Join us  

105 वर्षाच्या पप्पामल आजीला पद्मश्री पुरस्कार; भेटा सेंद्रिय शेती करणाऱ्या भन्नाट आजीला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2021 7:12 PM

पप्पामल म्हणतात, ‘श्रम हीच आपली ताकद. दुपारी झोप, आराम हे काही आपल्याला आवडत नाही. आजही शेतीत राबल्याशिवाय काही चैन पडत नाही.’ सध्या पप्पामल आजी एकदम सेलिब्रिटी झाल्या आहेत, मुलाखत घेणाऱ्यांची रीघ लागली आहे, मात्र आजी अजूनही शेतात.. त्यांच्या मळ्याचा लळा, हीच त्यांची ताकद आहे.

ठळक मुद्दे६० वर्षांपासून पप्पामल यशस्वीरीत्या सेंद्रिय पद्धतीनं शेती कसत आहेत.सेंद्रिय शेतीत वेळ आणि श्रम दोन्हींची गुंतवणूक करण्याचा आग्रह त्या आजच्या तरुणांकडे धरतात.शेती क्षेत्रातल्या त्यांच्या अनुभवाचा फायदा इतर शेतकऱ्यांना व्हावा यासाठी विविध विद्यापीठं त्यांना वेगवेगळ्या शेतीविषयक कार्यक्रमांना बोलावतात आणि त्याही उत्साहानं जातात, भरभरुन माहिती सांगतात. 

-माधुरी पेठकर

एम पप्पाम्मल अलियास रंगम्मल यांना पप्पामल या नावानंच ओळखलं जातं. तमिळनाडूतील भवानी नदीच्या काठावर असलेल्या थेक्कमपट्टी गावात त्यांची अडीच एकरांची शेती आहे. या शेतीत त्या तृणधान्यं, डाळी, भाजीपाला, फळं सेंद्रिय पद्धतीने पिकवतात. तमिळनाडूमधे सेंद्रिय शेतीसाठी पप्पामल यांना आदर्श मानलं जातं. वयाच्या १०५ व्या वर्षीही शेतीत काम करण्याची, शेतीशी निगडित विविध कार्यक्रमांमध्ये उत्साहानं सहभाग घेण्याची आवड दांडगी आहे.१९१४ मध्ये तमिळनाडूतील देवलापुरम येथे त्यांचा जन्म झाला. पप्पाम्मल लहान होत्या, तेव्हाच आई-वडिलांचं निधन झालं. पुढे पप्पामल आणि त्यांच्या बहिणीचा सांभाळ त्यांच्या आजीनं (वडिलांच्या आईनं) केला. वडिलांचं किराणा मालाचं दुकान होतं. पुढे आजीचं निधन झाल्यावर पप्पामल यांनीच ते दुकान चालवलं. त्या काळात शाळा नव्हत्या. खेळातूनच त्या व्यवहारज्ञान शिकल्या.

Image: Google

दुकानात बसून त्या दुकानदारी करत असल्या तरी शेतात काम करायला, धान्य पिकवायला त्यांना आवडायचं. आपलीही शेती असायला हवी असं त्यांना लहानपणापसूनच वाटायचं. पुढे दुकानातच त्यांनी एक हॉटेलही सुरू केलं. पैसे जमू लागले. त्यावर व्यवस्थित घर चालू लागलं. शेतीसाठी पप्पाम्मल यांना जमीन घ्यायची होती. त्यांनी थोडे थोडे पैसे बाजूला टाकायला सुरुवात केली. चांगले पैसे जमले तेव्हा त्यांनी दहा एकर जमीन विकत घेतली. आणि ती जमीन कसायला सुरुवात केली.

रासायनिक शेतीच्या मागे न धावता त्यांनी आपल्या कुटुंबापुरती सेंद्रिय पद्धतीने मका, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, फळं, भाजीपाला पिकवायला सुरुवात केली. शेती करत असतानाच तमिळनाडू कृषी विद्यापीठात त्यांनी शेतीचं अधिकृत शिक्षणही घेतलं. शिक्षण आणि प्रयोगाच्या बळावर त्यांची सेंद्रिय शेती फुलू लागली. पुढे अडीच एकर शेती स्वत:कडे ठेवून बाकी सगळी शेती बहिणीच्या मुलीला दिली. ६० वर्षांपासून पप्पामल यशस्वीरीत्या सेंद्रिय पद्धतीनं शेती कसत आहेत.

Image: Google

शेती क्षेत्रातल्या त्यांच्या अनुभवाचा फायदा इतर शेतकऱ्यांना व्हावा यासाठी विविध विद्यापीठं त्यांना वेगवेगळ्या शेतीविषयक कार्यक्रमांना बोलावितात. सेंद्रिय शेतीत वेळ आणि श्रम दोन्हींची गुंतवणूक करण्याचा आग्रह धरतात. आजकाल तरुण मुलांना फार घाई झालेली आहे, तसं करून नाही चालणार असं म्हणत स्वत:चं उदाहरण देतात. पप्पामल यांच्याकडून प्रेरणा घेऊन तमिळनाडूतील अनेक तरुण सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत.

Image: Google

नुस्ती शेती नाही, तर पप्पामल राजकारणातही मुशाफिरी करून आल्या आहेत. त्या ग्रामपंचायतीची निवडणूक लढवून पंचायत सदस्यही झाल्या होत्या; पण मातीत राबणंच आपल्याला आवडतं असं म्हणत पुन्हा त्या वाटेनं गेल्या नाहीत.पप्पामल म्हणतात, ‘श्रम हीच आपली ताकद. दुपारी झोप, आराम हे काही आपल्याला आवडत नाही. आजही शेतीत राबल्याशिवाय काही चैन पडत नाही.’

सध्या पप्पामल आजी एकदम सेलिब्रिटी झाल्या आहेत, मुलाखत घेणाऱ्यांची रीघ लागली आहे, मात्र आजी अजूनही शेतात.. त्यांच्या मळ्याचा लळा, हीच त्यांची ताकद आहे.