Join us  

घरातल्या हिरव्या कोपऱ्याचं सुख; मन:शांतीसाठी ते का महत्वाचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 3:55 PM

माणूस गरीब असो वा श्रीमंत, आपल्याला निसर्ग सुख देतो, त्याचं ते ताजेपण जगण्यात कसं  आणता येईल?

ठळक मुद्देआपल्या इटुकल्या घरात, बालकनीत, अगदी खिडकीतही कसा फुलवता येईल हिरवा कोपरा

गौरी पटवर्धन

मेट्रो सिटीजमध्ये राहणारी. मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये राहणारी, वाट्टेल तेव्हा वाट्टेल त्या हॉटेलमध्ये जेवायला जाणारी, सतत मॉलमध्ये शॉपिंग करणारी, त्याव्यतिरिक्त ऑनलाईन वस्तू ऑर्डर करणारी चकाचक माणसं. त्यांच्याकडे बघून कोणालाही वाटेल की आपलं आयुष्य असं पाहिजे होतं!किंवालहानमोठ्या कुठल्याही शहरात राहणारी, टू बीएचके किंवा वन बीएचके किंवा वन आरकेच्या फ्लॅटमध्ये राहणारी, घरात एक टू व्हिलर आणि कधी फोर व्हिलर असणारी, कधीतरी बाहेर खाणारी पण शक्यतो घरातच सगळे पदार्थ बनवायला धडपडणारी, खरेदीला गेल्यावर वस्तूच्या आधी किमतीचा टॅग पाहणारी मध्यमवर्गीय माणसं… त्यांच्याकडे बघून कोणालाही वाटेल की आपलं आयुष्य असं पाहिजे होतं!किंवा

अगदी साध्या वस्तीतल्या घरात राहणारी, काबाडकष्ट करून घर चालवणारी आणि मुलांचं शिक्षण करणारी, एक टू व्हिलर घेण्याचं स्वप्न बघणारी, घरातल्या सगळ्यांना दोन वेळ पुरेसं अन्न मिळालं तरी त्यात समाधान मानणारी माणसं… ज्यांच्याकडे बघून कोणालाही वाटेल की माणसाचं आयुष्य इतकं कठीण का असावं?या सगळ्या माणसांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. कोणती माहितीये? ही सगळी आणि यांच्या अध्येमध्ये, आजूबाजूला असणारीही सगळी माणसं एका बाबतीत मात्र अगदी सारखी असतात. घर लागलं, सगळं स्थिरस्थावर झालं, रुटीन लागलं की बहुतेक माणसं घरात एक तरी झाड घेऊन येतात.काही जण तुळशीचं रोप आणतात, तर काही जण कढीपत्त्याचं. कोणी एखादा मोगरा लावतं, तर कोणी घरात मायक्रोग्रीन्स उगवतात. कोणी मुलांना गंमत दाखवण्यासाठी गाजर बशीत ठेऊन रोपं तयार करतात तर कोणी मनी प्लॅंट लावतात. पण शक्यतो सगळी माणसं घरात एक तरी झाड लावतातच. असं का होतं?त्याशिवाय या सगळ्या माणसांमध्ये अजून एक गोष्ट कॉमन आहे. ती म्हणजे हे सगळेच्या सगळे लोक जरा संधी मिळाली की कुठेतरी निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जातात. फार श्रीमंत असतील तर एखाद्या वाईल्ड लाईफ सफारीला जातात. ज्यांना जमतं ते जवळच्या एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जातात. आणि बाकी काहीच जमलं नाही, तरी वर्षाकाठी दोन सुट्ट्यांमध्ये तरी आपापल्या गावी जातातच. तिथे जाऊन राहिले की हे सगळेजण तिथे रमतात. त्यांना तिथे शांत वाटतं. आणि परतीची वेळ झाली की या सगळ्यांची रिऍक्शन एकसारखी असते. “इथून जावंसंच वाटत नाही. इथे किती शांत वाटतंय ना…”

असं का होतं? गावात रोजगार नाही? म्हणून शहरात येऊन पत्र्याच्या एका घरात राहणारा माणूस काय किंवा पॉश एरियात पॉश फ्लॅट घेऊन त्यासाठी दिवसरात्र काम करणारा माणूस काय. त्यांना त्या हिलस्टेशनवर किंवा स्वतःच्याच मूळ गावी असं काय मिळतं जे त्यांना रोजच्या आयुष्यात मिळत नाही? तर निसर्ग! झाडं!माणसाची मूळ वृत्ती ही अत्यंत खोलवर निसर्गाशी जोडलेली आहे. शहरात डोक्याला कितीही कलकल झाली, तरी गाडी किंवा स्कूटर काढून जराशी लांबवर चक्कर मारून आलं, जरा शेतं दिसली, मोठी झाडं दिसली की कोणालाही बरं शांत वाटायला लागतं. कारण झाडं ही माणसाची खरी सोलमेट्स आहेत. पण आता तर असं केव्हाही उठून झाडांकडे जाता येत नाही. मग काय करायचं?आपल्या इटुकल्या घरात, बालकनीत, अगदी खिडकीतही कसा फुलवता येईल हिरवा कोपरा, कसं सापडेल सुख.. त्याविषयी बोलू..पुढच्या भागात.