली तरी न थांबता आपला प्रवास करत आहे. या प्रवासात त्यांना केवळ मिळतं ते वस्तूंचं भौतिक सुख . सुख कोणतं का असेना पैशानं विकत घेता येतं हे एव्हाना सगळ्यांच्याच लक्षात आलं आहे. पण मनाला हवा असलेला आनंद मात्र सुखातून मिळत नाही हे ही खरं. हा आनंद गवसत नसल्यानं जगभरात नैराश्य, भीती, उदासिनता, विमनस्कता या मानसिक आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे. मानसोपचार तज्ज्ञ आणि अध्यात्मिक गुरु यांच्या मते हे सर्व होतं कारणं आपण स्वत:पासून हरवत चाललो आहोत स्वत:पासून हरवण्याचं प्रमाण, त्यातून दुखी चिंतीत होण्यचं प्रमाण बायकांमधे वाढल्याचंही अनेक अभ्यासातून आढळून आलं आहे. तज्ज्ञ म्हणतात की वस्तू, पैसा याच्या मोहापायी आपण सतत पळत असतो. पळता पळता आपण आपल्याशीच नातं तोडून बसतो. आपल्या मनाला काय हवं आहे याची दखल घेण्याकडे दुर्लक्ष करतो. स्वत:पासून तुटलेला माणूस खचतो आणि जीवनाच्या शर्यतीत आत्मिक सुख आणि मानसिक आनंद मिळवण्यास अपयशी ठरतो.

मनाला हवा असलेला आनंद कुठे सापडतो? या प्रश्नाचं उत्तर मानसोपचार तज्ज्ञ, अध्यात्मिक गुरु सांगतात ते म्हणजे स्वत:मधे. एकदा आपण आपल्या स्वत:शी जोडलो गेलो तर आनंदी होता येतं. निर्मळ आनंद काय असतो, याचा अनुभव घेता येतो. मानसिक आजारांपासून दूर राहायचं असेल स्वत:ला स्वत:शी जोडून आंतरिक आनंद मिळवता आला पाहिजे.

स्वत:ला शोधा आणि आनंदी व्हा!

1. कृतज्ञता व्यक्त करा: तज्ज्ञ म्हणतात, अनेक बायकांचं दुखणं हे असतं मी घरातल्या सर्वांच एवढं मन लावून करते पण कोणाला त्याचं काहीच नाही. मनातल्या या असंतोषावर उपाय म्हणजे आपण स्वत: कृतज्ञता व्यक्त करायला लागा, आपल्यासाठी कोणी छोटीशी गोष्ट केली तरी त्याचे आभार मानणे, निसर्गाचे पाना फुलांचे आभार मानणे, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली की आपण स्वत:शी जोडले जातो. यामुळे मनात आनंद निर्माण होतो. आभार -कृतज्ञता व्यक्त केल्यानं मन हलकं होतं. आपण प्रत्येक क्षण अनुभवू शकतो. कृतज्ञता व्यक्त करणं ही बाब आपल्याला मनापासून आनंद देते.

2. व्यायाम महत्त्वाचा: स्वत:ला स्वत:सोबत जोडून खरा मानसिक आनंद मिळवण्यासाठी शरीराला व्यायाम देणं आवश्यक आहे. रोज सकाळी उठल्यानंतर अर्धा ते पाऊन तास व्यायाम करायला हवा. व्यायामाआधी वॉर्मअप करुन सांध्यांना गरम करायला हवं. सांधे गरम झाले, स्नायू व्यायामासाठी तयार झाले की मग आपल्याला आवडेल असा, ज्यातून घाम गळेल असा व्यायाम करायला हवा. नेहेमीच्या व्यायाम प्रकारात सूर्यनमस्काराचा समावेश असायला हवा.

Image: Google

3. ध्यानधारणा: आपल्याला , आपल्या मनाला सर्वात जास्त कोण छळतं तर ते म्हणजे आपल्या मनातले विचार. मनात सतत विचारांची ये जा चालू असते. हेच विचार आपल्याला मन एकाग्र करुन कामातला आनंद घेऊ देत नाही. हेच विचार मनाला अस्थिर करुन शरीराला अस्वस्थ करतात. म्हणूनच विचारांना शांत करणं आवश्यक आहे. विचारांना शांत करण्यासाथी ध्यानधारणेला तज्ज्ञ महत्त्व देतात. ध्यानधारणेची सुरुवात केल्याबरोबर मनातील विचार द्वंद्व संपतं, विचार शांत होतात असं नाही. याला काही वेळ जातो. म्हणूनच ध्यानधारणा नियमित करायला हवी. सुरुवातील मन कितीही एका बिंदूवर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला तरी मनात विचार येत जात राहातात. अशा स्थितीत मनाला विचार बंद करायला न लावता विचार येवू जावू द्यावेत. आपलं लक्ष हे विचारांपेक्षा श्वासावर केंद्रित करावं. श्वास घेणं, सोडणं यावर चित्त एकाग्र करावं. श्वासावर चित्त एकाग्र करताना श्वास घेताना मोजावं आणि श्वास सोडतान मोजावं. सहा वेळा श्वास आत घ्यावा आणि सहा वेळा श्वास बाहेर जोडावा. नतर चार वेळा श्वास आत घेऊन तो आठ वेळा सोडावा. श्वासाला केंद्रित करुन ध्यानधारणा केल्यास मनातील डोक्यातील विचारांचं वादळ शमतं. मन शांत होतं. शांत मन हे आनंदी होण्याचा मार्ग आहे असं तज्ज्ञ म्हणतात.

4. सजगता: कोणतीही गोष्ट सजगतेनं केल्यास त्यात लक्ष आपोआपच एकाग्र होतं. मन भटकत नाही. काम करताना मनात विचार येऊन लक्ष विचलित होत नाही. व्यायाम करत असू, चालत असू, खात असू तेव्हा आपलं मन सजग असेल, जे करतो आहोत त्यातच पूृर्ण लक्ष असेल तर केलेल्या कामाचं समाधान मिळतं. जे खातो आहोत त्या पदार्थांच्या रस, गंध, चव, पोतातून आनंद मिळवू शकतो.

Image: Google

5. चालणं फिरणं- स्वत:त डोकावणं -स्वत:शी बोलणं: आपण कुठेही असू घरात किंवा ऑफिसात थोडा वेळ उठून एकट्यानं शांतपणे चालायला हवं. चालता चालता स्वत:मधे डोकवायला हवं. आपल्या मनात काय चाललं आहे याकडे तटस्थपणे पाहायला हवं. स्वत:चं निरीक्षण करायला हवं, स्वत:शी मनातल्या मनात बोलून आपल्या भावनांचं विरेचन करायला हवं. तज्ज्ञ म्हणतात की या गोष्टी आपलं डोकं शांत, मन निर्मळ ठेवतात. आपल्यासमोर कितीही अवघड प्रसंग आला तरी मनाला त्रास न होता आपण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शांतपणे शोधू शकतो.अध्यात्मिक गुरु, मानसोपचार तज्ज्ञ स्वत:ला स्वत:शी जोडण्याचे हे उपाय सांगतात.या उपायांमधे सातत्य असलं तरच या उपायांचा परिणाम स्वत: सोबतचं नातं घट्ट होवून खरा आनंद प्राप्त करण्यास होवू शकतो.