Join us  

National Technology Day 2022 : नक्को बाई, माझं काही चुकलं तर? तंत्रज्ञान वापरताना बायकांना नेमकी कशाची भीती वाटते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2022 3:24 PM

राष्ट्रीय विज्ञान तंत्रज्ञान दिन !  रोजच्या जगण्यात तंत्रज्ञान वापराची भीती घालवून बायकांना आपलं जगणं सुखकर कसं करता येईल? (National Technology Day 2022, celebrated on May 11)

ठळक मुद्देतंत्रज्ञान आपलं जगणं सोपं करतं, त्याकडे पाठ फिरवायची नाही. शिकायचं नव्या उत्साहात, कुणी काहीही म्हणो वापरायचं.

गौरी पटवर्धन

“नको बाई… मला त्यातलं काही कळत नाही. उगाच काहीतरी गोंधळ होईल. त्यापेक्षा नकोच ते!” हे वाक्य आपण बायकांच्या तोंडून अनेक वेळा ऐकलेलं असतं.एटीएम कार्ड वापरण्याच्या बाबतीत. एअर फ्रायर किंवा मायक्रोवेव्हच्या घेताना. ऑनलाइन पेमेंट करण्याच्या बाबतीत, ईमेल वापरण्याच्या बाबतीत,कॉम्प्युटर वापरतांना, स्मार्टफोन हाताळतांना..कुठलीही नवीन टेक्नोलॉजी वापरण्याची वेळ आली की,बायका चटकन पुढे येत नाहीत हा अनेक घरातील अनुभव असतो. बरं हे तंत्रज्ञान काही फक्त बँक किंवा कॉम्प्युटरच्या बाबतीतलं असतं असंही नाही. जी बाई वर्षांनुवर्ष मिक्सर वापरत असते, जिला ते यंत्र वापरण्याचे सगळे फायदे माहिती आणि मान्य असतात, तिला फूड प्रोसेसर घेण्याबद्दल विचारलं की, तिची बहुतेक वेळा पहिली प्रतिक्रिया येते, “नको नको. कशाला उगाच? उगाच त्याचा फार गोंधळ असतो.”“त्यात कणिक मळता येते.”“नको नको. ती हातानेच चांगली मळली जाते.”“सगळ्या भाज्या पाहिजे तश्या चिरून आणि किसून होतात.”“त्यासाठी सुऱ्या आणि किसणी आहे की!”अशी तऱ्हेतऱ्हेची कारणं सांगून बायका ते जनरली उडवून लावतात. घरातली विजेची, पाण्याची, फोनची, मोबाइलची बिलं भरण्याचं काम अनेकदा घरातल्या बाईकडे असतं. घरातली इतर कामं, मुलांच्या शाळेच्या वेळा, स्वयंपाक असं सगळं सांभाळून त्यांना रांगेत जाऊन ती भरावी लागतात. पण तरीही अनेकजणी ती बिलं भीम ॲप, फोन पे, गुगल पे यावरून भरूया म्हणलं तर लवकर तयार होत नाहीत. म्हणजे, इतर कोणी ते भरणार असेल तर त्यांना चालतं, पण स्वतः ते वापरायला शिकायला त्या काहीश्या नाखूष असतात.तंत्रज्ञानाशी मैत्री करून ते वापरायला शिकणं आणि आपलं आयुष्य सुकर करून घेणं यात अवघड काहीच नाही. पण अनेकजणी ते टाळतात असं का?

(Image : Google)

नवीन तंत्रज्ञान वापरताना बायकांना नेमकी कशाची एवढी भीती वाटते?

