Join us

अपने ही सुखसों सब लागे, क्या दारा क्या मीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 16:59 IST

पं. राजन मिश्रा कशी श्रद्धांजली वहायची? काय शब्दात खोटे अवसान आणायचे?

ठळक मुद्देमनाच्या सगळ्या संवेदना बाजूला ठेवून मनोरंजन तरी कसे करू? कोणाचे करू?

विजयालक्ष्मी मणेरीकर

फेसबूक व्हॉट्सॲप उघडावेसे वाटत नाहीये. धीर खचत चाललाय. मिनिटा मिनिटाला ओळखी अनोळखी चेहऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वहावी लागतीयं. आता ते शब्दही नकोसे वाटाहेत. हृदयाप्रमाणे अश्रूही शुष्क होतायतं. टायटॅनिक चित्रपटाच्या शेवटच्या क्षणांमध्ये दिसणारी व्हायोलीन वादकांची मृत्यूला कवटाळून टाकणारी विदारक तल्लीनता कशी आणू? मनाच्या सगळ्या संवेदना बाजूला ठेवून मनोरंजन तरी कसे करू? कोणाचे करू?प्रत्येक जण आतून भेदरलेला आहे. खोटेच अवसान आणून चेहऱ्यावर  स्थितप्रज्ञता आणतोय.पुराणातली एक कथा आठवतेय.समुद्रमंथनावेळी देव आणि दानवांची समेट घडवून आणून अमृतकुंभ मिळवण्यात यश मिळाले, असे सांगितले जाते. समुद्रमंथनावेळी देव आणि दानव या दोघांनी वासुकी सर्पाला वारंवार घुसळल्यामुळे त्याच्या मुखातून मोठ्या प्रमाणात विष व धूर बाहेर पडू लागला. या विषाच्या दर्पाने देव आणि दानव दोघेही मृत्यूस शरण जावू लागले. भगवान महादेवांनी हे विष प्राशन केले. देव आणि दानवांना मोठ्या विषप्रादुर्भावापासून वाचवले पण आता या कलियुगात कोण महादेवाला जागृत करणार? तेंव्हा युद्ध देव आणि दानवांत होते आता असा फरक राहिलाय? आता हे बळी थांबणार का? आता अमृतकुंभ कोण आणणार?

पं. राजन मिश्रा ? जेव्हा पासून गाणं कळायला लागलं तेंव्हापासून त्यांच्या कॅसेट्सनी आमच्या घरातल्या अलमाऱ्या भरलेल्या असायच्या. माझ्या वडिलांना त्यांच्या गायकीचे अक्षरशः वेड लागले होते असेच म्हणावे लागेल, इतके आम्ही पं. राजन साजनजींना दिवस अन् रात्र ऐकायचो. रोज त्यांनी गायलेले राग ऐकल्याशिवाय दिवस संपायचा नाही. घरंदाज गायकी, अतिशय संथ पण दमदार राग विस्तार! धीरगंभीर आवाजात सुरू झालेली आलापी कसदार तानांपर्यंत आपण विस्मयीत होवून तल्लीनतेने ऐकत राहतो. मी १९९८ मध्ये पुण्यात शिकत असताना स्पीकमॅके तर्फे विरासत हा तीन दिवसांचा शास्त्रीय संगीत महोत्सव केला होता. त्यावेळी मी स्पीकमॅकेची वाॅलंटीअर होते. मला सारंगदादाने ( श्री. सारंगधर साठे) सांगितले तु पं. राजन साजन मिश्रांसोबत रहायचे , त्यांची सगळी सोय बघायची, सेवा करायची मग काय मजसाठी आकाश ठेंगणे! तेंव्हा मी या तेजस्वी कलाकारांचे तेज जवळून अनुभवले होते. त्याच कार्यक्रमात मला त्यांना तानपुरा साथ करण्याची संधी मिळाली होती तो स्वर्गीय आनंद मी आजही विसरू शकत नाही. त्यानंतर अनेकदा त्यांच्या मैफिलीला जावून त्यांना भेटण्याचे वेडच लागले होते.त्यांनी अजरामर केलेले भजन जगत में झुटी देखी प्रीत... तर डोळ्यात पाणी आणल्याशिवाय रहात नाही. माझे वडील जवळजवळ प्रत्येक मैफिलीत हे भजन गातात..

जगत में झूठी देखी प्रीत।अपने ही सुखसों सब लागे, क्या दारा क्या मीत॥मेरो मेरो सभी कहत हैं, हित सों बाध्यौ चीत।अंतकाल संगी नहिं कोऊ, यह अचरज की रीत॥मन मूरख अजहूँ नहिं समुझत, सिख दै हारयो नीत।नानक भव-जल-पार परै जो गावै प्रभु के गीत॥

पंडितजी आपणास श्रद्धांजली कशी वाहू? हिम्मत होत नाही. ईश्वर चरणी प्रार्थना आपल्या आत्म्यास शांती लाभो.