- अश्विनी बर्वे
श्रावण आला की, आपल्याला तो कळतोच. त्यासाठी कॅलेंडर बघण्याची जरूरी नसते. श्रावणाइतके दृश्यस्वरूप आपल्याला कोणत्याच महिन्याचे ओळखता येत नसावे. म्हणूनच शांता शेळके म्हणतात,
‘जलथेंबांनी कशी चमकते,
सृष्टी ही साजिरी,
कधी हासऱ्या,
कधी लाजऱ्या,
आल्या श्रावणसरी’
छायाचित्र:- गुगल
खरंच आहे ते श्रावणसरी आल्या की, आपल्या चेहऱ्यावर मस्त एक हसू फुलत असते. कारण आपल्या पुढे हिरव्या रंगाचे मुक्त नर्तन चालू असते. आषाढात पाऊस धो धो पडत असतो आणि त्यामुळे धरणीवर आपल्याही नकळत जे बी इतस्तत: पडलेले असते, त्यांना हिरवे कोंब फुटतात. जणू ते झोपेतून जागे होतात आणि स्वप्न बघावे अशी नटलेली हिरवीगार सृष्टी बघतात. उघडे बोडके दगडसुद्धा हिरवी शाल पांघरून घेतात. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यावरसुद्धा मखमली हिरवी चादर पसरलेली दिसते. जी जमीन सुपीक आहे तिला खतपाणी मिळत आहे, ती नटते यात फारसे काही वाटत नाही; पण काळ्या दगडाचे मोठमोठे डोंगरसुद्धा आपल्या कड्याकपारीत फुलून येतात तेव्हा फार मजा वाटते. आपल्याला अपेक्षित नाही अशा ठिकाणी फुलणारी हिरवळ बघितली, तिथले चैतन्य अनुभवले की, आपल्या दुःख करण्याच्या स्वभावाचा राग येऊ लागतो.
छायाचित्र:- गुगल
श्रावण हा मला नेहमी आपल्या आयुष्याचा सोबती वाटतो. तो सतत आपल्या बरोबर असतोच. म्हणजे आपण सुखात आहोत असे वाटत असते त्याचवेळी काहीतरी दुःख, वेदना आपल्या वाट्याला येते आणि ती सावरत असताना, त्यातून बाहेर पडत असतानाच सुखाचा अलगद स्पर्श आपल्याला होतो. श्रावणातल्या ऊन-सावलीच्या खेळासारखेच आहे की नाही हे? आपले फक्त त्याकडे नीट लक्ष नसते. श्रावण म्हणजे सृष्टीचे वैभव अनेक अंगाने दाखवणारा महिना होय. कारण या दिवसात झाडेच नटतात असे नाही, तर झाडाझाडात लपलेल्या घरट्यातल्या पिलांना आवाजही फुटतो. त्यांना पंख फुटलेले असतात. त्यामुळे घरट्याबाहेर पडून आपल्या उत्सुक डोळ्यांनी ते सृष्टीचे वैभव न्याहाळत हरवतात आणि आपल्या आईला हाक घालू लागतात. बुलबुल, कोतवाल, भारद्वाज आणि हळद्या यांच्या पोरांचे टिपेचे आवाज ऐकू आले की, मला कळते अजूनतरी आपल्याकडे सगळे आलबेल आहे.
छायाचित्र:- गुगल
श्रावणाकडे आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या नजरेने बघतो; पण आपल्याला मिळणारा आनंद मात्र तोच असतो. मला श्रावण म्हणजे नक्की काय, हा प्रश्न पडला तेव्हा मला आठवली ज्ञानेश्वरांची एक ओवी. ते म्हणतात,
‘जैसा पंचमालापु सुगंधु /
की परिमळ आणि सुस्वादु /’
हे म्हणजे श्रावण असे मला वाटते. कोकीळ पक्ष्याला कंठ फुटावा आणि त्याने कुहुकुहु असे करत राहावे आणि त्याचवेळी त्याच्या आवाजाला सुगंधही यावा, ज्याने कान तृप्त तर होतातच; पण सुगंध नाक भरून घेतल्याने मनही प्रसन्न होते आणि ज्ञानेश्वर इथे अजून एक सुंदर कल्पना आपल्या समोर मांडतात, ती म्हणजे त्या सुगंधाला चवही यावी आणि त्याने आपली रसना संतुष्ट व्हावी. आवाज, त्याला सुगंध आणि त्या सुगंधाला चवही मला एवढे भारी वाटले ना? तोच हा श्रावण.m
(लेखिका पत्रकार, अनुवादक आहेत.)
ashwinibarve2001@gmail.co