Join us  

हरवलेला आत्मविश्वास आणि जगण्यातला आनंद् पुन्हा मिळवता येतो,त्यासाठी फक्त या 3 गोष्टी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 5:13 PM

स्वत:शी सकारात्मक बोलणं. यालाच पॉझिटिव्ह टॉक असं म्हणतात. स्वत::सोबत सकारात्मक कसं बोलायचं याचे काही सोपे मार्ग आहेत. आपला गेलेला आत्मविश्वास आणि हरवलेला आनंद मिळवण्यासाठी हे मार्ग सहज अवलंबून बघता येतील.

ठळक मुद्देआरशासमोर उभं राहावं. स्वत:कडे डोळ्यात डोळे घालून बघावं. आणि स्वत:ला म्हणावं मी सुंदर आहे, हुशार आहे.आपल्याला भविष्यात काय बनायचं आहे याची स्वत: कल्पना करा. ताण दूर करण्याचा एकच मार्ग म्हणजे दिवसभर हसतमुख असा. जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा पोटभरुन, मोकळेपणानं हसा.

आनंदानं जगण्यासाठी काय लागतं? असा प्रश्न कोणी विचारला तर त्याचं उत्तर आहे? आत्मविश्वास, स्वत:विषयीची सकारात्मक जाणीव आणि स्वत:वरचं प्रेम. आनंदानम जगण्यासाठी पैसा-अडका किंवा भौतिक गोष्टींची गरज नसते. आपला आनंद आपल्यातच लपलेला असतो. पण बर्‍याचदा आपल्या आजूबाजूची परिस्थिती, घटना आपल्या आत्मविश्वासावर, आपल्या स्वत:विषयीच्या जाणीवेवर आणि स्वत:वरच्या प्रेमावर नकारात्म्क परिणाम करतात. आपण काही करुच शकणार नाही, आपल्यात काय चांगलं आहे? असं वाटायला सुरुवात होते. आणि हेच आपल्या दुखाचं कारण ठरतं.

आपल्या जगण्यातला हा आनंद आपल्याला परत मिळवायचा असेल तर तो कोणी आयता बाहेरुन आणून देणार नाही. त्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील. गेलेला आत्मविश्वास परत मिळवणं, स्वत:विषयीची जाणीव सकारात्मक करणं, स्वत:वर प्रेम करणं हाच आनंद मिळवण्याचा खरा मार्ग. हा मार्ग प्रत्यक्षात अवलंबता येण्यासाठी अगदी सोपे उपाय म्हणजे स्वत:शी सकारात्मक बोलणं. यालाच पॉझिटिव्ह टॉक असं म्हणतात. स्वत::सोबत सकारात्मक कसं बोलायचं याचे काही सोपे मार्ग आहेत. आपला गेलेला आत्मविश्वास आणि हरवलेला आनंद मिळवण्यासाठी हे मार्ग सहज अवलंबून बघता येतील.

स्वत:बद्दल सकारात्मक बोलण्याचे मार्ग

 

1 मिरर थेरेपी

प्रेम हा जगातल्या सर्व नकारात्मकतेवरचा उपाय आहे. जेव्हा स्वत:बद्दल कमी पणाची भावना वाटत असेल, आपण सुंदर नाही, आपल्यात काही कमी आहे असं जेव्हा वाटत असेल तेव्हा ती भावना आधी मनातून काढून टाकणं गरजेचं आहे. त्यासाठी मिरर थेरेपी कामास येते. आरशासमोर उभं राहावं. स्वत:कडे डोळ्यात डोळे घालून बघावं. आणि स्वत:ला म्हणावं मी सुंदर आहे, हुशार आहे. हे फक्त एकदाच म्हणायचं नाही तर स्वत:ला निरखत अनेकदा म्हणायचं. आपण जेव्हा जेव्हा आरशासमोर उभं राहू तेव्हा तेव्हा स्वत:ला आपण छान असल्याचं, आपलं स्वत:चं आपल्यावर प्रेम असल्याचं सांगावं. ही बाब सलग तीस दिवस केली तर स्वत:बद्दलची नकारात्मक जाणीव बदलते. आपल्यात सर्व काही करण्याची क्षमता असल्याचा आत्मविश्वास येतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्याला आवडू लागतो, स्वत:वर प्रेम करु लागतो.

2 आपल्या भविष्याची स्वत: कल्पना करा

आपल्याला भविष्यात काय बनायचं आहे याची स्वत: कल्पना करा. जी कल्पना केली आहे ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपल्याला काय करायला हवं त्याचा विचार करा आणि त्या दृष्टीने प्रयत्न करायला लागा. इतरांची स्वत:शी आणि स्वत:ची इतरांशी तुलना न करता फक्त स्वत:चा, स्वत:च्या क्षमतांचा विचार केला तर आपण काय आहोत, आपल्यला काय करायला हवं याची स्पष्ट कल्पना येते. आत्मविश्वासासाठी स्वत:ची पूर्ण कल्पना येणं आवश्यक आहे. त्यामुळे कोणीतरी तू अमूक कर, तमूक कर हे सांगण्यापेक्षा मी काय करेल याचा विचार जेव्हा आपण स्वत: करतो तेव्हा आपण त्यादृष्टीने विचार आणि प्रयत्न करायला लागतो. प्रयत्नपूर्वक कृतीतूनही आत्मविश्वास बळावतो.

 

3 दिवसभर भरपूर हसा

आजूबाजूच्या परिस्थितीचा, इतरांच्या अपेक्षांचा ताण नकळत मनावर येतो . या ताणातून मग स्वत:च्या यशाबद्दल साशंकता वाटायला लागते. ही सांशकता आपला आत्मविश्वास कमी करतो आणि आनंदही हिरावतो. हा ताण दूर करण्याचा एकच मार्ग म्हणजे दिवसभर हसतमुख असा. जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा पोटभरुन, मोकळेपणानं हसा. हसल्यानं मनावरचा ताण निवळतो. हसत राहिल्यामुळे आपल्यात सकारात्मकता येते आणि ही सकारात्मकता आत्मविश्वास आणि यश दोन्हीही देते.