Join us  

Burn Out : ताण, भीती यामुळे मनाची बॅटरीच चार्ज होत नाही, महिलांच्या मानसिक आरोग्याचं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 5:45 PM

ताणतणाव कसे हाताळले म्हणजे त्याचे रूपांतर आजारात होणार नाही, परिस्थितीला तोंड देताना आपण तर दमून जात नाही ना याची काळजी घेणे तेवढेच महत्वाचे ठरते. नाहीतर बर्न आऊट सिंड्रोम होतो. तसे होवू नये. स्त्रियांचे मानसिक स्वास्थ्य सांभाळले नाही तर घर, समाज कोसळण्यास वेळ लागणार नाही.  

ठळक मुद्देलक्षणांकडे वेळीच लक्ष दिले तर तणावाचे कारण सहज शोधून मार्ग काढता येतो. पण याच गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर ज्याप्रमाणे गाडी बंद पडून मदत घ्यावी लागते तसेच तणावाचे रूपांतर आजारात होऊन मदत घ्यावी लागते.

डॉ. शिरीष सुळे

भारतीय संस्कृतीने स्त्रीला अर्धांगिनी म्हणजे कुटूंबातील ५० टक्के जबाबदारी देऊन सन्मान तर दिला पण तुझे कार्यक्षेत्र चूल आणि मुल यापलीकडे नाही असे सांगून तिचे पंखही छाटून टाकले होते. मात्र अशाही परिस्थितीत झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर, भारतातील सर्वात पहिल्या परदेशात जाऊन वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या डॉ. आनंदी जोशी किंवा महात्मा ज्योतिबा फुलेंसह शिक्षणाची जबाबदारी समर्थपणे पेलणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी त्याकाळात समाजाकडून होणारी मानहानी, अपमान सहन करत आपले ध्येय साध्य केले.  त्यासाठी त्यांच्याकडे होते प्रचंड मनोधैर्य व निर्धार. म्हणून ते जमले. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात आता भारतातील स्त्रियांच्या मानसिकतेमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. देशासाठी पती शहीद झाल्यावर हातपाय गाळून न बसता, स्वत: आर्मीत जाण्यासाठी खडतर शिक्षण घेऊन देशसेवा करत आहेत. सर्व महत्त्वाच्या पदांवर विराजमान होत आहेत.  मात्र हे सर्व बदल काही चुटकीसरशी होत नसतात. 

(छायाचित्र : गुगल)

