Join us  

कोरोनाकाळानं असह्य दु:ख दिलं, त्यातून सावरण्याचे हे काही ‘करावेच’ असे उपाय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2021 5:22 PM

परिस्थिती आपल्या हातात नाही, पण जुळवून घेत, सकारात्मक वाट काढत आपण आयुष्य जगण्याचे मार्ग शोधूच शकतो.

ठळक मुद्देआघात, अपघात, दु:खद प्रसंग, भीती, ताण हे अनुभव जे नातेसंबंध, आरोग्य, कामाच्या ठिकाणी किंवा आपल्या आर्थिक परिस्थितीबाबत येतात त्यांचा सामना करणं, त्यांना स्वीकारण्याची प्रक्रिया म्हणजे लवचिकता.लवचिकता हा व्यक्तिमत्त्वाचा गुणधर्म आहे. काही व्यक्तींमधे तो मुळात असतो. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही लवचिकता आपण आपल्यात निर्माण करु शकतो, शिकून घेऊ शकतो, वाढवू शकतो. आयुष्य बदलवून टाकणाऱ्या दु:खद घटना आणि अवघड प्रसंगातून पुन्हा उचल खाणं ही साधी गोष्ट नाही. यासाठी प्रयत्न, वेळ आणि महत्त्वाचं म्हणजे इच्छा आणि उद्देश असणं खूप गरजेचं आहे. याठिकाणी लवचिकता हा गुणधर्म आपली मदत करत असतो.

-अनुराधा प्रभूदेसाई

सध्याच्या परिस्थितीत विशेषत: कोविडच्या उद्रेकानंतर आपल्याला एक गोष्ट जाणवली असेल की आपण जसे पूर्वी होतो तसे आता नाही. आपल्या व्यक्तिमत्त्वात खूप बदल झाला आहे. . आता आपण पूर्वीसारखे बेफिकीरपणे वागत नाही. अनेकजण आता त्यांच्या मित्र मैत्रिणींपेक्षा परिस्थिती उत्तम रितीने हाताळतात आहे, परिस्थितीशी जुळवून घेत आहे. तर आपल्यातले काहीजण असेही आहेत जे होतं आहे, झालं आहे त्याचा अर्थच शोधत बसले आहेत. खरंतर आपल्या आयुष्यात अनेक चढ उतार आणि वळणं येत असतात. आपण यातूनच वाट शोधत पुढे जात असतो. अनेकजण् आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होणं, हादरवून टाकणारा अपघात होणं, जीवावर बेतणारं आजारपण यासारखे आयुष्य मुळातून बदलून टाकणारे गहिरे अनुभव घेत असतात. प्रत्येक बदल हा प्रत्येकावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करतो. पण त्यातून विचारांची लाट येते, भावना कणखर बनतात आणि अनिश्चितता अधोरेखित होते. साधारणपणे आयुष्य मुळातून बदलून टाकणाऱ्या प्रसंगातून ,तणावपूर्वक परिस्थितीतून माणसं काही काळानं बाहेर पडतात. 

हे कशामूळे घडून येतं? 

यासाठी लवचिकतेचे, परिस्थितीप्रमाणे बदलण्याच्या सामर्थ्याचे आभार मानायला हवेत. ही लवचिकता आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची आहे. आज त्याच्याबद्दलच बोलू.

काय असते लवचिकता? 

परिस्थितीप्रमाणे बदलणं म्हणजे नक्की काय? मानसशास्त्रज्ञ आघात, अपघात, दु:खद प्रसंग, भीती, ताण हे अनुभव जे नातेसंबंध, आरोग्य, कामाच्या ठिकाणी किंवा आपल्या आर्थिक परिस्थितीबाबत येतात त्यांचा सामना करणं, त्यांना स्वीकारण्याची प्रक्रिया म्हणजे लवचिकता, अशी लवचिकतेची व्याख्या करतात.लवचिक असणं म्हणजे त्या विशिष्ट व्यक्तीला ताणाचा किंवा भावनिक वेदनांचा अनुभवच येणार नाही असं नाही. परिस्थितीप्रमाणे बदलणारी , लचचिक असणारी माणसं सर्वसामान्य माणसांप्रमाणेच भावनांचा, भावनांच्या तीव्रतेचा अनुभव घेत असतात. पण ती माणसं त्यांच्या लवचिक असण्याच्या गुणधर्मामुळे सर्वांपेक्षा वेगळी ठरतात. ही लवचिकता व्यक्तीमधे जन्मजातच असते की आपण ती शिकून आत्मसात करु शकतो?लवचिकता हा व्यक्तिमत्त्वाचा गुणधर्म आहे. काही व्यक्तींमधे तो मुळात असतो. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही लवचिकता आपण आपल्यात निर्माण करु शकतो, शिकून घेऊ शकतो, वाढवू शकतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आयुष्य बदलवून टाकणाऱ्या दु:खद घटना आणि अवघड प्रसंगातून पुन्हा उचल खाणं ही साधी गोष्ट नाही. यासाठी प्रयत्न, वेळ आणि महत्त्वाचं म्हणजे इच्छा आणि उद्देश असणं खूप गरजेचं आहे. याठिकाणी लवचिकता हा गुणधर्म आपली मदत करत असतो.ही लवचिकता अंगी बाणवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी काय करावं लागेल?

