Join us  

कितीही चांगलं वागा, लोक आपल्याला छळतातच असं वाटतं तुम्हाला? - मग या ३ गोष्टी वाचा, तो छळ नक्की संपेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 7:36 PM

आपल्याला आनंदी व्हायला शिकायचं असेल , समतोलित वागायला शिकायचं असेल तर आपल्याला आपल्या विचारांवर काम करायला लागेल. आपले विचार हे तर्कसुसंगत होण्यासाठी आपल्या प्रयत्न करावे लागतील आणि या प्रयत्नात सातत्य ठेवावं लागेल. ही विचार प्रक्रिया केवळ तीन उपायांनी सुधारता येते. ते कोणते?

ठळक मुद्देसजग राहिलो आणि आपल्या विचारांशी जोडलेलो राहिलो तर आपण कोणत्या पध्दतीनं विचार करत आहोत याबद्दल आपण जागरुक होतो आणि त्यानुसार योग्य कृती करण्यास तयार होतो.कुठलाही विचार स्वीकारताना आणि त्यावर आधारित विश्वास तयार करताना आधी स्वत:ला विचारा की, आपण जो विचार करत आहोत त्याला आधार म्हणून काही पुरावा आहे का? जर त्या विचारांना आधार असलेला पुरावा नसेल तर तो विचार स्वीकारु नये.विचारांबद्दल सजग राहिलो, आपण जे विचार करत आहोत त्याबद्दलचे पुरावे शोधले तर त्याचा परिणाम आपल्या वागण्या बोलण्यावर , आपल्या कृतीवर होतो. आणि त्यानुसार  परिणामही बदलतात

-अनुराधा प्रभूदेसाई

चुकीचे विचार केले तर आपण त्याच भिंगातून बघू लागतो आणि मग त्याप्रमाणेच वागू बोलू लागतो. याचं मुख्य कारण म्हणजे विचार, भावना /जाणिवा आणि कृती यांच्यामधे जवळचा संबंध असतो. या तिन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असतात आपले विचारच आपल्या जाणीवांना आणि कृतीला चालना देतात. आपण काय विचार करतो यावरच आपल्यात काय भावना निर्माण होतील, आपण कोणती कृती करु हे ठरत असतं. म्हणूनच जर आपण विचारच चुकीचा करत असू तर त्याचा परिणाम म्हणजे आपण उदास होऊ किंवा चिडू आणि त्यानुसार कृती करु. जर आपल्याला आनंदी व्हायला शिकायचं असेल , समतोलित वागायला शिकायचं असेल तर आपल्याला आपल्या विचारांवर काम करायला लागेल. आपले विचार हे तर्कसुसंगत होण्यासाठी आपल्या प्रयत्न करावे लागतील आणि या प्रयत्नात सातत्य ठेवावे लागेल.ही विचार प्रक्रिया सुधारायची असेल तर काय करावं लागेल?  विचार प्रक्रिया सुधारण्यासाठी ती तर्कसूसंगत करण्यासाठी तीन पायऱ्या आहेत.

१ सतत सजग आणि वास्तवात राहावास्तवात जगण्यासाठी , आपण काय आहोत, कुठे आहोत आणि आपण काय करत आहोत याचं भान येणं महत्त्वाचं. त्यासाठी माइंडफुलनेस म्हणजेच सजगता ही मानवी क्षमता विकसित करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा आपण आपल्या विचारांबद्दल जागरुक नसतो. आपले विचार काय आहेत आणि आपल्या आजूबाजूला जे घडत आहेत ते या विचारतूनच निर्माण होत आहे याची आपल्याला जाणीव नसते. सजग राहिलो आणि आपल्या विचारांशी जोडलेलो राहिलो तर आपण कोणत्या पध्दतीनं विचार करत आहोत याबद्दल आपण जागरुक होतो आणि त्यानुसार योग्य कृती करण्यास तयार होतो.

