Join us  

मेरे कमरे में आसमान भी है! -भेटा साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कोल्हापूरच्या सोनाली नवांगुळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 5:17 PM

अपंगत्व, अभाव या कशाचीही तक्रार न करता, अखंड उमेदीनं जगणाऱ्या सोनाली नवांगुळची प्रेरणादायी गोष्ट.. 

ठळक मुद्देसोनाली आपले आकाश तयार केले आहे ज्यात तिचा मुक्तछंद विहार सुरू आहे. तो असाच सुरू राहो.सर्व छायाचित्र : आदित्य वेल्हाळ

इंदुमती गणेश

मंगळवार सायंकाळी साडेसातची वेळ. कोल्हापुरातील नाळे कॉलनीतील आनंदवन विहारमधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट.. दार उघडताच उत्साही स्माईल देत सोनाली नवांगुळने स्वागत केले.. घरात येताच उदबत्तीचा सुगंध, फुलांचे गुच्छ.. त्यांच्या सुंदर सजावटींनी भरलेला हॉल.. दिव्याचा मंद प्रकाश बघताच प्रसन्न आणि सकारात्मक उर्जा जाण‌वली. म्हणाली, ये बस.. काय सांगू तुला, शुभेच्छा, आनंद, पुढील जबाबदारीची जाणीव, आणि सह्दयांनी भरभरून दिलेली दाद स्वीकारताना दमछाक होतेय ग.. इतका आनंद मिळतोय ना की ते स्वीकारण्याची शक्ती मला हवी आहे. सध्या इतक्या संमिश्र भावना आहेत ना की मला स्वत:ला पुरस्काराबद्दल नेमकं काय वाटतंय हे कदाचित आठ दिवसांनी कळेल... सोनालीने तमिळ लेखिका सलमा यांनी लिहिलेल्या कादंबरीचा मध्यरात्रीनंतरचे तास या अनुवादीत कादंबरीला साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे...यानिमित्त  तिची मुलाखत घ्यायला घरी गेले...त्यावेळचा हा संवाद..त्यानंतर पुढचे दीड तास तिच्या आयुष्याबद्दलच्या संकल्पना-त्याकडे बघण्याचा आरसा, लेखन प्रवास आणि समाज व्यवस्थेविरोधात बंडखाेर मतं या भारावलेपणात कशी गेली कळली नाही..

(छायाचित्र : आदित्य वेल्हाळ)

आयी चिडिया तो मैने यह जाना कि मेरे कमरे में आसमान भी है.... - हे वाक्य तिच्या घरात भींतीवर लिहिलेलं दिसतं. आपण सगळे स्वत:च्या विश्वात इतके गुरफटलेले असतो ना की आपल्या भोवती काय चाललंय हे समजून घ्यायची इच्छाच नसते. पण मनाची खिडकी मोठी केली की सगळं काही त्यात सामावून जातं. वयाच्या नवव्यावर्षी बैलगाडीच्या अपघाताने आयुष्यभरासाठी अपंगत्व दिले, त्या घटनेने आलेले नैराश्य, सहानुभूतीच्या नजरा, बदललेले आयुष्य, मानसिक आणि शारिरीक संघर्ष.. हे सगळं सकारात्मकतेने स्वीकारुन तिने आपला अवकाश शोधलाय.. त्याला आपल्या लेखनशैलीने इतक्या खोलवर त्याच्याशी नाळ जोडलीय की स्काय इज द लिमीट म्हणजे काय असतं हे इथं कळतं. व्हीलचेअरवर माझे शरीर बंदिस्त झाले असेल पण मन नाही...सहानुभूतीच्या नजरेत अडकायचं नाही, आपल्याकडील अभावांचे भांडवलीकरण करणं नाकारत सोनालीने २१ वर्षांपूर्वी शिराळा सोडलं. मागे वळून बघताना तिचे लेखन कौशल्य, तिने साधलेला संवाद, लाघवी व्यक्तिमत्व, तिची पुस्तकं, संवेदनशीलतेने व्यक्त केलेली मतं, मैत्री आपुलकी हे लोकांच्या नजरेत भरतं, व्हीलचेअर नाही.प्रत्येकाला कम्फर्ट झोनमध्ये राहायला आवडतं, ज्यावेळी आपण कुणावर तरी अवलंबून राहतोय असं वाटेल तेंव्हा जागे व्हायला हवे. बिनभरवश्याच्या आणि रोज नवी आव्हाने देणाऱ्या जगात प्रत्येक गोष्टी शिकण्याची तयारी हवी. लेखक-अनुवादक म्हणवून घेताना त्यासाठीची बैठक हवी. पण सोनालीला पारंपारिक पद्धतीने शिक्षण घेता आले नाही, तिने इंग्रजीत पदवी घेतली. पण तिच्या शिकण्याआड शाळा कधीच आली नाही. 

