Join us  

मिताली राज, एवढी वर्षे कशी खेळतेय? काय तिच्या लाँग करिअरचं सिक्रेट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 2:36 PM

मिताली राज ( Mithali Raj )तिनं पदार्पण केलं त्याकाळी जन्मलीही नव्हती, अशा आता तरुण झालेल्या खेळाडूंसोबत ती खेळते आहे. काय तिच्या सातत्याचं रहस्य!

ठळक मुद्देमिताली राज गेल्या २० वर्षांपासून प्रेशर, चॅलेंज सगळं सांभाळून क्रिकेट खेळते आहे.

अभिजित पानसे

सचिन तेंडुलकरबाबत एक प्रश्न नेहमी विचारला जायचा, त्याची प्रेरणा काय? व्हॉटस् किप हिम गोईंग?क्रिकेटमध्ये असं काही नाही, जे त्याच्या वाट्याला आलं नाही, पण तरी त्याची धावांची भूक अफाट होती.तेच सारं मिताली राजच्या संदर्भातही म्हणता येईल. २००२ जानेवारीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी ही मुलगी सातत्याने खेळतच आहे. तिच्यातील ऊर्जा, इन्स्पिरेशन, खेळाची भूक, स्वतःतील बेस्ट देण्याची धडपड आजही वाढतेच आहे. ती गेली जवळपास २० वर्षे भारतीय संघातून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळते आहे. सर्वाधिक धावा करणारी आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू आहे. तिला आता साध्य करायला, कोणाला सिद्ध करून दाखवायला खूप काही शिल्लक राहिलं नाही; पण आजही ती सातत्याने खेळतच आहे. नक्की काय असावं, यामागे कारण?

(Image: google)

खेळ असो वा इतर कोणतं रेग्युलर काम, व्यवसाय किंवा कोणती नोकरीसुद्धा, ‘टू गेट गोईंग’ काही तरी इन्स्पिरेशन लागतंच. ते नसेल तर खांदे गळतात, ऊर्जा संपते. काही वेगळं करायची इच्छा संपते. मग काय कारण, रहस्य असावं यामागे. रहस्य हेच की जे लोक सेल्फ मोटिवेटेड असतात ते या शर्यतीत टिकतात.सेल्फ मोटिव्हेशन, ही यशाची आणि आनंदाची, ऊर्जेची चावी आहे. एखाद्या संघर्ष करणाऱ्या खेळाडूसाठी, कलाकारासाठी किंवा सर्वसामान्य माणसासाठी लढणं, जिंकणं ही प्रेरणा असते. कारण ती त्याची गरज असते. जसं आपलं पहिल्या जॉबमध्ये काही करून दाखविण्याचे, स्वतःला सेटल करण्याचे ध्येय असते; पण पूर्णपणे यशस्वी झालेल्या व्यक्तीसाठी, स्वतःचे ध्येय प्राप्त केल्यानंतर मात्र त्याचं यश त्याच्यासाठी आत्मसंतुष्टीचं कारण बनतं आणि त्याची वाढ रोखतं. कारण सगळं प्राप्त केलेलं असतं. भलेभले यशस्वी लोक यामुळे इथेच थांबतात. कारण त्यांच्यासाठी बाह्य मोटिव्हेशन, बाह्यप्रेरणा संपलेली असते. इथेच स्वयंप्रेरित लोक वेगळे ठरतात. कारण ते दररोज सकाळी उठून स्वतःच स्वतःला प्रेरित करतात.मिताली राज हे त्याचंच उत्तम उदाहरण आहे. ती २० वर्षांपासून सातत्याने क्रिकेट खेळतेय. दररोज जीममध्ये जाऊन वर्कआऊट, ट्रेनिंग करणं. नेटमध्ये प्रॅक्टिस करणं. हे सगळं दररोज करणं सोपं नाही. आपण विचारून पाहू हाच प्रश्न स्वत:ला की, आपल्याला रुटीनचा किती कंटाळा येतो. दररोज तेच शिक्षण किंवा तीच नोकरी, व्यवसाय, त्याच त्या गोष्टी, दररोज तेच ते काम, तीच लोकल ट्रेन, बस पकडणं, तेच ऑफिस, तोच गार डबा त्याच त्या गोष्टी करताना व्यक्ती मनाने स्टॅगनंट होत जाते. इच्छाशक्ती मंद होत जाते. अशावेळी गरज असते ती स्वयंप्रेरित होण्याची. दररोज स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी दररोज स्वतःला छोटे-छोटे चॅलेंज देत स्वतःला पुश करण्याची. यामुळेच व्यक्ती गेट गोईंग राहतो. तो निराश, डिप्रेस होत नाही.

(Image: google)

वीस वर्षांत मिताली राजने क्रिकेटमधील सर्व घडामोडी बघितल्या, मोठमोठे बदल बघितले. जुने टीममेटस् बदललेत, नवे आले. वयानुसार, सिनिॲरिटीनुसार तिला तिची मानसिकता, रोल बदलावे लागलेत; पण ती तरीही खेळत आहे. क्रिकेटमध्ये म्हणतात ‘इट्स टू हॉट इन टू द किचन’ म्हणजे तुम्ही ताण हाताळू शकत नसाल तर लवकरच स्वत:हून बाहेर पडता; पण मिताली राज गेल्या २० वर्षांपासून प्रेशर, चॅलेंज सगळं सांभाळून क्रिकेट खेळते आहे....कारण ती स्वयंप्रेरित आहे. 

टॅग्स :मिताली राज