बदलांचा स्वीकार कराअनेक जण बदल पटकन स्वीकारु शकत नाही. ते बदलांना विरोध करत राहतात. आपलं आयूष्य हे गतिमान आहे , ते सतत बदलणारं आहे. बदल हा आयुष्याचा स्वभाव आहे. त्यामुळे बदलांना सामोरं जाण्याचा उत्तम उपाय म्हणजे बदलांचा स्वीकार करा. हे बदल मग शरीरातले असो, नार्तेसंबंधातले असो किंवा जगात घडणारे असो. ते बदल स्वीकारणं हा उत्तम पर्याय आहे. या बदलांसोबत राहा, त्यांच्यासोबत स्वत: बदलत राहा .

भावनिक सजगता निर्माण कराभावनिक सजगता ही जर आपण निर्माण करु शकलो तर हे खूप प्रभावी साधन ठरु शकतं. ही भावनिक सजगता आपल्याला आपली भावनिक परिस्थिती काय आहे, ती आपल्याला काय सांगत आहे हे समजून घेण्यास मदत करु शकते. मानसशास्त्रज्ञस सुसान डेव्हिड म्हणतात की भावना हा डाटा आहे, जो तुम्हाला तुमच्यातल्या आतल्या जगाची माहिती देत असतो.

स्वत:बद्दल करुणा बाळगास्वत:बद्दलची करुणा ही लवचिक होण्याचा मार्ग आहे. स्वत:बद्दल आणि स्वत:मधील कमतरतांबद्दल प्रेमळ असणं महत्त्वाचं आहे. त्यातून स्वत:बद्दलची समज आणि स्वत:ची ओळख निर्माण होत असते आणि लवचिकता आणखी दृढ होते.

दृष्टिकोन बदला -तयार करा सामान्यपणे आपण नेहेमी ज्या दृष्टिकोनातून परिस्थितीकडे बघतो तो दृष्टिकोन बदला. जो तुम्हाला परिस्थितीकडे बघण्याचा, परिस्थितीला प्रतिक्रिया देण्याचा नवा पर्याय देऊ शकतो. आपल्याला परिस्थितीकडे काळ्या- पांढऱ्या या दोनच बाजूने बघण्याची सवय असते. या दृष्टिकोनातून परिस्थितीकडे बघताना आपण परिस्थितीला काळ्या पांढऱ्या बाजूशिवाय चंदेरी -करड्या छटाही असतात हे मात्र विसरुन जातो. लवचिकता या गुणधर्मामूळे व्यक्तीची वाढ होते आणि नव्या दृष्टिकोनातून पाहाता आल्याने त्याचा उपयोग आपल्याला प्रत्यक्ष आयुष्यात करता येऊ शकतो.

कृतज्ञता व्यक्त कराजर तुम्हाला तुमच्या दृष्टिकोनात बदल करुन परिस्थितीकडे पाहाता आलं तर तुमच्या हे नक्कीच लक्षात येईल की सर्वत्र काळोख नाहीये. तर कठीण आणि दू:खाच्या प्रसंगातही चंदेरी छटा आहेत. आहे त्या परिस्थितीबद्दल कृतज्ञता बाळगल्यास  तुमचं आयूष्य एखाद्या कठीण प्रसंगाने थांबून जात नाही. अडखळत नाही तर ते एका लयीत वाहात राहातं.

( लेखिका मानसशास्त्रज्ञ, कौन्सिलर आणि दिशा कौन्सिलिंग सेण्टरच्या संचालक आहेत.)www.dishaforu.comdishacounselingcenter@gmail.com