Join us  

विधवांसाठीच्या जुनाट प्रथा बंद करणाऱ्या गावाची गोष्ट! गावातल्या आयाबायांसाठी गावानं टाकलं पुढचं पाऊल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2022 1:39 PM

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड गावानं एकमतानं ठरवलं आपल्या गावात विधवांसाठीच्या कालबाह्य प्रथेवर बंदी घालायची, त्यांनी तसा ठरावही केला. सुधारणांच्या वाटेवर एक पाऊल गावानं टाकलं, त्याची गोष्ट.

ठळक मुद्देआपल्या गावातल्या काही महिलांच्या वाट्याला अपमानित जिणं येऊ नये, त्यांना सन्मानानं जगता यावं म्हणून गावानं सुधारणांची वाट चालायचं ठरवलं आहे.चित्र : प्रकाश सपकाळे

संदीप बावचे

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील हेरवाड गाव. हे गाव सध्या सोशल मीडियाच्या जगातही प्रचंड व्हायरल आहे. हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव एकमताने संमत केला आणि राज्यभर हेरवाडचं कौतुक झालं. ४ मे २०२२ रोजी मंजूर केलेल्या ठरावात असं स्पष्ट नमूद करण्यात आलंय, की कायद्यानं प्रत्येक व्यक्तीला सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे. विधवा प्रथेमुळे अनेक महिलांना सन्मानानं जगता येत नाही, त्यामुळे ही प्रथा आपल्या गावात बंद करण्यात येत आहे. पती निधनांतर पत्नीच्या गळ्यातले मंगळसूत्र तोडणं, हातातल्या बांगड्या फोडणं, जोडवी काढणं या गोष्टी केल्या जातात. विधवांना कुठल्याही धार्मिक-सामाजिक कार्यक्रमात भाग घेता येत नाही. यासाऱ्यावर ठरावानुसार हेरवाड गावात बंदी घालण्यात येत आहे. विधवांच्या वाट्याला येणाऱ्या जुनाट प्रथा-परंपरा आणि त्यापायी त्यांची होणारी अवहेलना थांबवावी, निदान आपल्या गावात तरी प्रत्येक महिलेला मानानं जगता यावं म्हणून प्रयत्न करायचे असं या गावानं ठरवलं. हेरवाड या गावाला शिवकालीन इतिहास आहे आणि आता नव्या काळात एक पाऊल पुढं टाकत नवा सुधारणांचा इतिहास लिहू असं गावाला वाटतं आहे. असं म्हणतात की, या गावात एकेकाळी शिवकालीन हेरगिरी खाते होते. त्यावरूनच गावाला हेरवाड नाव पडलं. सध्या गावची लोकसंख्या दहा हजार आहे. पंचगंगा नदीकाठी वसलेल्या या गावात विविध शासकीय योजना राबवण्यावर भर असतोच. आता गावानं ठरवलं की, विधवा प्रथा बंदीचा निर्णय घ्यायचा. तत्पूर्वी गावातील महिलांना एकत्र करुन या प्रथेविषयी त्यांचे प्रबोधनही करण्यात आले. आता या गावाला आशा आहे, की या उपक्रमाला राज्य सरकारनेही पाठिंबा द्यावा. राज्यभर हा उपक्रम राबवावा.

(Image : Google)

