Join us  

डोकंच चालत नाही? काय निर्णय घेऊ? अशी सैरभैर अवस्था झाली तर तुम्ही काय करता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2024 3:27 PM

निर्णयक्षमता प्रत्येकाकडे असते, आपण आपले निर्णय स्वत: सहज घेऊ शकतो, घेतच असतो. बघा कसे..

ठळक मुद्देस्वत:चे निर्णय, त्यांची जबाबदारी स्वत: घ्या. इतरांना दोष देत आपलं आयुष्य जगू नका.

आपण रोज अनेक निर्णय घेत असतो. क्षणोक्षणी. अनेकदा तर आपल्याला सतत निर्णय घेण्याचा कंटाळा येतो इतके आपण निर्णय घेतो. साबण कोणता खरेदी करायचा येथपासून लग्न करायचे की नाही आणि करायचे असेल तर कुणाशी करायचे ते आज भाजी काय करु? कोणते कपडे घालू? असे असंख्य निर्णय आपल्याला घ्यावे लागतात. आयुष्यावर दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेताना तणाव येतो. असा तणाव येणे स्वाभाविक आहे, त्यापासून पळून गेलो तर निर्णयक्षमता विकसित होत नाही.

सध्या मानसिक तणाव वाढला आहे याचे एक कारण आपल्याला शंभर वर्षापूर्वीच्या माणसापेक्षा आपल्याला खूप अधिक निर्णय घ्यावे लागत आहेत. आज निर्णय घ्यावे लागत आहेत याचा अर्थ अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत.

निर्णयच घेता येत नाही, असं कसं म्हणता?  १. निर्णय घ्यायचा म्हणजे अनेक पर्यायातील एक पर्याय निवडायचा.असे करताना आपण काहीना काही किमत मोजत असतोच, थोडासा धोकाही पत्करत असतो. पण हा आयुष्याचा भाग आहे असे म्हणून त्याचा स्वीकार करायला हवा.२. काही वेळा आपण महत्वाचा निर्णय घेत आहोत याचेच भान नसते. तथाकथित प्रेमाच्या आणि खरे म्हणजे शारीरिक आकर्षणाच्या तीव्र भावनेच्या भरात अकाली लग्न करण्याची सैराट कृती थ्रिल म्हणून केली जाते. 

(Image :google)

३. कोणताही निर्णय संभाव्य परिणामांचा विचार करून घ्यायला हवा. निर्णय घेताना अनेक पर्यायांचा विचार करून त्यातील सर्वात योग्य वाटतो तो पर्याय निवडला जातो. ही क्षमता वाढवण्यासाठी आपण रोज छोटेमोठे निर्णय घेण्याचा सराव करायला हवा.४. तज्ज्ञ व्यक्तीचा,मित्रमंडळीचा सल्ला घ्यायला हवा, पण हा माझा निर्णय आहे ही जबाबदारी स्वीकारायला हवी. विचार करून घेतलेला कोणताच निर्णय चूक अथवा बरोबर नसतो, जो निर्णय घेतला आहे त्याबद्दल दुसऱ्यांना दोष देत न राहता तो निर्णय बरोबर ठरवण्यासाठी मेहनत घ्यायला हवी. असे करू लागलो की आयुष्यातील मोठे निर्णय देखील घेता येऊ लागतात. ५. स्वत:चे निर्णय, त्यांची जबाबदारी स्वत: घ्या. इतरांना दोष देत आपलं आयुष्य जगू नका.