Join us   

गरोदर मातेला कोरोनाचा संसर्ग झालाच तर काय काळजी घ्याल? कोणत्या चुका टाळता येतील?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 2:11 PM

गरोदरपणात कोरोना संसर्गाचं भय वाटणं साहजिकच आहे, मात्र योग्य देखभाल, काळजी आणि तज्ज्ञ मार्गदर्शन घ्या, काळजी घेणं हाच उत्तम बचाव आहे.

ठळक मुद्दे अनेक गर्भवती महिला दिवसभर गरम पाणी पितात, हे धोक्याचं आहे.

प्रगती जाधव-पाटील

आई होणं ही किती आनंददायी अनुभूती असते. आईच्या आणि बाळाच्या काळजीपोटी सारं कुटूंब हवं-नको ते पाहत असतं. बाळंतीणीचे डोहाळे पुरवणं, तिला कायम प्रसन्न वाटेल असं वातावरण घरात ठेवणं हे सगळं अगदी ओघानंच येते. दरमहा डॉक्टरकडे जाऊन आल्यावरही काय म्हणाले डॉक्टर हे समजून घेण्याची ओढ ्रअसते. डॉक्टरकडे जाण्याचीही ओड असते. पण आता या कोरोनाकाळात दवाखान्यात जाणंही सोपं उरलेलं नाही. मातृत्वाची अनुभूती घेताना विविध माध्यमातून होणारं कोडकौतुक कोरोनाच्या प्रादुर्भावाने कमी झालंय. स्वत:सह बाळाची काळजी घेताना गर्भवती महिलांची तारेवरची कसरत होतेय. उपचारासाठी दवाखान्यात जायचं म्हटलं तर कोरोनाची भिती आणि नाही गेलं तर आरोग्याची काळजी अशी दुहेरी अडचण अनेकींची झाली आहे. कोविड काळात गर्भवतींना उपचार देणं आणि त्यांचे बाळंतपण सुखरूप करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्र कार्यरत आहे. आणि मग प्रश्न पडतो की याकाळात गरोदरमातेने काय काळजी घ्यायला हवी. कारण  काळजी हाच बचाव हे सूत्र अवलंबणं महत्वाचं आहे. 

सातारास्थित स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.अंजली मणेरीकर सांगतात, ‘गर्भवतींच्याबाबत विशेष काळजी घ्यावी लागते  आहे. क्ष किरणांचा गर्भावर विपरित परिणाम होईल या विचाराने गर्भावस्थेत एक्सरे केले जात नाहीत. चुकून कोणा गर्भवतीला कोरोना संसर्ग झालाच तर मात्र तिला एचआरसीटी आणि एक्सरे करणं बंधनकारकच आहे. गर्भातील बाळापेक्षा आईचा प्राण महत्वाचा या तत्वाने उपचारांचा भाग म्हणून हे करावंच लागतं. आपल्याकडे अजूनही गर्भवतींचे वय तिशीच्या आत असल्याने त्यांची रोगप्रतिकारशक्ती तुलनेने मजबूत असते. पण काहीदा उशिरा झालेली गर्भधारणा, हायपर टेन्शनसह बिपी आणि शुगरचा त्रास असलेल्यांना मात्र विशेष काळजी घ्यावी लागत आहे. म्हणून त्यांनी कमीत कमी लोकांच्या संपर्कात येणं, आपली प्रकृती सांभाळणं आणि औषधोपचार नियमित घेणं हे फार महत्वाचं आहे. गर्भवतींना कोरोना संसर्ग झाला तर त्यांना गृहविलगीकरणात ठेऊन त्यांच्यावर उपचार करण्याचा सल्ला दिला जातो. कोविड रूग्णालयातील संसर्गाचा त्यांना त्रास होऊ नये म्हणून अत्यंत गंभीर परिस्थिती नसेल तर गृहविलगीकरण हा सर्वात्तम पर्याय आहे. गर्भावस्थेत असताना गर्भवतीचा सर्वाधिक संपर्क हा तीची आई किंवा सासू यांच्यासोबत येतो. या दोघींचे वय पन्नासच्या पुढे असल्याने त्यांच्याबाबतही विशेष काळजी घेणं आवश्‍यक आहे. बऱ्याचदा ज्येष्ठांना असणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यानेही त्याची बाधा गर्भवतींमध्ये होते. यासाऱ्याची खबरदारी घेणं गरजेचं आहे.’ नवजात बालकाना कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. देशभरात अशी उदाहरणे अगदी बोटावर मोजण्या इतकीच आढळली आहेत. पण हा संसर्ग गर्भात असताना झाल्याचे ठोस म्हणण्या इतपत पुरावे वैद्यकीयतज्ज्ञांकडे नाहीत. त्यामुळे तूर्त तरी कोरोनाची लागण केवळ आईपर्यंतच असल्याने तिच्या उपचारांकडेच लक्ष दिले जाते. कोणत्याही आजारपणात शरिरातील ऑक्सिजनची पातळी खालावते पण ती वाढविण्यासाठी कसल्या पुरचुंड्या, वडाच्या आणि कडूनिंबाच्या झाडाखाली बसणं, पालथं झोपणं हे अघोरी प्रकार टाळण्याचा सल्लाही तज्ज्ञ देतात. सकस आहार, प्रसन्न दिनचर्या आणि निव्वळ स्वत:सह बाळाचे विचार या गोष्टींकडे लक्ष दिले तरीही पुढील धोका टाळणं सहज शक्य आहे.

गरम पाणी पिणं टाळाच!

कोविड विषाणू चार दिवस घशात राहतो. त्याला शरिरात जाण्यापासून रोखायचं असेल तर त्याच्यावर गरम पाण्याचा मारा करावा लागतो, असा समज असल्याने अनेक गर्भवती महिला दिवसभर गरम पाणी पितात, हे धोक्याचं आहे. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी गरम पाणी पिणं योग्य आहे. पाणी गरम असल्याने ते जास्त प्यालं जात नाही. परिणामी शरिरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे पचनासह मुत्राशय मार्गाचे संसर्ग गर्भवतींमध्ये पहायला मिळतात. हे टाळायचं असेल तर गर्भवती महिलांनी दिवसभरात किमान दोन लिटर पाणी पिणं आरोग्यदायी आहे.

आवश्‍यक काळजी आणि ‘एसएमएस’ महत्वाचं

गर्भवती महिलांची प्रकृती बाळंत होईपर्यंत नाजुक आणि संसर्गाला बळी पडणारी असते. त्यामुळे कुटूंबातील जे सदस्य कामाच्यानिमित्ताने घराबाहेर पडतात, त्यांच्यापासून अंतर ठेऊन राहणं आवश्‍यक आहे. कोणताही संसर्ग झाला तरी त्यासाठी ॲन्टी व्हायरल गोळ्या देताना काळजी द्यावी लागते. बऱ्याचदा ॲन्टी मलेरियाची औषध त्यांच्यासाठी उपुयक्त ठरतात. पण अशा औषधांचा मारा करण्यापेक्षा त्यांनी ‘एसएमएस’ अर्थात सॅनिटायझेशन, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग ही त्रीसूत्री अवलंबली तर पुढील गंभीर त्रास वाचू शकतात.

(लेखिका ‘लोकमत’च्या सातारा आवृत्तीत उपसंपादक आहेत.) pragatipatil26@gmail.com

टॅग्स : कोरोना वायरस बातम्यागर्भवती महिलाप्रेग्नंसी