अजूनही काहीजण स्त्रियांना सांगतातच की, ही सर्व पुरुषांची कामे तुम्हाला जमणार नाहीत, आधी घरचे स्वयंपाकपाणी, मुलांचे संगोपन, सासू सासऱ्यांची सेवा कर, मग तुला काय नसते उद्योग करायचे तर कर. अगदी शालेय वयापासून मध्यमवर्गीय कुटुंबात मुलींना बजावण्यात येते की तू परक्याचे धन आहॆस. म्हणून स्वयंपाक, घरकाम आता पासून शिकून घे. यामुळे बऱ्याच वेळा मुलींची मानसिकता ही तशीच होण्याची शकयता वाढते. ज्या मुली ही बंधने तोडून समाजात आपले स्थान निर्माण करतात त्याच मुली पुढे येतात. पण त्यासाठी त्यांना स्वतःच्या व समाजाच्या मानसिकतेविरुद्ध प्रचंड लढा द्यावा लागतो.सध्या कोविड या आजारामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे देखील बऱ्याच गृहिणींना आयुष्यामध्ये स्वप्नातही पाहिल्या नव्हत्या अशा जबाबदाऱ्या पेलाव्या लागत आहेत. आर्थिक मदती बरोबरच घरातील आजारी व्यक्तीला ही मानसिक आधार द्यावा लागतो आहे. वैद्यकिय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनाच, नर्स,डॉक्टर, ऍम्ब्युलन्स तसेच पोलीस याना सर्वाना डोक्यावर असलेली सामाजिक जबाबदारी पेलून घरच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत आहेत. विशेषतः ज्या स्त्रिया वैद्यकिय क्षेत्रात काम करत आहेत त्यांना तर स्वतःचे आई,वडील,मुले, नवरा यांना भेटणे एकत्र बसून जेवण करणे देखील संकट वाटत आहे. आपल्या मुलांना तर संसर्ग होणार नाही ना अशी भीती सतत मनात असते. मुलांना वेळ देता न आल्यामुळे सर्वच आयांची मानसिक घालमेल झाली, मी आई म्हणून कमी पडत आहे अशी अपराधीपणाची भावना मनात घर करू लागली.निसर्गाने स्त्रीयांना घडविताना अजून एक महत्वाची जबाबदारी टाकली आहे ती म्हणजे प्रजोत्पादन-मुलांना जन्म देणे, त्यांचे संगोपन करणे. त्यामुळे स्त्रियांच्या कार्यक्षम वयातच मासिक पाळी, क्वचित पाळी बरोबर होणारे मानसिक व शारीरिक बदल बाळांतपण, बाळांतपणात पडणारी जबाबदारी व पाळी बंद होताना घडणारे मानसिक व शारीरिक बदल याना तोंड द्यावे लागते.जेव्हा स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने जबाबदाऱ्या पेलत असतात तेव्हाच त्यांना या नैसर्गिक समस्यांनाही तोंड द्यावे लागते. जेव्हा आपण आयुष्यात काहीतरी नवीन वळण घेतो तेव्हा अर्थातच संघर्ष निर्मण होतो पूर्वीच्या रूढी, समाज यांच्यावर मात करून जेव्हा काहीतरी नवीन करियर घडवणार तेव्हा संघर्ष समस्या तयार होतात. ते स्वीकारणे समाजाला व त्या व्यक्तीला बरेच कठीण जाते. कारण तिला तिचा स्वतःचा माईंड सेट बदलावा लागतो. जेव्हा प्रचलित मार्ग सोडून नवीन मार्ग निवडतो तेव्हा ताणतणाव वाढणे सहाजिकच आहे. जेव्हा आपण सरळ रस्त्याने प्रवास करत असतो तेव्हा इतके निर्धास्त असतो की गाडी चालवताना डुलकी पण लागते. पण घाटात प्रवास करताना आपण पूर्ण पाने सावध राहतो व शिताफीने वळणे ओलांडतो. पण ही सावधानता ठेवताना खूपच तणावांना तोंड द्यावे लागते. तसेच प्रचलित रूढी बदलून नवीन मार्गाने जाताना होते. आपली गाडी कितीही नवीन, दणकट असली, अगदी पेट्रोलची टाकी भरलेली असली तरी तिची बॅटरी मात्र व्यवस्थित पाहिजे. नाहीतर त्या गाडीचा काहीही उपयोग नाही. तसेच आपले खाणेपिणे व्यवस्थित असले, व्यायाम करून शरीर सुदृढ असले तरी मानसिक दृष्ट्या मेंदू पण तल्लख पाहिजे. वेळच्या वेळी बॅटरी चार्ज करणे महत्वाचे आहे. 

 

(छायाचित्र : गुगल)

आपण शरीराची खूप काळजी घेतो पण मनाचा कधी विचार करतच नाही. ज्याप्रमाणे गाडी गरम का होते आहे हे वेळीच शोधून काढले नाही तर ती गाडी रस्त्यातच बंद पडते. कारण गाडीत ऑइल नसेल चाक पंक्चर असेल, रेडिएटरमध्ये पाणी नसेल तर पटकन उपाय करून गाडी रस्त्यावर धावते. नाहीतर वेळेत लक्ष न दिल्यामुळे गाडी बंद पडल्यामुळे  मदतीची अपेक्षा करीत रस्त्यातच बसावे लागते. तसेच मनाचे ताणतणाव जो पर्यंत सहन करण्याची शक्ती असते तो पर्यंत मानसिक व शारीरिक कार्य व्यवस्थित चालू असते. पण हेच ताणतणाव सहनशक्ती पलीकडे गेले तर कुरकुर सुरु होते. उदा. सारखी चिडचिड होणे, झोप न लागणे, मनात नैराश्याचे विचार येणे, लहान गोष्टींचे देखील संकट आल्या सारखे वाटणे, भूक न लागणे, वजन कमी होणे, जीवनातील आसक्ती/रस कमी होणे इ. या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिले तर तणावाचे कारण सहज शोधून मार्ग काढता येतो. पण याच गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर ज्याप्रमाणे गाडी बंद पडून मदत घ्यावी लागते तसेच तणावाचे रूपांतर आजारात होऊन मदत घ्यावी लागते.म्हणूच ताणतणाव कसे हाताळले असता त्याचे रूपांतर आजारात होणार नाही, परिस्थितीला तोंड देताना आपण तर दमून जात नाही ना ह्याची काळजी घेणे तेवढेच महत्वाचे ठरते. नाहीतर बर्न आऊट सिंड्रोम होतो.  तसे होवू नये. स्त्रियांचे मानसिक स्वास्थ्य सांभाळले नाही तर घर, समाज कोसळण्यास वेळ लागणार नाही.

(लेखक ख्यातनाम ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ आहेत.)लेखन सौजन्य : आयपीएच आणि माइण्ड लॅबच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या मानसिक जनजागृती उपक्रम