२ विचारांचं मूल्यमापन करा.सजग राहिला तर आपण कसा आणि काय विचार करत आहोत याबद्दल आपण जागरुक होतो. त्यानंतरची पायरी म्हणजे आपण जो विचार करत आहोत त्याचं मूल्यामापन करावं. ते विचार तपासून पाहावेत.विचारंचं मूल्यमापन करण्याची सोपी पध्दत म्हणजे स्वत:ला प्रश्न विचारावा की आपण जो विचार करत आहोत तो तर्कसुसंगत आहे की अवास्तव? आपण जो विचार करत आहोत त्याला काही पुरावे आहेत का?याबाबत सुधा या माझ्या क्लाएण्टचं उत्तर खूप बोलकं आहे. ती माझ्याकडे एक समस्या घेऊन आली होती. तिचं म्हणणं होतं की,तिला लोकांशी संवाद साधायला खूप अवघड जातं कारण तिला वाटतं की ज्यांच्याशी ती संवाद करु पाहात आहे त्यांनी ती आवडत नाही.मी तिला विचारलं, 'लोकांना तू आवडत नाही हे जे तू म्हणते आहेस त्याबाबत तुझ्याकडे काही पुरावे आहेत का? तुला कोणी असं बोलून दाखवलं आहे किंवा न बोलता कृतीतून दाखवलं आहे का?'  माझ्या या प्रश्नाचं उत्तर देताना ती म्हणाली की, ' माझ्याकडे तसे पुरावे नाहीत पण मी जेव्हा त्यांना काही महत्त्वाचं सांगायला जाते किंवा मला जेव्हा वाटतं की मी जे सांगत आहे ते त्यांनी लक्षपूर्वक ऐकावं तेव्हा मला जाणवतं की त्यांना मी आवडत नाहीये!'

 आपण हे असे सुधासारखे पुरावे नसलेले अनुमान काढत बसतो, अंदाज बांधत असतो. या अनुमानाच्या पिंजऱ्यातल्या कैद्यांसारखं आपण वागू लागतो. जसं अनुमान असेल तसं आपण वागणार. जर अनुमान चुकीचं असेल, पुराव्यअभावी तयार झालेलं असेल तर त्यावरुन तयार झालेला विश्वासही चुकीचाच असणार . या अशा प्रकारे अनुमानावर पक्के झालेले विश्वास मनात ठेवून आपण जगाशी वागत असतो. आणि हे विश्वास जर चुकीचे असतील, अवास्तव असतील, तर्कसुसंगत नसतील तर आपल्या मनात निर्माण होणाऱ्या भावनांवर आणि कृतीवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे कूठलाही विचार स्वीकारताना आणि त्यावर आधारित विश्वास तयार करताना आधी स्वत:ला विचारा की, आपण जो विचार करत आहोत त्याला आधार म्हणून काही पुरावा आहे का? जर त्या विचारांना आधार असलेला पुरावा नसेल तर तो विचार स्वीकारु नये.या अशा पध्दतीनं विचारांवर काम केलं की आपल्या विचारांबद्दल जागरुक राहण्यासाठीचं पहिलं पाऊल आपल्याला नक्कीच उचलता येईल. आपल्या चुकीच्या विचारांबद्दलचे पुरावे शोधण्यास याची मदत होईल.

३ परिणाम बदलाइथे पुन्हा जर सुधाचं उदाहरण बघितलं तर लक्षात येईल की सुधाला मैत्री करण्यात अडचणी येत होत्या आणि त्याचा परिणाम म्हणजे ती एकाकी झाली होती. एकटी पडली होती. याचं मुख्य कारण म्हणजे तिचे चुकीचे विचार. त्या विचारांवर तयार झालेला विश्वास. हे विचार आणि विश्वासच तिला मोकळेपणानं बोलण्यापासून, इतरांशी मैत्री करण्यापासून रोखत होते.पण जर सुधानं तिच्या विचारांचं मूल्यमापन केलं असतं आणि तिला जर त्याबद्दलचे पुरावे सापडले नसते तर आपल्या विचारांना आधार देणारे पुरावे नाहीत याची तिला जाणीव झाली असती. मग तिने पुन्हा त्या लोकांशी संवाद साधला असता, त्यांच्याबरोबरचे संबंध दृढ केले असते. म्हणजेच विचारांबद्दल सजग राहिलो, आपण जे विचार करत आहोत त्याबद्दलचे पुरावे शोधले तर त्याचा परिणाम आपल्या वागण्या बोलण्यावर , आपल्या कृतीवर होतो. आणि त्यानुसार परिणामही बदलतात.

( लेखिका मानसशास्त्रज्ञ, कौन्सिलर आणि दिशा कौन्सिलिंग सेण्टरच्या संचालक आहेत.)www.dishaforu.comdishacounselingcenter@gmail.com