मात्र, आपल्या गावात विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घ्यावा असं गावाला का वाटलं असेल? गावकऱ्यांनी नेमकं कसा घेतला हा निर्णय, यासंदर्भात ‘लोकमत’ने हेरवाडमध्ये ग्रामस्थांशी, महिलांशी संवाद साधला. हेरवाड या निर्णयाप्रत आले ते एका व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील प्रमोद झिंजाडे यांनी हा व्हॉट्सॲप ग्रुप सुरू केला. झिंजाडे दोन वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यात एका कार्यकर्त्याच्या अंतिम संस्काराला गेले होते. चितेला अग्नी देत नाही तोच इतर विधवांनी त्या कार्यकर्त्याच्या पत्नीचे कुंकू पुसत, तिचे दागिने काढणं सुरू केलं. ती बिचारी रडत होती, ओरडत होती. पण प्रथा म्हणून सगळं काढून घेण्यात आलं. तो आक्रोश पाहून झिंजाडे यांनी ठरवलं की, गावातल्या अशाप्रकारच्या विधवा प्रथा बंद व्हायला हव्या. त्यासाठी कायदेशीर पाठपुरावा करायला हवा. कोरोनाकाळानंतर ११ फेब्रुवारी रोजी त्यांनी ‘विधवा महिला सन्मान व संरक्षण कायदा अभियान’ या नावाने व्हॉट्सॲप ग्रुप बनवला. यात राज्यातील सरपंच, सामाजिक संस्था, बचत गट, शासकीय अधिकारी यांचा समावेश केला. याच ग्रुपमधील विचारांची प्रेरणा घेऊन हेरवाड ग्रामपंचायतीने ठरवलं की आपण सुरुवात करू. म्हणून मग त्यांनी ग्रामसभेत ‘विधवा प्रथा बंद’चा राज्यातील पहिला ठराव मंजूर केला. गावानं एकमतानं त्याला संमती दिली. हेरवाडने प्रथम हे केल्यानंतर माणगाव ग्रामपंचायतीनेही असाच ठराव मंजूर करत एक पाऊल पुढे टाकले.राज्य विधवा महिला सन्मान व संरक्षण कायदा अभियानाचे समन्वयक प्रमोद झिंजाडे सांगतात, पारंपरिक अनिष्ट रुढींच्या सर्व बंधनातून पत्नीला मुक्त करायला हवं असं मला वाटतं. म्हणून मग मी शंभर रुपयांच्या बॉन्डवर प्रतिज्ञापत्रच केले की, ‘माझ्या मृत्युपश्चात माझ्या पत्नीवर अनिष्ट रुढी, परंपरा लादू नयेत.’मात्र, ज्या गावात हे प्रत्यक्ष घडलं त्या गावातल्या महिलांचं यासंदर्भात काय मत होतं?हेरवाडमध्ये भेटतात मुक्ताबाई पुजारी. त्या ग्रामपंचायत सदस्य आहेत. मुक्ताबाई सांगतात, ग्रामपंचायतीत ठराव झाला, ग्रामस्थांनीही एकमतानं हा निर्णय केला, पाठिंबा दिला. या ठरावामुळे गावातील विधवांचा आत्मविश्वासही वाढेल. आता गावात विधवा म्हणून, रीतीभाती म्हणून जे चुकीचं वागवलं जायचं ते बंद होईल. त्यांना सन्मानानं जगता येईल आणि ग्रामस्थही त्यांचा मान राखतील.’हेरवाड गावचे सरपंच सुरगोंडा पाटील यांचंही तेच मत आहे. ते सांगतात, विधवा प्रथा कायमस्वरुपी बंद व्हावी, यासाठी आमची ही चळवळ आहे. राज्यात यासंदर्भता कायदा होऊन त्याची अंमलबजावणी होईल अशी आशा आहे. मात्र, आमच्या गावातही विधवांना एकत्र करून त्यांना माहिती देऊन आम्ही त्यांचेही प्रबोधन करणार आहे. गावातील इतरांचेही प्रबोधन करण्यात येणार आहे.हे प्रबोधनाचं, लोकांशी संवाद साधण्याचं, जुन्या प्रथा सोडून देण्यासाठी गावकऱ्यांना माहिती देण्याचं काम सामाजिक कार्यकर्तेही करत आहेत. स्वाती भापकर या सामाजिक कार्यकर्त्या ते काम करतात. गावात लोकांशी बोलतात. त्या सांगतात, विधवेला माणूस म्हणून जगण्याचा मूलभूत अधिकार मिळावा यासाठीच हे प्रयत्न आहे. हेरवाड गावानं जे केलं, ते सर्वत्र व्हावं. मात्र एक पाऊल पुढे टाकत गावानं नवी सुरुवात केली यासाठी हेरवाड गावचं अभिनंदनच करायला हवं.हेरवाड गावानं सुधारणांचं एक पाऊल पुढं टाकलं आहे. आपल्या गावातल्या काही महिलांच्या वाट्याला अपमानित जिणं येऊ नये, त्यांना सन्मानानं जगता यावं म्हणून गावानं सुधारणांची वाट चालायचं ठरवलं आहे.

(लोकमत बातमीदार, शिरोळ)