Join us  

नाश्त्याला समोसा खाऊन भारतीय क्रिकेटपटू खेळल्या वर्ल्डकप सामना, आबाळ इतकी वाईट की..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2022 7:12 PM

सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या बीसीसीआयच्या कामकाजाचं नियमन करणाऱ्या नियामक समितीचे एकेकाळी अध्यक्ष असलेले विनोद राय यांनीच अलिकडे एका मुलाखतीत सांगितली भारतीय महिला क्रिकेटची दुरवस्था

चक दे सिनेमा आठवतो, महिला हॉकीकडे पाहण्याचा दृष्टीकोन? कुठं स्वयंपाकघरात पोळ्या लाटणाऱ्या मुली स्टिक घेऊन हॉकी खेळणार, त्यांना कशाला हवा वर्ल्डकप असा दृष्टीकोन. अर्थात तो सिनेमा होता, प्रत्यक्षात असं कुठं होतं का? तर होतं, पुरुष खेळाडूंच्या मापाचे शर्टच नव्यानं शिवून महिला खेळाडूंना देण्यात यायचे असं कुणी सांगितलं तर विश्वास ठेवाल? कुणीही सांगितलं असतं तर विश्वास ठेवणं अवघड होतं, मात्र भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या, बीसीसीआयच्या कामकाजाचं नियमन करणाऱ्या नियामक समितीचे एकेकाळी अध्यक्ष असलेले विनोद राय यांनीच अलिकडे एका मुलाखतीत ही कहाणी सांगितली. आणि मुख्य म्हणजे त्यांनी कबूलही केलं की, महिला क्रिकेटकडे द्यायला हवं होतं तेवढं लक्ष देण्यात आलं नाही. दुर्लक्षच झालं.

(Image : Google)

विनोद राय यांचं ‘नॉट जस्ट नाइटवॉचमन- माय इनिंग्ज इन द बीसीसीआय’ नावाचं पुस्तक नुकतंच प्रसिध्द झालं. त्यासंदर्भात त्यांनी द वीक या साप्ताहिकाला एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत राय यांनी आपली खंत मोकळेपणानं बोलून दाखवली आहे. राय २०१७ ते २०१९ एकूण ३३ महिने नियामक समितीचे अध्यक्ष होते.ते सांगतात, २००६ पर्यंत तर महिला क्रिकेटला कुणी गंभिर्याने घेतच नव्हतं. पुढे शरद पवार यांनी पुुरुष आणि महिला क्रिकेट असोसिएशन एकत्र केल्या. मात्र तरीही महिला क्रिकेटला महत्त्व देण्यात येत नव्हते. मला माझ्या कार्यकाळात समजले की, महिला क्रिकेटपटू ज्या जर्सी वापरत त्या जर्सी पुरुष खेळाडूंच्या असत, त्या पुन्हा कापून शिवण्यात येत असत. मी त्याकाळात नायकेला सांगितलं की, हे असं नाही चालणार महिला क्रिकेटपटूंसाठी वेगळ्या जर्सी डिझाइन व्हायला हव्यात.

(Image : Google)

मात्र तरीही २०१७ च्या महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला तोपर्यंत महिला क्रिकेटची आबाळच झाली.  त्यांना ना उत्तम प्रशिक्षण होतं, ना क्रिकेटची उत्तम साधनं, ना सुविधा, ना क्रिकेट खेळण्याची त्यांची फी पुरेशी हाेती, ना त्यांचे रिटेनर कॉण्ट्रॅक्ट्स. त्या मालिकेच हरमनप्रीत कौरने नाबाद १७१ धावांची खेळी केली. त्या मॅचनंतर मी तिच्याशी बोललो तर ती म्हणाली, माझ्या पायात गोळे आले होते, मला पळवत नव्हतं. म्हणून मी सिक्स मारण्यावरच भर दिला.नंतर मला समजलं की, त्या सामन्याच्या दिवशीही त्यांना हॉटेलमध्ये पुरेसा नाश्ता मिळालेला नव्हता. त्या जेमतेम समोसा खाऊन मैदानात खेळायला उतरल्या.खुद्द राय यांनी ही कथा सांगितली, त्यावरुन सहज लक्षात यावं की किती कष्ट करुन भारतीय महिला क्रिकेटपटूंनी आपली वाटचाल सुरुच ठेवली आहे.

टॅग्स :ऑफ द फिल्ड