Join us   

गरोदरपणात आई आणि गर्भाच्या आरोग्यासाठी महत्वाचे ५ घटक, ते आहारात आहेत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2021 6:25 PM

बाळाच्या वाढीसाठी सर्व जीवनसत्व आणि खनिज पदार्थ मिळणं गरजेचं असतं. प्रथिनं आणि फॅट्सच्या व्यतिरिक्त जीवनसत्त्वंही शरीरात जाणं गरजेचं असतं. विशेषतः फॉलिक ॲसिड, लोह, आयोडीन, कॅल्शियम या गोष्टींची गर्भवतीला गरज असते.

ठळक मुद्दे  स्त्रीच्या आहारातले पोषण मूल्य फक्त तिच्या स्वतःच्या शरीर स्वास्थ्यासाठी गरजेचं असतं असं नाही तर ते तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळासाठीही आवश्यक असतं.१२ आठवड्यापर्यंत दररोज ४०० मायक्रोग्रॅम्स फॉलिक ॲसिड शरीरात जायला हवं. गरोदरपणात बी १२ची कमतरता अतिशय घातक ठरू शकते.

गरोदरपणात प्रत्येक स्त्रीला समतोल आणि पोषक आहार मिळायलाच हवा. कारण आईच्या माध्यमातूनच बाळापर्यंत पोषक मूल्यं पोहचत असतात. बाळाच्या वाढीसाठी   सर्व जीवनसत्व आणि खनिज पदार्थ मिळणं गरजेचं असतं. प्रथिनं आणि फॅट्सच्या व्यतिरिक्त जीवनसत्त्वंही  शरीरात जाणं गरजेचं असतं. विशेषतः फॉलिक ॲसिड, लोह, आयोडीन, कॅल्शियम या गोष्टींची गर्भवतीला गरज असते.

आहारात  कधी -काय आणि किती असावं?

फॉलिक ॲसिड १२ आठवड्यापर्यंत दररोज ४०० मायक्रोग्रॅम्स फॉलिक ॲसिड शरीरात जायला हवं. यामुळे न्यूट्रल ट्यूब डिफेक्ट्स (एनटीडी)सारख्या आजारांपासून बचाव शक्य आहे. स्त्रियांमध्ये एनटीडीची शक्यता अधिक असते त्यांना जास्त प्रमाणात डोस सांगितला जातो. एनटीडीचा धोका कुणाला सर्वाधिक असू शकतो? १) आधीच्या बाळंतपणात एनटीडी आहे. २) घरात एनटीडीची हिस्ट्री आहे.  ३) मधुमेह ४) अपस्मार(एपिलेप्टी) साठी ज्या स्त्रियांना औषधं सुरू आहेत.

जीवनसत्त्व बी १२

शरीरात जीवनसत्त्व बी १२ जावं यासाठी पालेभाज्या खाणं हा एक चांगला पर्याय आहे. बी १२ची कमतरता अतिशय घातक ठरू शकते. पालेभाज्यांमध्ये विविध जीवनसत्त्वं आणि खनिजं असतात. तरीही आपल्या अन्नातील बी १२ चं प्रमाण वाढवण्यासाठी खालील गोष्टींचा समावेश अन्नात करू शकता. १) सामिष अन्न पदार्थ २) दूध, दही, चीज ३) अंडी

कॅल्शियम गर्भाच्या सकस वाढीसाठी कॅल्शिअमची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे आईलाही कॅल्शिअमची प्रचंड गरज असते. विशेषतः गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात. त्यामुळे कॅल्शिअमच्या गोळ्यांबरोबर आहारातूनही कॅल्शिअम जाईल हे बघितलंच पाहिजे.

रेकमंडेड डाएटरी अलाउन्सस (RDA) च्या शिफारशींनुसार १) विशेष शारीरिक हालचाल नसलेल्या महिला: ६०० मिलिग्रॅम २) गर्भवती महिला: १२०० मिलिग्रॅम ३) स्तनपान करणारी महिला: १२०० मिग्रॅ

लोह गरोदरपणात शरीरात जाणाऱ्या सगळ्या लोहाचा वापर शरीर  करतं. विशेषतः गरोदरपणाच्या  मध्यानंतर. गरोदरपणाच्या शेवटच्या तीन महिन्यात गर्भ सगळ्यात जास्त लोहचा साठा करतं. त्यामुळे अर्थातच पोटातल्या बाळाची लोहाची गरज झपाट्यानं वाढते. आणि आईच्या शरीरात असलेलं लोह ते शोषून घ्यायला सुरुवात करतं. जर आईच्या शरीरात पुरेसं लोह गेलं नाही तर आईला ॲनेमिया होऊ शकतो. ज्याचा परिणाम म्हणजे बाळंतपणाच्या वेळी बाळाचं वजन कमी भरतं किंवा त्याला आयडीए म्हणजे लोहाशी निगडित कमतरता निर्माण होतात. लोह कुठून मिळू शकतं? १) सामिष आहार २) अन्नधान्य ३) पालेभाज्या ४) शेंगदाणे ५) गूळ आणि सुका मेवा ६) १ कप जर्दाळू : ८ मिग्रॅ ७) १ कप पालक : ६ मिग्रॅ ८) मटार: ३ मिग्रॅ ९) १ कप शिजवलेले बटन मश्रूम्स: ३ मिग्रॅ १०) गूळ : १ चमचा २.२ मिग्रॅ ११) १ कप शिजलेला मसूर: ६. ६ मिग्रॅ १२) डांगर, तोल, जवस २ चमचे: २ते ४ मिग्रॅ १३) १ कप शिजवलेला अमरनाथ: ५. २ मिग्रॅ

आयोडीन डब्ल्यूएचओनुसार प्रत्येक प्रौढ व्यक्तीला १५० मायकोग्रॅम आयोडीन लागतं तर गर्भवती महिलेला आयोडीनची आवश्यकता २५०मायकोग्रॅम आहे. आयोडीन कुठून मिळू शकतं? १) सीफूड २) कॉडलिव्हर ऑइल ३) दूध, धान्य, भाज्या ४) आयोडीनची गरज अन्नातून ९० टक्के भागवली जाते तर १० टक्के पाण्यातून भागवली जाते.. ५) आयोडीनच्या कमतरतेमुळे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. गर्भच्या वाढीवर, बौद्धिक वाढीवर याचा परिणाम होऊ शकतो.  प्रचंड कमतरता असेल तर कायमचे शारीरिक दोष निर्माण होतात.

स्त्रीच्या आहारातले पोषण मूल्य फक्त तिच्या स्वतःच्या शरीर स्वास्थ्यासाठी गरजेचं असतं असं नाही तर ते तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळासाठीही आवश्यक असतं. लोह आणि आयोडिनशिवाय बाकी सगळ्या अन्न पदार्थातून कॅलरीज शरीरात जातात. बाळंतपणात वजन वाढणं आवश्यक असतं ते पोषक आहारामुळे सहज घडून येतं. मात्र तरीही डॉक्टरी सल्ल्यानुसार आवश्यकता असल्यास सप्लिमेंट्स घेतल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे जीवनसत्त्वं आणि खनिजं जितकी शरीरात जायला हवीत त्यापेक्षा जास्त जात नाहीयेत ना, डोस जास्त होत नाहीये ना याकडेही लक्ष ठेवलं पाहिजे.

विशेष आभार: डॉ. अतुल गणत्र (MD, DGO, FICOG)