Join us   

गरोदर असताना 5 गोष्टींकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात, वाढतो गर्भपाताचा धोका! वेळीच लक्षणं ओळखा.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 5:26 PM

राष्ट्रीय आरोग्य योजनानुसार गर्भपात ही असामान्य बाब नाही. ती खूपच सामान्य बाब असून आठ पैकी एका महिलेला गर्भपाताच्या समस्येला सामोरं जावं लागतं. अनेक महिलांचा गर्भपात तेव्हा होतो जेव्हा आपण गरोदर आहे हे देखील महिलेला माहित नसतं. गर्भपाताची कारणं-लक्षणं समजून घेणं म्हणूनच गरजेचं.

ठळक मुद्दे गर्भपात झाल्यास स्त्रीला दोष देणं हे पूर्णपणे चुकीचं आहे.आठ पैकी एका महिलेला गर्भपाताच्या समस्येला सामोरं जावं लागतं. गरोदरपणात सुरुवातीच्या दिवसात थोडासा रक्तस्त्राव होणं म्हणजे गर्भपात झाला असं समजण्याचं कारण नाही.

 गरोदर अवस्थेत 24 आठवड्यांच्या आतच गर्भाशयात वाढणारा गर्भ पडतो/ नष्ट होतो यालाच वैद्यकीय भाषेत मिसकॅरेज/ अबॉर्शन म्हणजेच गर्भपात असं म्हटलं जातं. गर्भपात ही बाब त्या स्त्रीसाठी आणि आई बाबा होणार्‍या जोडप्यासाठी खूपच धक्कादायक असते. पण आजही अनेकदा गर्भपाताकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून न बघता याला स्त्रीला जबाबदार धरलं जातं. तिने काही हलगर्जीपणा दाखवला असेल असं गृहित धरलं जातं. आधीच गर्भपात झाल्यानं बसलेला मानसिक धक्का, शारीरिक त्रास आणि त्यासोबत या दूषणांमुळे येणारा तणाव यामुळे स्त्री खचते. त्याचा परिणाम पुढच्या गर्भधारणेसाठीच्या आवश्यक शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. म्हणूनच गर्भपाताला शास्त्रीय दृष्टिकोनातून समजून घेणं आवश्यक आहे.

सामान्यत: गरोदर असताना पहिल्या तीन महिन्यात होणारा गर्भपात हा गर्भाशयातल्या गर्भाला येणार्‍या अडचणींचा परिणाम असतो. राष्ट्रीय आरोग्य मिशन ( एनएचएस) नुसार गर्भात असामान्य गुणसूत्र असणं, कमी किंवा खूप जास्त गुणसूत्र हे गर्भपाताचं कारण प्रामुख्यानं आढळून येतं. अशा परिस्थितीत गर्भाचा विकासच होवू शकत नाही.

गर्भपाताच्या 2 ते 5 टक्के केसेसमधे अनुवांशिकता हे कारण दिसून येतं. जोडीदाराच्या असामान्य गुणसूत्रामुळे गर्भाशयात वर विकसित होत नाही. गर्भात रक्त आणि पोषक घटकांची कमतरता निर्माण होते. तिसर्‍या महिन्यानंतर जर गर्भपात झाला तर त्याचं  कारण हे अशक्त गर्भ, गर्भाला संसर्ग, लैंगिक आजाराचा संसर्ग, गर्भाशयाचा आकार दोषपूर्ण असणं, पीसीओएसची समस्या किंवा अन्नाची विषबाधा  या अनेक कारणांपैकी एक किंवा अनेक असू शकतात. 

Image: Google

वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात की गरोदरपणात उशिरा गर्भपात होणं, सतत गर्भपात होणं याला रक्तातल्या गुठळ्यांची समस्या, थायरॉइड, अशक्त गर्भाशय ही कारणं कारणीभूत ठरतात. राष्ट्रीय आरोग्य योजनानुसार गर्भपात ही असामान्य बाब नाही. ती खूपच सामान्य बाब असून आठ पैकी एका महिलेला गर्भपाताच्या समस्येला सामोरं जावं लागतं. अनेक महिलांचा गर्भपात तेव्हा होतो जेव्हा आपण गरोदर आहे हे देखील महिलेला माहित नसतं. गर्भपात ही सामान्य बाब असली तरी वारंवार गर्भपात होणं हे मात्र सामान्य नाही. 100 तील एका गरोदर महिलेला या समस्येला सामोरं जावं लागतं. 30 वर्षांपेक्षा कमी वयात गर्भपात होण्याचं प्रमाण 10 महिलांमधे एक तर 45 पेक्षा जास्त वयातल्या गरोदरपणात गर्भपाताचं प्रमाण 10 महिलांमधे पाच एवढं आहे.

Image: Google

का होतो गर्भपात?

1. गर्भातील असामान्य गुणसूत्र 2. महिलेची रोग प्रतिरोधक क्षमता किंवा ब्ल क्लॉटिंगचीब समस्या 3. थायरॉइड आणि मधुमेह 4. गर्भ, गर्भाशयाच्या काही समस्या 5. अति धूम्रपान 6. वय जास्त असणं 7. गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यात खूप धावपळ आणि प्रवास 8. पोटावर जास्त दबाव पडणं, पोटाला इजा होणं 9. योनीमार्गात संसर्ग झाल्यास

Image: Google

गर्भपाताची लक्षणं कोणती?

गर्भपात का होतो हे समजून घेणं जितकं गरजेचं तितकंच गर्भपाताची लक्षणं कोणती हे समजून घेणंही गरजेचं आहे. कारणं ही लक्षणं दिसताच लगेच डॉक्टरांकडे जाणं आवश्यक असतं त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य मिशन म्हणतं की महिलांना गर्भपाताची लक्षणं माहिती असायलाच हवीत.

1. गरोदरपणात सुरुवातीच्या दिवसात थोडासा रक्तस्त्राव होणं म्हणजे गर्भपात झाला असं समजण्याचं कारण नाही. डॉक्टर सांगतात गरोदरपणात सुरुवातीच्या दिवसात असा थोडा रक्तस्त्राव होणं ही सामान्य बाब आहे. त्यामुळे घाबरुन जाण्याची गरज नाही. फक्त एकदा आपल्या डॉक्टरांना ते सांगावं. पण हाच रक्तस्त्राव अति प्रमाणात असेल, रक्ताचा रंग भुरकट किंवा लाल गडद असेल तर मात्र गर्भाला धोका असल्याचं मानलं जातं.

2. गरोदरपणात ओटीपोटाच्या आजूबाजुला हलका दाब जाणवणं, पसूतीदरम्यान होणार्‍या आंकुचनाची जाणीव होणे.

Image: Google

3. कधी कधी थोडा रक्तस्त्राव होतो, पोटात दुखतं असतं तेव्हा लगेच डॉक्टरांकडे जावं, कारण हे अर्धवट गर्भपात झाल्याचं लक्षण मानलं जातं. यात अर्धा गर्भ पडतो आणि अर्धा गर्भ हा आतच राहातो. त्याचा गंभीर परिणाम महिलेच्या आरोग्यावर होतो. 4. पाठ आणि पाठीच्या खालच्या भागात प्रचंड वेदना होणं 5. गरोदरपणात अंगावरुन पांढरा स्त्राव जाणं ही देखील सामान्य बाब आहे पण जर या स्त्रावाला वास असेल, त्याचा रंग बदललेला असेल तर योनीमार्गात संसर्ग झाल्याचं लक्षण असतं. त्यामुळे आधी डॉक्टरांकडे जायला हवं.