Join us   

गरोदरपणात महिलांची झोप कुठे हरवते? नीट झोप न लागण्याची कारणं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 4:54 PM

गरोदरपणात झोप नीट न लागण्याची अनेक कारणं आहेत. एकतर पोटात वाढत असलेल्या गर्भाचा शरीरावर होणारा परिणाम, मनातली भिती याचा परिणाम झोप पुरेशी न होण्यावर होतो. गरोदरपणात आहार विहार यासोबतच झोप नीट लागणंही देखील महत्त्वाची बाब आहे. पण ती लागत नाही, इतकंच काय गरोदरपणातल्या तिसऱ्या  तिमाहीत कोणाकोणाला तर एक मिनिटही शांत झोप लागत नाही हे सत्य आहे.

ठळक मुद्दे मूत्राशयावर दाब पडून रात्री सतत लघवीला जावं लागणं.गरोदरपणाच्या काळात महिला अनेक गोष्टींची विनाकारण चिंता करतात.रात्री झोपण्याआधी मेंदू शांत करणारे काही व्यायाम प्रकार करावेत. किंवा ध्यानधारणा करावी. यामुळे शांत झोप लागण्यास मदत होते.

आपण गरोदर आहोत या बातमीनं महिलांना जितकं स्वप्नवत आणि हवेत उडल्यासारखं होतं तशी अवस्था पुढे टिकत नाही हेच खरं. सुरुवातीला मनात फुलपाखरं उडत असली तरी जसजसं गरोदरपण एक एक टप्पा पुढे जातं तशा समस्याही वाढत जातात. गरोदरपण ही थकवणारी अवस्था असते. आणि महत्त्वाचं म्हणजे गरोदरपणात बहुतांश महिलांना नीट झोपच लागत नाही. अमेरिकेतील हॅपी बेडस या संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणात हीच बाब आढळून आली. त्यांनी २००० गरोदर महिलांचं याबाबत सर्वेक्षण केलं होतं. त्यात त्यांना आढळून आलं की दहा पैकी नऊ महिलांना झोपेशी निगडित समस्या असतात. या गरोदर महिलांची झोप नीट होत नसल्याचं, मधे मधे जाग येत असल्याचं आणि झोप नीट न झाल्यामुळे खूप थकल्याची भावना महिलांमधे निर्माण झाल्याचं सर्वेक्षणात आढळून आलं. बहुतांश गरोदार महिला गरोदपणात पाच तासांचीही पुरेशी झोप घेऊ शकत नाहीत. गरोदरपणात झोप नीट न लागण्याची अनेक कारणं आहेत. एकतर पोटात वाढत असलेल्या गर्भाचा शरीरावर होणारा परिणाम, मनातली भीती याचा परिणाम झोप पुरेशी न होण्यावर होतो. गरोदरपणात आहार विहार यासोबतच झोप नीट लागणंही देखील महत्त्वाची बाब आहे. पण ती लागत नाही, इतकंच काय गरोदरपणातल्या तिसऱ्या तिमाहीत कोणाकोणाला तर एक मिनिटही शांत झोप लागत नाही हे सत्य आहे. हे असं का होतं आणि झोप नीट यावी यासाठी काय करायला हवं हे गरोदर महिलांनी नीट समजून घेणं महत्त्वाचं आहे.

गरोदरपणात झोप नीट का येत नाही? 