सर्व छायाचित्र : आदित्य वेल्हाळ

लेखन प्रवासाबद्दल ती म्हणले, मला लेखकच व्हायचंय असं ध्येय नव्हतं . पण व्यक्त व्हायचं जवळचं साधन म्हणून लिहायला सुरूवात केले. हेल्पर्स संस्थेत काम करताना देणगीदारांना वर्णनांची भारलेली आभाराची पत्र लिहताना, लेख लिहिताना, अपंगांचे प्रश्न सोडवण्यासाठी संवाद साधताना व्यक्त होवू लागले... कम्फर्ट झोन तोडून मला सगळं करून बघायचं होतं... म्हणून संस्थेतून बाहेर पडले. सुत्रसंचालन करू लागले, अनेक कार्यक्रमांमध्ये लोकांशी संवाद साधता यायला लागला. स्पर्शज्ञान पाक्षिकाची उपसंपादक म्हणून काम सुरू झाले. माझे अनुभव, माझी मतं वृत्तपत्रातील सदरांमधून मांडताना स्वत:च्या सुख:दुखापलीकडे जावून एखाद्या गोष्टीचा विचार करायला लागले. विषयांचे बंधन कधीच ठेवले नाही. अखेर २०१२मध्ये ड्रीम रनर हे माझे आणि अनुवादित अशा दोन्ही अँंगलने पहिले वहिले पुस्तक प्रकाशीत झाले. नंतर मेधा पाटकर यांच्यावरील पुस्तक, बालमनाला भावणारी जॉयस्टिक आणि स्वच्छंद अशी पुस्तके लिहीले. पण मला वाटतं अनुवादातून आपल्याला भाषेतले सगळे शब्द वापरता येतात. त्यासाठी प्रचंड शाेध घ्यावा लागतो. शब्दांचे अर्थ कळतात, भाषा चांगली होण्यासाठी हा उत्तम मार्ग आहे. मध्यरात्रीनंतरचे तास हे तमिळनाडूमधील विशिष्ट जमातीतील महिलांचे धर्म, रुढी-पंरपरांच्या उंबऱ्याआड दडून राहिलेल्या स्त्रीयांचे जग आहे. त्यात कायद्याच्या गोष्टी, गुंतागुतीचे संबंध, लैंगिकतेचा दबाब, विवाहबाह्य संबंध, महिलांवरील बंधनं अशा अनेक बाबी असतानाही त्यांनी आपल्या पायापुरता प्रकाश शोधण्याचा केलेला प्रयत्न आहे, ज्यात यश आणि अपयशही आहे. पुरस्कार मिळाला म्हणजे मी फार काही मोठं केलंय की शिस्तीची आहे असं काही नाही बरं का, आपल्यासमोर इतकी आमिषं आहेत की त्यावर कंट्रोल ठेवणं हेच मोठं आव्हान असतं. अशा गाळात रुतलेली माझी होडी बाहेर निघण्यासाठी पुरस्कार महत्वाचा आहे. तुम्ही जे काम कराल त्याकडे लक्ष द्या, साधना करा. इतक्या वर्षात मला लोकांशी बोलता आलं.. मग तो मंत्री असो किंवा गल्लीतला चहावाला.. अपंग व्यक्ती आपल्याच सुखदुखाच्या रिंगणात कोंडून राहतात. त्यांच्या यशअपयशाबद्ल जाणीवजागृती व्हावी, त्यांना स्वाभिमानाने जगता यावं, देशाताल प्रगतीला पुरक नागरिक म्हणून सन्मान मिळावा यासाठी काही करायची इच्छा आहे. मला जग फिरायचंय.. छान स्वयंपाक बनवायला शिकायचंय..माझ्या हातून सुंदर दर्जेदार काम व्हावं अशी इच्छा आहे. स्वत:चे अभिनिवेश मागे ठेवले की सगळ्या गोष्टी आपोआप सुटत जातात, फक्त तुमची इच्छा हवी. सोनाली  आपले आकाश तयार केले आहे ज्यात तिचा मुक्तछंद विहार सुरू आहे. तो असाच सुरू राहो.फ्रेंडली होम, सुंदर दुनिया!

सोनालीनं घर तिला सोयीस्कररित्या सगळ्या बाबी करता येतील अशा पद्धतीने सजवून घेतलंय. तिच्या फेसबुक पोस्टनंतर हे घर पाहण्याची तीव्र इच्छा यानिमित्ताने पूर्ण झाली. ती स्वयंपाकापासून ते भांडी विसळण्यापर्यंत...घरातील वीजेचे बटन बंद चालू करू शकेल इतक्या खालीपर्यंत, घरभर व्हीलचेअर फिरेल अशा रितीने बनवून घेतले आहे. वाचन, लेखन, टिव्ही, लॅपटॉप, बेड अगदी स्वच्छतागृहाचा वापरदेखील स्वत: करू शकेल असे हे फ्रेंडली होम...