तर आपल्याकडून चूक होण्याची ! त्यामुळे नुकसान होण्याची. त्यामुळे कोणीतरी हसण्याची. कोणीतरी पटकन काहीतरी बोलून अपमान करण्याची.कारण अगदी लहानपणापासून बहुतेक सगळ्या बायकांचे अनुभव असेच असतात. तंत्रज्ञान असणाऱ्या वस्तू मुलींना कमी हाताळायला मिळतात. त्यातही मुली जरा मोठ्या झाल्या की,त्यांच्या हातातलं तंत्रज्ञान हे जणू काही त्या स्वतःला बिघडवण्यासाठीच वापरणार आहेत अशीच सगळ्यांची धारणा असते. सातवी आठवीतल्या मुलाला जितक्या सहज स्मार्टफोन मिळतो तितक्या सहज मुलीला मिळत नाही. ती कोणाशी बोलते? काय बोलते? याकडे जास्त लक्ष ठेवलं जातं. मुलाला स्कूटर किंवा बाईक जितक्या सहज मिळते तितक्या सहज ती मुलीला मिळत नाही. आणि मग शिकण्याच्या वयात ज्या गोष्टी सहज हाताळायला मिळत नाहीत त्याबद्दलचा आत्मविश्वास मोठेपणी सहज येत नाही.“हल्ली असं कुठे काय राहिलंय?” असं वाटणारेही बरेच लोक असतील.पण अगदी प्रामाणिकपणे आपण आपल्या आजूबाजूला बघितलं तर लक्षात येईल की, बँकेत अकाऊंन्ट असलं तरी किती जणी त्या ते स्वतः ऑपरेट करतात? किती जणी ऑनलाइन ट्रॅन्झॅक्शन करतात? कितीजणी आपलं एटीएम कार्ड स्वतः वापरतात? किती जणींकडे स्वतःचा स्मार्टफोन बिनधास्त वापरतात? त्यातली फीचर्स शोधतात? नवीन ऍप्स डाऊनलोड करतात? आणि किती जणींना हे करण्याची भीती वाटते?

(Image : Google)

या प्रश्नांची उत्तरं काही फार सकारात्मक नाहीत.

आणि बायका हे करत नाहीत त्यामागे सामान्यतः एकच कारण असतं, “नको बाई. त्याने काही गडबड झाली तर? नकोच ते!”नवीन वस्तू, नवीन तंत्रज्ञान वापरताना चुका होऊ शकतात का? तर नक्की होऊ शकतात. त्याने काही नुकसान होऊ शकतं का? तर चुकीचं बटन दाबल्यामुळे असं काही फार मोठं नुकसान होण्याची शक्यता तशी फार कमी असते. पण समजा क्षणभर असं गृहीत धरलं की तशी शक्यता असते, तरी एक प्रश्न उरतोच. या चुका आणि त्यामुळे होणारं नुकसान फक्त बायकांमुळे होतं का? घरातले पुरुष नवीन तंत्रज्ञान वापरताना चुका करत नाहीत का? तर तेही चुकतात. फक्त ते चुकलं तरी रेटून बिनधास्त पुन्हा ती वस्तू वापरतात, त्या चुकांमधून शिकतात आणि ते तंत्रज्ञान वापरायला लागतात. आणि महिला फक्त तेवढंच करत नाहीत.कारण त्यावरून विशेषतः स्त्रियांना फार अपमानास्पद गोष्टी ऐकाव्या लागतात.“कमवायची अक्कल नाही आणि चालले ऑनलाइन पेमेंट करायला.”“चार पैसे कमवायला लागलीस तर काय स्वतःला फार शहाणी समजतेस का?”“तुम्ही स्वयंपाकाचं बघा. ते फोनबिनचं राहू द्या.”असं गमतीत म्हणतोय असा सूर लावून बोलणारेही अनेकजण असतात.असल्या वाक्यांना घाबरून बायका नवीन तंत्रज्ञान शिकायचं टाळतात. मग त्यांनी करायचं काय? तर असल्या कुचकटपणाकडे दुर्लक्ष करायचं. जी वस्तू वापरल्याने आपले श्रम वाचणार असतील, किंवा ज्यातून आपल्याला आनंद मिळणार असेल ते वापरायला शिकायचं आणि बिनधास्त वापरायचं. आपलं आयुष्य आपण सोपं करून घ्यायचं कारण ते इतर कोणीच करणार नसतं!एकच गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला सोयीचं म्हणून जे जे तंत्रज्ञान असेल ते वापरून पहायचं, शिकून घ्यायचं.ते वापरायला घाबरायचं नाही. चुकलं तर चुकलं. पण शिकायचं.अगदी घरातल्या स्वयंपाक घरातील आधुनिक साधनांपासून ते हातातल्या स्मार्ट फोनवरुन बँकेचे व्यवहार करण्यापर्यंत.तंत्रज्ञान आपलं जगणं सोपं करतं, त्याकडे पाठ फिरवायची नाही. शिकायचं नव्या उत्साहात, कुणी काहीही म्हणो वापरायचं.

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)patwardhan.gauri@gmail.com

टॅग्स :तंत्रज्ञान