Join us  

..आणि हिमतीने तिनं घेतला हाती वस्तरा; पुरुषांचे मुंडण करणाऱ्या त्र्यंबकेश्वरच्या वैशालीच्या जिद्दीची गोष्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2022 5:49 PM

आपल्या पायावर उभं राहून स्वाभिमानाने जगण्याची लढाई लढणाऱ्या त्र्यंबकेश्वरच्या महिलेची कहाणी

ठळक मुद्देउत्तम आणि मनापासून मेहनतीने काम करत वैशाली कर्तबगारीचा आदर्शच निर्माण करते आहे.

-भाग्यश्री मुळे

सलून म्हंटलं की बायका तिथं जात नाहीत. जुन्या पारंपरिक वळणाचे सलून. आता युनिसेक्स सलून मोठ्या शहरांत उभे राहू लागले आहेत, पण छोट्या शहरात-गावखेड्यात ही गोष्ट अशक्यच. त्यातही एखाद्या महिलेकडे पुरुष केस कापून घ्यायला, गुळगुळीत गोटा करुन घ्यायला येत असतील यावर तर विश्वास ठेवणं अवघड. मात्र  नाशिक जिल्ह्याततील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे मात्र एक वेगळी वाट हिमतीने चालणारी महिला भेटते. त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त कुंड परिसरात भेटतात वैशाली मोरे. धार्मिक विधीसाठी तीर्थक्षेत्री आलेले अनेक पुरुष त्यांच्याकडून मुंडण करुन घेतात. आणि त्या ही आपलं काम अत्यंत कौशल्यानं, आत्मविश्वासानं आणि हिमतीने करतात.वैशालीची दिनचर्या मोठी धावपळीची. भल्या पहाटे ती आपल्या दुकानात हजार होते. तिथं मुंडण करुन घेण्यासाठी पुरुष थांबलेले असतात.  अप्लावधित पाते न लागता, कुठेही न खर्चटता सफाईदारपणे तिने तिचे काम केलेले असते. गुळगुळीत डोक्यावर हात फिरवत, अंगावर सांडलेले केस झटकत एकेकजण पैसे देते मार्गस्थ होतो.  गर्दी असेल तसे कधी कधी दिवसभर तर कधी सकाळ, दुपारच्या सत्रात तिचे काम चालते. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रात,धार्मिक क्षेत्र असलेल्या छोट्याच्या गावात ती शांततेने पण तितक्याच कणखरपणे तिचे काम करत आहे. पण सहसा पुरुषच जे काम करतात ते तू कसं सुरु केलंच असं विचारलं तर वैशाली तिची कहाणी सांगते.

आर्थिक विवंचनेशी दोन हात करताना ईर्षेला पेटून २०१७ पासून वैशालीने वस्तरा हाती घेतला. पतीशी विभक्त झाल्यावर वैशाली पुन्हा त्र्यंबकेश्वरला परतली. पदरात लहान लेक होती. सुरवातीला दोन वर्ष तर ती घरातच होती. मात्र आता आयुष्याची लढाई एकटीने लढायची आहे तर किती दिवस घरात बसणार असा प्रश्न तिला आईने विचारला आणि घराबाहेर पडून काम करण्याची प्रेरणाही दिली. सुरवातीला नारळ सुपारीच दुकान, पूजेच्या कपड्यांचे दुकान चालवून तिने उदरनिर्वाह केला. मात्र अल्प उत्पन्न आणि वाढते खर्च यामुळे ती मेटाकुटीस आली. तिनं भावाला विचारलं की आपल्या कुटुंबाच्या  केशकर्तनाच्या दुकानात काम करु का? बहिण गमतीने म्हणतेय असे वाटून भावाने विषय हसण्यावारी नेला. काही दिवसानंतर तिचा सतत पाठपुरावा सुरूच होता. एक दिवस तिने चिडून आणि अगदी निक्षून भावाला विचारलं की, ‘ तू शिकवतोस की बाहेरच्या दुसऱ्या कुणाकडून शिकू?’ असे विचारले. बहिणीचा निर्धार पाहून रात्री दुकान बंद करण्याच्या वेळी भावाने तिला, ‘तू माझेच मुंडण कर’ असा आदेश दिला. वास्तविक लहानपणापासून कंगवा, वस्तरा पाहत आलेली वैशाली आता मात्र थर थर कापू लागली. भीतभीत कामाला लागली. मात्र भावाला कुठलीही जखम न होवू देता तिनं त्याचं मूंडण केलं.   त्यानंतर महिनाभरात वैशालीने भावाच्या डोक्यावर सतत मुंडण करून चांगला सराव करून घेतला. आई- वडील, भाऊ, बहिणी अशा साऱ्या कुटुंबीयांनी तिला पाठींबा दिला. त्यानंतर एक दिवस भल्या सकाळी दुकानात हजर झाली. नेमके तेव्हा काशीचे एक ब्राह्मण आजोबा मुंडण करून घेण्यास आले होते. भावाने त्यांना, ‘ही माझी बहिण असून तिने मुंडण केले तर चालेल का?’ असे विचारले. आजोबाना हसतमुखाने सहमती दर्शवली. त्यांना नमस्कार करून वैशालीने मुंडणास सुरवात केली. सफाईदारपणे मुंडण केले. आजोबांनी वैशालीला भरभरून आशीर्वाद दिले. त्यानंतर वैशाली थांबलीच नाही. तिचे काम सुरु झाले तेंव्हा भाविक, पर्यटक, गावकरी तिचे काम बघायला जमत होते. मात्र कुणालाही न घाबरता, न लाजता तिनं आपले काम सुरु ठेवले.आता तिचा उत्तम जम बसला आहे. तिचं काम चांगलं चालतं आहे. वैशालीच्या मुलीने एल.एल.बी. पूर्ण केले असून लवकरच आपली लेक वकील होणार याचा वैशालीला आनंद आहे. वैशाली उत्तम स्विमर आहे. त्रंबकला झालेल्या मागील दोन्ही कुंभमेळ्यात तिने कुशावर्तावर जीवरक्षक म्हणून सेवा दिली आहे. अनेकांचे प्राण वाचवले आहे. पोलीस मित्र म्हणून काम केले आहे. महिला दक्षता समितीत सदस्य म्हणून काम करते आहे. वैशालीला आजवर अनेक पुरस्कारही मिळाले आहे. तरुणींना, महिलांना प्रेरणा देण्यासाठी तिला अनेकदा विविध कार्यक्रमात वक्ते म्हणून बोलावले जाते. उत्तम आणि मनापासून मेहनतीने काम करत वैशाली कर्तबगारीचा आदर्शच निर्माण करते आहे.

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)