  1.  जसजसा पोटातील गर्भ वाढतो त्याचा दाब मूत्राशयावर निर्माण होतो. त्याचाच परिणाम म्हणजे गरोदर महिलेला सतत लघवीला जावं लागतं.
  2.  आपल्या आवडत्या स्थितीत, कसंही झोपणं हे गरोदर स्त्रीसाठी अशक्य बाब असते. सरळ झोपलं, डाव्या किंवा उजव्या कुशीवर झोपलं तरी अस्वस्थ होत असल्यानं नीट झोप येत नाही
  3. रात्री छातीत आग करणं, आम्लं घशाशी येणं या प्रकारानं गरोदर महिला नीट झोपू शकत आही. वाढत्या गर्भाचा परिणाम पचनसंस्थेवरही होतो. त्यामुळे पचनास त्रास होतो. पचन नीट न झाल्यानं तयार होणारं आम्ल त्रास देतं.
  4.  रात्री झोपल्यानंतर पायात अस्वस्थता निर्माण झाल्यानेही अनेक महिला नीट झोपू शकत नाही. दिवसभराचा शरीरचा, पोटातल्या गर्भाच्या वजनाचा ताण पायावर पडतो. पाय खूप दुखणं, पायात चमका येणं, पायातले त्राण गेल्यासारखं होणं या पायांशी निगडित समस्यांमुळे महिला नीट झोपू शकत नाहीत.
  5.  गरोदरपणात शरीरातील हार्मोंस मोठ्या प्रमाणात बदललेले असतात. शरीरातील अ‍ॅस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरोन या संप्रेरकांची पातळी वाढलेली असल्यानं त्याचा परिणाम श्वास घेण्यावर होतो. त्याचाच परिणाम म्हणजे दम लागतो आणि रात्री एक नाक चोंदल्यासरखं होतं. श्वास नीट न घेता आल्यानेही महिला नीट झोपू शकत नाहीत.
  6.  गरोदरपणाच्या काळात महिला अनेक गोष्टींची विनाकारण चिंता करतात. अनेकींना पैशांची चिंता, पोटात वाढणाऱ्या गर्भाच्या वाढीची चिंता अशा अंनेक चिंता सतावतात. त्याचाच परिणाम मन शांत असत नाही. परिणामी शांत झोप लागत नाही. झोपेत सतत काहीतरी वाईट स्वप्नं दिसल्याचा भास होऊन झोप तुटते. आणि मग पाहिलेल्या स्वप्नाचा विचार करत राहिल्यानं पुढे झोप लागत नाही.
  7. गरोदरावस्थेत शरीराचं दुखणं, शरीर जडावणं, डोकं दुखणं, स्तन अति संवेदनशील झाल्यानेही नीट झोप लागत नाही.

 

 नीट झोप येण्यासाठी काय करावं? गरोदरपणातली झोप न लागण्याची समस्या अवघड असते. ती गोळ्या औषधांनी सोडवता येत नाही. कारण या काळात झोपेवरची औषधं पोटातल्या गर्भावर विपरित परिणाम करतात. त्यामुळे झोप नीट येण्यासाठी आहार-विहार, व्यायाम, मन:शांतीसाठीचे प्रयत्न याबाबीच मदत करु शकतात.

  •  कोणत्याही कुशीवर झोपल्यास गरोदर महिलेला अस्वस्थ होत असतं. त्यामुळे ज्या कुशीवर तिला झोपायचं असेल त्या बाजूला पोटाला आधार म्हणून एक उशी ठेवावी. आणि दोन पायातही उशी घ्यावी. गरोदर महिलांच्या बाबत हा उशी प्रयोग यशस्वी झाल्याचं तज्ज्ञांना आढळून आलं आहे.
  • दिवसभर बसून न राहाता शरीराला झेपेल असं काम करत राहिल्यानं, या काळात न चुकता व्यायाम केल्यानं शरीर आणि मन थकतं आणि मग रात्री नीट झोप लागते.
  • कॅफिन या घटकाचं प्रमाण जास्त असलेले चहा , कॉफी आणि एनर्जी ड्रिंकसारखे पेयं रात्री झोपतांना तर घेऊ नयेच शिवाय दिवसभरात त्यांच्या सेवनाचं प्रमाणही नियंत्रित राहिल याकडे लक्ष द्यावं.
  •  गरोदरपणात धूम्रपान आणि मद्यपान करु नये. निकोटिन आणि अल्कोहोल या घटकांचा अतिशय नकारात्मक परिणाम पोटातील गर्भावर होतो.

  • रात्री झोपण्याआधी मेंदू शांत करणारे काही व्यायाम प्रकार करावेत. किंवा ध्यानधारणा करावी. यामुळे शांत झोप लागण्यास मदत होते.
  •  झोपण्याची एक वेळ ठरवा आणि रोज रात्री त्यात तडजोड न करता झोपा, आणि उठण्याची वेळ ठरवून रोज ठरवलेल्या वेळेतच उठा. यामुळे या अवस्थेतील झोपेचं वेळापत्रक सेट व्हायला मदत होते.
  •  झोपल्यावर पायात अशक्तपणा येऊ नये यासाठी दिवसभर पुरेसं पाणी प्यावं. पूरेशा पाण्यानं शरीरात कोरडेपणा येत नाही.
  • रात्रीच्या जेवणात मसालेदार पदार्थ खाऊ नये. कमी मसालेदार पदार्थ सेवन केल्यानं मनात निराशावादी विचार येत नाही आणि झोप  शांत लागण्यास मदत होते.
  •  छातीत आणि घशाशी आग होऊ नये म्हणून झोपताना डोकं थोडं वर राहिल याची काळजी घ्यावी.