Join us   

नोकरी करायचीय आणि बाळाला अंगावरचं दूधही पाजायचंय? जमेल -ही घ्या १ युक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2023 6:20 PM

नोकरी करणाऱ्या आईने आपली स्वत:ची पर्सनल मिल्क बँक करुन ठेवली तर बाळाला आईचं दूध मिळेल. Breastfeeding and Work: Let's Make It Work

ठळक मुद्दे तिला स्तनपानासाठी केलेली मदत घरी आणि ऑफिसमध्ये तिच्या कामाच्या उंचावलेल्या दर्जातून दिसून येते

डॉ. ज्योत्स्ना पडळकर (एम. डी. बालरोगतज्ज्ञ, पुणे. jyotsnapadalkar@gmail.com) नोकरी करणाऱ्या आईला प्रश्न पडतो की बाळाला सहा महिने दूध कसं पाजायचं? आपण ऑफिसला जायला लागलो की काय, म्हणून मग काहीजणी वरचे सुरु करतात. खरंतर नोकरीवर अनेक तास काढणाऱ्या पण बाळाला अंगावरचं दूध पाजू इच्छिणाऱ्या आईला कामाच्या ठिकाणी तिची तिची ‘पर्सनल ब्रेस्ट मिल्क बँक’ कशी करता येईल ते पाहूया.  यासाठी कामाच्या ठिकाणी एक लहानशी आडोसा देणारी हवेशीर केबिन, हात धुवायला पाणी- बेसिन आणि एक छोटा फ्रिज एवढ्या साधनांवर ती आपली पर्सनल ब्रेस्ट मिल्क बँक करू शकते. कामावर येतांना तिनं बाळाला पाजावं,नेमकं बाळानं तेंव्हा प्यायलं नाही तर घरीच दूध पिळून काढून ठेवून निघावं. हे दूध नंतर कोणीही बाळाला पाजू शकेल.

काय करता येईल? १. कामावर अडीच तीनेक तासांनी जरुरीप्रमाणे,एक छोटा ब्रेक घ्यावा. २. या खोलीत जाऊन,हात स्वच्छ धुवून, दूध पिळून काढावं. हे दूध झिप लॉक च्या पिशव्यांमध्ये साठवावं. पिळलेलं दूध इथं डीप फ्रिज मध्ये ठेवावं. असं दर अडीच तीन तासांनी करत आपलं दूध आपणच साठवत राहावं. या पिशव्या घरी गेल्यावर डीप फ्रिजमध्ये ठेवाव्यात. ३. दुसऱ्या दिवशी आपल्या गैरहजेरीत हे दूध वापरण्यासाठी आता फ्रिजच्या खालच्या कप्प्यात काढून ठेवाव्यात, वितळलेलं दूध कोमट करून बाळाला पाजावं. लागेल तेवढंच दूध बाहेर काढावं. कारण,उष्टं झालेलं दूध परत वापरायचं नाही. ४. हातांनी पिळून दूध काढणं,ते साठवणं हे काम प्रॅक्टिसनं भरभर जमतं,ऑफिसच्या कामाचा फारसा वेळ वाया जात नाही. ब्रेस्ट मोकळ्या झाल्यानं आईला खूप रिलीफ येतो, मोकळं वाटतं आणि ती आणखी उत्साहानं कामावर लक्ष देऊ शकते. तिला केलेलं सहकार्य वाया जात नाही. ५. तिला स्तनपानासाठी केलेली मदत घरी आणि ऑफिसमध्ये तिच्या कामाच्या उंचावलेल्या दर्जातून दिसून येते. कंपन्यांनो आणि आयांनो हा प्रयोग जरूर करून बघा,नक्कीच जमेल!

टॅग्स : जागतिक स्तनपानजागतिक स्तनपान सप्ताह