उन्हाळ्याची सुट्टी लागली की आपण कुठे ना कुठे फिरायला जायचे प्लॅन करतो. मागच्या २ वर्षात कोरोनामुळे आपल्याला कुठेच बाहेर पडता न आल्याने यावर्षी तर फिरायला जाणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. रोजच्या रुटीनमधून आपल्याला ब्रेक तर हवाच असतो. अशावेळी फॅमिली किंवा मित्रमंडळींसोबत ४ किंवा ८ दिवस मस्त निसर्गाच्या सानिध्यात जाऊन आलो की आपणही फ्रेश होतो आणि नव्या जोमाने कामाला लागू शकतो. मुलांना शाळेच्या सुट्ट्या असतात तसेच आपल्यालाही चेंज हवा असल्याने आपण फिरायला जातो खरे, पण फिरायला जाताना काही गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायला हवी. म्हणजे आपल्याला ट्रिप जास्त छान एन्जॉय करता येऊ शकते. आता ट्रिपला जाताना नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या याविषयी समजून घेऊया...
१. सध्या कडक उन्हाळा असल्याने कुठेही फिरायला गेलात तरी ऊन लागू नये यासाठी स्कार्फ, टोपी, गॉगल यांसारख्या गोष्टी आवर्जून सोबत ठेवाच. नाहीतर फिरायच्या नादात आपण डोक्यावर काही न घेता फिरलो तर ऊन बाधते. त्यावेळी आपण एक्साइटमेंटमध्ये असल्याने आपल्या लक्षात येत नाही, पण नंतर उन्हामुळे डोके दुखणे, मळमळ, उलट्या असे त्रास होऊ शकतात. त्यात प्रवास असल्याने हा त्रास वाढण्याची शक्यता असते.
२. बाहेर फिरायला गेलो की आपण आईस्क्रीम, कोंल्ड्रींक सर्रास घेतो. पण त्यामुळे घशाला त्रास होण्याची शक्यता असते. उन्हापासून बचाव व्हावा यासाठी आपण हे घेत असलो तरी बाहेर कडक ऊन आणि त्यात जास्त गार पदार्थ यांमुळे तब्येत बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी पिणे किंवा गोळी, आवळीसुपारी चघळणे अशा गोष्टींचा ट्रिपमध्ये फायदा होतो.
३. रोज आपण घरचे खाऊन कंटाळलेले असतो. अशावेळी आपण ट्रिपमध्ये बाहेरचे खातो. मात्र हे पदार्थ खूप मसालेदार असतील तर त्यामुळे जळजळ अॅसिडीटी होण्याची शक्यता असते. तसेच तेलकट पदार्थही जास्त खाल्ले जातात. त्यामुळेही घशाला त्रास होऊ शकतो. त्यापेक्षा ट्रीपमध्ये असलो तरी आपण फळांचा आहारात आवर्जून समावेश करु शकतो. काकडी, केळी या गोष्टी सहज उपलब्ध होतात त्या जरुर खायला हव्यात.
४. उन्हाळ्यात बाहेर फिरायला जाताना उन्हाचा तडाखा जास्त असल्याने त्वचेची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. यासाठी चेहरा झाकलेला राहील असे पाहावे. हात, पाय किंवा शरीराचा कोणताही भाग जास्त उघडा राहणार नाही याची काळजी घ्यावी नाहीतर उन्हाने त्वचा टॅन होण्याची शक्यता असते. यासाठी अंगभर अतिशय पातळ असे सुती कपडे घालावेत.
५. उन्हाळ्यात घामाने त्रास होत असतो. अशावेळी शक्य तितक्या वेळा चेहरा साध्या पाण्याने धुणे. घाम येत असलेली जागा कोरडी करणे ठिकाणी पावडर टाकणे, ठराविक वेळाने कपडे, सॉक्स, स्कार्फ बदलणे आवश्यक असते. तसेच आपले स्कीन केअर रुटीन शक्य तितके फॉलो करायला हवे. अत्तर, पर्फ्यूम, ओले टिश्यू पेपर अशा गोष्टी जरुर सोबत ठेवाव्यात. ज्यामुळे आपली त्वचा चांगली राहण्यास मदत होईल.