Join us  

हात ठणकत असताना ती जागतिक कुस्ती स्पर्धेत फायनल मॅच खेळली, सिल्व्हर मेडल जिंकली; कोण ही अंशु मलिक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2021 3:19 PM

नॉर्वे येथील जागतिक कुस्ती स्पर्धा खेळणं अंशु मलिकसाठी एक आव्हान होतं. या स्पर्धेत प्रत्येक फेरी, फेरीतला प्रत्येक डाव ती अंतिम संधी म्हणून खेळली आणि रजत पदकाची मानकरी ठरली. वेदनांची दुखरी सोबत असतानांही तिनं कमावलेल्या यशाची चंदेरी गोष्ट.

ठळक मुद्देहरियाणाच्या जिंद जिल्ह्यातील निदानी गावातील अंशु मलिक ही फ्री स्टाइल कुस्तीगीर आहे. जागतिक कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचून रजत पदक मिळवणारी अंशु मलिक ही पहिली भारतीय महिला झाली.अंशु मलिकने जागतिक कुस्ती स्पर्धेत 57 किलो वजनी गटात रजत पदक मिळवलं आहे.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचं स्वत:चं आणि वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यात अपयशी ठरलेल्या वीस वर्षीय अंशु मलिकनं स्वत:ला आणि आपल्या देशाला ते अपयश विसरण्यास भाग पाडलं आहे. नॉर्वेतील ओस्ले येथे सुरु असलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत तिनं अंतिम फेरीत धडक मारत रजत पदक आपल्या नावावर केलं. जागतिक कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीत भारतीय महिला कुस्तीगीरानं धडक मारुन रजत पदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. तिने या स्पर्धेतील 57 किलो वजनी गटात रजत पदक मिळवलं आहे. पण ही स्पर्धा खेळणं अंशुसाठी दोन कारणांमुळे आव्हानात्मक होतं. एक म्हणजे टोक्यो ऑलिम्पिकमधील अपयश आणि दुसरं म्हणजे हाताच्या कोपराला झालेली दुखापत. स्पर्धेत खेळताना कोपरातील वेदना अंशुला छळत होत्या पण तिनं टोक्योचं अपयश पुसून टाकण्याचा चंग बांधला होता.

 Image: Google

हरियाणाच्या जिंद जिल्ह्यातील निदानी गावातील अंशु मलिक ही फ्री स्टाइल कुस्तीगीर आहे. एका कुस्तीगीराच्या घरातच तिचा जन्म झाला होता त्यामुळे तिला कुस्तीची ओळख अगदी लहापणापासूनच. आपण मुलगी आहोत कुस्ती कशी खेळणार हा प्रश्न ना तिला पडला ना तिच्या घरातल्यांना . वयाच्या अकराव्या वर्षापासून तिनं कुस्ती खेळायला सुरुवात केली. तिचे वडील, काका आणि भाऊ तिघेही यशस्वी कुस्तीगीर. तिने आपला भाऊ शुभम मलिक याच्यासोबत कुस्तीचा सराव करायला सुरुवात केली. वडील धर्मवीर मलिक यांनी अंशुला कुस्तीचं व्यावसायिक प्रशिक्षण दिलं. तिच्या कुस्तीतल्या डावपेचातली चमक बघून आपल्या पोरीनं ऑलिम्पिक स्पर्धेत खेळावं असं धर्मवीर यांना वाटायचं. कुस्तीचं प्रशिक्षण सुरु केल्यानंतर अवघ्या चार वर्षातच अंशुनं आंतरराष्ट्रीय स्पर्धात भाग घ्यायला सुरुवात केली. 2016 मधे आशियाई कॅडेट चॅम्पियनशीपमधे रजत पदक जिंकून तिनं तिच्य नावाची दखल घ्यायला भाग पाडलं. त्यानंतर विविद स्पर्धांमधे भाग घेऊन अनेक पदक जिंकणार्‍या अंशुबद्दल देशानं ऑलिम्पिक स्पर्धेतल्या पदकाची अपेक्षा धरली. पाठीचं दुखणं असतानाही अंशू टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली. तिथे तिची सुरुवातही चांगली झाली पण ती पुढे जाऊ शकली नाही. हे अपयश अंशुच्या मनात सलत होतं. ती संधी तिला नॉर्वे येथील जागतिक कुस्ती स्पर्धेनं दिली.

 Image: Google

पण या स्पर्धेच्या आधी तिच्या हाताच्या कोपराला दुखापत झाली. स्पर्धा गाठणं अवघड वाटत असतानाच तिनं कसून सराव करायला सुरुवात केली. सरावादरम्यान होणार्‍या वेदना तिला असह्य होत होत्या पण समोर ऑलिम्पिकमधलं अपयश पुसण्याची संधी तिला दिसत होती. प्रत्यक्ष या स्पर्धेत खेळतांनाही तिच्या कोपरात प्रचंड वेदना होत होत्या. पण तिनं स्वत:वरची पकड सोडली नाही. स्वत:ला ढीलं पडू दिलं नाही. प्रत्येक फेरी, फेरीतील प्रत्येक डाव ही अंतिम संधी समजत ती खेळली. आता नाही तर कधीच नाही असं स्वत:ला सांगत या स्पर्धेत ती हिंमतीनं लढली आणि जागतिक कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचून रजत पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला बनून अंशु मलिक सगळ्यांच्या कौतुकाचा विषय झाली.

 Image: Google

अंशुच्या लेखी या खेळात सतत शिकण्याला, आपल्या प्रतिस्पध्र्याकडून शिकण्याला खूप महत्त्व आहे. चार वेळा ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेती जपानची काओरी इको ही अंशुची आदर्श आहे. तिचा खेळ पाहून अंशु खूप काही शिकली. सतत यूट्यूबवर इकोच्या खेळाचे व्हिडीओ शोधून पाहाण्याचा तिला छंद आहे. इको किंवा जपानच्या इतर खेळाडू खेळताना स्वत:ला कधीच ढीलं पडू देत नाही . मजबूतीनं ते आपल्यापेक्षा जरा कमी असतील पण खेळताना स्वत:ला टिकवून ठेवण्याचं तंत्र त्यांच्याकडे आहे. अंशुू हे तंत्र शिकण्याचा प्रयत्न करते आहे. अनेक स्पर्धांमधे ती जपानच्या खेळाडूसोबत खेळली आहे. या प्रत्येक वेळेस आपण खेळताना त्या कशा खेळतात हेही पाहात असल्याचं अंशु सांगते. तुम्हाला हे कसं जमलं? असा प्रश्न जपानी स्पर्धकाला विचारुन जपानी तंत्राबद्दलचं कुतुहल शमवण्याचा प्रयत्न करते. स्मोरची जपानी स्पर्धक तिच्याशी हरली तरी या स्पर्धकांमधल्या जपानी तंत्राबद्दलची उत्सुकता अंशुमधे आजही कायम आहे. अंशुमधील जिद्द बघता अंशु हे जपानी महिलांमधील तंत्र नक्कीच आत्मसात करेल.